
मुंबई : मुंबईसह भारतातील तमाम चाहत्यांसाठी वानखेडे स्टेडियम म्हणजे क्रिकेटची पंढरी. याच वानखेडे स्टेडियमला लवकरच ५० वर्षे पूर्ण होणार आहेत. त्यानिमित्ताने मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) विशेष सप्ताह सोहळा आयोजित करण्याचे ठरवले आहे. १२ ते १९ जानेवारी दरम्यान वानखेडे स्टेडियमवर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमाला रविवारपासून प्रारंभ होणार आहे.
१९७४मध्ये बांधणी करण्यात आलेल्या या स्टेडियमवर १९७५मध्ये भारत-वेस्ट इंडिज यांच्यात पहिली कसोटी खेळवण्यात आली. तेव्हापासून आजपर्यंत वानखेडेने चाहत्यांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाचे ‘होम ग्राऊंड’ म्हणूनही या स्टेडियमवरील लढती पाहण्यासाठी चाहते तुडुंब गर्दी करतात.
पुढील रविवार म्हणजेच १९ जानेवारीला वानखेडेवर शानदार सोहळा होणार असून आजी-माजी क्रिकेटपटू, राजकीय क्षेत्रातील मान्यवर यासाठी उपस्थित असतील. चाहत्यांनाही माफक शुल्कात प्रवेश देण्यात येणार आहे. सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, रवी शास्त्री, अजिंक्य रहाणे, दिलीप वेंगसरकर आणि डायना एडल्जी यांच्यासह मुंबई आणि भारताचे आजी-माजी क्रिकेटपटू या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही ठिकाणी खेळलेल्या मुंबईच्या पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंचाही सन्मान केला जाईल.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंदिरा बेदी आणि प्रसन्न संत करणार आहेत. ते प्रेक्षकांना विविध मनोरंजक सादरीकरणे आणि आदरांजली यामधून कार्यक्रमात सहभागी करून घेतील. कार्यक्रमात अवधूत गुप्ते आणि अजय-अतुल यांच्या विशेष सादरीकरणांसह नेत्रदीपक लेसर शोही होणार आहे. “ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमच्या 50 व्या वर्धापन दिनानिमित्त सर्व क्रिकेट चाहत्यांना आम्ही हार्दिक आमंत्रण देत आहे. आपले महानायक या सोहळ्यात सहभागी होतील आणि त्यांच्यासह आपण सगळे मुंबईची शान असलेल्या वानखेडेच्या समृद्ध परंपरेला सलाम करू यात. आपण सगळे एकत्र मिळून या उत्सवाला अविस्मरणीय बनवू,” असे एमसीएचे अध्यक्ष अजिंक्य नाईक म्हणाले.
कार्यक्रमाचा एक भाग म्हणून १९ जानेवारी रोजी एमसीए पदाधिकारी आणि अॅपेक्स कौन्सिल सदस्यांकडून एका कॉफी टेबल बुकचे प्रकाशन होणार आहे. तसेच वानखेडे स्टेडियमच्या परंपरेचा गौरव करण्यासाठी एक विशेष टपाल तिकीट देखील जारी केले जाईल. या सोहळा सप्ताहात १२ जानेवारीला एमसीए अधिकारी आणि काउंसील जनरल्स, प्रशासकांमध्ये क्रिकेट सामना आयोजित केला जाईल.
मुंबई क्रिकेटच्या कर्तव्यनिष्ठ नायकांचा सन्मान करताना एमसीएकडून १५ जानेवारीला एमसीए क्लब आणि मैदानावरील कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. त्यावेळी पॉली उम्रीगर आरोग्य शिबिर तसेच विशेष भोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. १९७४ मध्ये वानखेडे स्टेडियमवर प्रथम श्रेणीचा सामना खेळलेल्या मुंबई संघाच्या सदस्यांचा सन्मानही यावेळी करण्यात येईल.