जोहान्सबर्ग : अखेरच्या सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिकेवर १३५ धावांनी दणदणीत विजय मिळवत भारताने ४ सामन्यांची टी-२० मालिका ३-१ अशी खिशात घातली. कठोर मेहनतीनेच हा मालिका विजय मिळवला असल्याचे गौरवोद्गार दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारताचे मुख्य प्रशिक्षक असलेले व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी काढले.
भारताच्या खेळाडूंनी ज्या पद्धतीने ही संपूर्ण मालिका खेळली त्याबद्दल त्यांचा खरोखरच अभिमान वाटतो. मालिका ३-१ ने जिंकणे हा एक विशेष प्रयत्न आहे. सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांनी फलंदाजीने आणि वरुण चक्रवर्तीन गोलंदाजीत उत्कृष्ट कामगिरी केली, असे लक्ष्मण यांनी त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टवर लिहिले आहे.
संपूर्ण संघ ज्या प्रकारे खेळला आणि यश मिळवले हे अभिमानस्पद आहे. या संस्मरणीय विजयाबद्दल संघातील खेळाडूंचे अभिनंदन असे लक्ष्मण म्हणाले.
कर्णधार सूर्यकुमार यादवनेही हा मालिका विजय 'खास' असल्याचे म्हटले. यावेळी त्याने संघ सहकाऱ्यांचे अभिनंदन केले. सूर्यकुमार म्हणाला की, परदेशात मालिका जिंकणे किती कठीण असते हे सर्वांनाच ठाऊक आहे. गेल्या वेळी भारतीय संघ जेव्हा दक्षिण आफ्रिकेत आला होता तेव्हा टी-२० मालिका १-१ अशी होती. मात्र यावेळी भारताने ही मालिका ३-१ अशी जिंकली असल्याचे सूर्या म्हणाला.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाने शुक्रवारी झालेल्या मालिकेतील अखेरच्या सामन्यात यजमानांना तब्बल १३५ धावांनी पराभवाचे पाणी पाजत ४ सामन्यांची टी-२० मालिका ३-१ अशी खिशात घातली. मालिकेतील अखेरच्या सामन्यात तिलक वर्मा आणि संजू सॅमसन यांनी नाबाद धडाकेबाज शतके झळकावली. तिलक वर्माने ४७ चेंडूंत नाबाद १२० धावा चोपल्या. संजूने ५६ चेंडूंत नाबाद १०९ धावांची फटकेबाजी केली. या दुकलीच्या बळावर भारताने निर्धारित २० षटकांत १ फलंदाज गमावून २८३ धावांचा डोंगर उभारला. एवढे मोठे लक्ष्य पार करताना यजमान दक्षिण आफ्रिकेचा संघ १८.२ षटकांत १४८ धावांवर सर्वबाद झाला. त्यामुळे भारताने या सामन्यात १३५ धावांनी बाजी मारली.