राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत वाघजाई क्रीडा मंडळ व शिवशक्ती संघाला जेतेपद

वाघजाई संघाचा अजिंक्य पवार पुरुषांत, तर शिवशक्तीची सोनाली शिंगटे महिलांत स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरले
राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत वाघजाई क्रीडा मंडळ व शिवशक्ती संघाला जेतेपद

वाघजाई क्रीडा मंडळ चिपळूण-रत्नागिरी व शिवशक्ती महिला संघ मुंबई शहर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-बाणेर-पुणे व बाबुराव चांदेरे फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या अनुक्रमे पुरुष व महिला गटाचे जेतेपद पटकाविले.

वाघजाई संघाचा अजिंक्य पवार पुरुषांत, तर शिवशक्तीची सोनाली शिंगटे महिलांत स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरले. दोघांनाही प्रत्येकी रोख रु. २५ हजार व घड्याळ देऊन गौरविण्यात आले. म्हाळुंगे, बाणेर- पुणे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलातील बॉक्सिंग हॉलमधील मॅटवर झालेल्या पुरुषांच्या अंतिम सामन्यात वाघजाईने नांदेडच्या बाबुराव चांदेरे फाउंडेशनचा चुरशीच्या लढतीत ३९-३४ असा पराभव करीत कबड्डीमहर्षी स्व. शंकरराव(बुवा) साळवी चषक पटकाविला.

उपविजेत्या चांदेरे फाउंडेशनला चषक व रोख रु. एक लाख (₹१,००,०००/-)वर समाधान मानावे लागले. मध्यंतराला वाघजाई संघाकडे २८-१९ अशी आघाडी होती. वाघजाई संघाच्या अजिंक्य पवार याने चौफेर चढाया करीत बाबुराव चांदेरे फाउंडेशन संघाचा बचाव भेदला. शुभम शिंदे याने उत्कृष्ट पकडी घेत त्यांचे आक्रमण समर्थपणे थोपवले. बाबुराव चांदेरे फाउंडेशन संघाच्या सुनील दुबिले याने जोरकस चढाया करीत चांगला प्रतिकार करीत सामन्यात चुरस निर्माण केली. गुरुनाथ मोरे याने चांगल्या पकडी घेतल्या; पण विजय मात्र त्यांच्यापासून दूरच राहिला.

महिलांचा अंतिम सामनादेखील शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीने खेळला गेला. त्यात शिवशक्ती संघाने पुण्याच्या बलाढ्य अशा राजमाता जिजाऊ संघावर ३२-२६ असा विजय संपादन करीत ‘कबड्डीमहर्षी स्व. शंकरराव (बुवा) साळवी चषक व रोख रु. एक लाख ५० हजार (₹१,५०,०००/) आपल्या नावे केले. उपविजेत्या राजमाता जिजाऊ संघ चषक व रोख रु. एक लाखचा मानकरी ठरला. पहिल्या डावात शिवशक्तीकडे १४-१३ अशी निसटती आघाडी होती. शिवशक्ती संघाच्या अपेक्षा टाकळे व सोनाली शिंगटे यांनी चौफेर चढाया करीत मैदानावर हुकमत गाजवित संघाला विजय मिळवून दिला. त्यांना रक्षा नारकर व रेखा सावंत यांनी उत्कृष्ट पकडीची साथ देत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. अपेक्षा टाकळे व सोनाली शिंगटे यांनी सामन्याच्या सुरुवातीपासूनच आक्रमक चढाया करीत राजमाता जिजाऊ संघाला दबावाखाली ठेवण्यात यश मिळविले. त्याचा परिणाम राजमाता जिजाऊ संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. राजमाता जिजाऊ संघाच्या मंदिरा कोमकर व सायली केरीपाळे यांनी जोरदार चढाया करीत चांगला प्रतिकार केला. अंकिता जगताप व स्नेहल शिंदे यांनी चांगल्या पकडी घेतल्या; पण उत्तरार्धात मात्र त्यांचा प्रतिकार दुबळा ठरला.

पुरुषांत वाघजाईचा शुभम शिंदे, तर महिलात शिवशक्तीची रेखा सावंत स्पर्धेतील उत्कृष्ट पकडीचे खेळाडू ठरले. तसेच पुरुषांत बाबुराव चांदेरे फाउंडेशनचा सुनील दुबिले, तर महिलांत राजमाता जिजाऊची मंदिरा कोमकर स्पर्धेतील उत्कृष्ट चढाईचे खेळाडू ठरले. या चारही खेळाडूंना प्रत्येकी रोख रु. २० हजार व घड्याळ देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेचे बक्षीस वितरण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख खासदार शरद पवार व प्रतिभाताई पवार या उभयतांच्या हस्ते करण्यात आले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in