नवी दिल्ली : भारताचा माजी स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवागने राष्ट्रीय निवड समितीच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेतली आहे. बीसीसीआयने यासंबंधी आपल्याकडे अद्याप विचारणा केलेली नसून आपल्याला स्वत:लाही सध्या या जबाबदारीत अडकायचे नाही, असे स्पष्ट मत ४४ वर्षीय सेहवागने शुक्रवारी व्यक्त केले.
चेतन शर्मा यांनी फेब्रुवारीत निवड समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर सध्या शिवसुंदर दास हंगामी स्वरूपात अध्यक्षपद भूषवत आहेत. दास यांच्यासह एस. शरथ (दक्षिण), सुब्रतो बॅनर्जी (मध्य) आणि सलील अंकोला (पश्चिम) या चौघांची समिती भारताच्या संघ निवडीचे कार्य करत आहे. मात्र बीसीसीआयने गुरुवारी नव्या अध्यक्षपदासाठीची जाहिरात प्रकाशित केली. त्यानुसार उत्तर विभागातून फक्त सेहवाग पात्र ठरत असल्याने त्याने केलेली मानधनवाढीची अट बीसीसीआय मान्य करणार का, याकडे चाहत्यांचे लक्ष लागून होते. मात्र शुक्रवारी सेहवागने यासंबंधी बीसीसीआयने आपल्याशी काहीही संपर्क साधलेला नाही, असे एका वाक्यातच स्पष्ट करून सर्व चर्चांना पूर्णविराम दिला.
सध्या निवड समितीच्या प्रमुखाला वार्षिक १ कोटी, तर समितीतील अन्य सदस्यांना वार्षिक ९० लाख रुपये मानधन देण्यात येते. सेहवागने काही आठवड्यांपूर्वी हे मानधन कमी असल्याचे म्हटले होते. मात्र सेहवाग सध्या विविध प्लॅटफॉर्मवर विश्लेषक म्हणून काम करतो व याद्वारे भरघोस कमावतो. त्यामुळे तो निवड समितीच्या अध्यक्षपदासाठी उत्सुक नसल्याचे समजते.
निवड समिती अध्यक्षपदासाठीच्या अटी
क्रिकेटमधून निवृत्ती पत्करून किमान ५ वर्षांचा कालावधी पूर्ण होणे आवश्यक.
७ कसोटी किंवा १० एकदिवसीय सामन्यांचा अनुभव.
कोणत्याही आंतरराष्ट्रीय किंवा फ्रँचायझी संघाचे प्रशिक्षकपद सांभाळता येणार नाही.
कोणत्याही वृत्त अथवा क्रीडा वाहिनीशी असलेला करार संपुष्टात आणावा लागेल.