वानखेडेच्या सुवर्णमहोत्सवाची जागतिक विक्रमाद्वारे सांगता; १४,५०५ क्रिकेट चेंडूंच्या सहाय्याने रचले सर्वात मोठे वाक्य, बघा फोटो
सलमान अन्सारी

वानखेडेच्या सुवर्णमहोत्सवाची जागतिक विक्रमाद्वारे सांगता; १४,५०५ क्रिकेट चेंडूंच्या सहाय्याने रचले सर्वात मोठे वाक्य, बघा फोटो

२३ जानेवारी, १९७५ रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळवण्यात आला होता.
Published on

क्रीडा प्रतिनिधी/मुंबई

२३ जानेवारी, १९७५ रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळवण्यात आला होता. त्यानिमित्ताने मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) गुरुवारी आगळ्यावेगळ्या गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची (जागतिक विक्रम) नोंद करताना वानखेडेच्या सुवर्णमहोत्सवाची दणक्यात सांगता केली. वानखेडेवर गुरुवारी क्रिकेटच्या लाल आणि पांढऱ्या चेंडूंचा अधिकाधिक वापर करून सर्वात मोठे वाक्य तयार करण्यात आले.

१९७४मध्ये बांधणी करण्यात आलेल्या या स्टेडियमवर १९७५मध्ये २३ ते २९ जानेवारी या कालावधीत भारत-वेस्ट इंडिज यांच्यात पहिली कसोटी खेळवण्यात आली. तेव्हापासून आजपर्यंत वानखेडेने चाहत्यांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले. १२ ते १९ जानेवारी या कालावधीत वानखेडेचा सुवर्णमहोत्सव दणक्यात साजरा करण्यात आला. मात्र एमसीएचे अध्यक्ष अजिंक्य नाईक आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी २३ जानेवारी या दिवसाचे महत्त्व ओळखून आणखी एका कार्यक्रमाचे आयोजन केले.

‘फिफ्टी इयर्स ऑफ वानखेडे स्टेडियम’ या वाक्याची इंग्रजीतील आद्याक्षरे मैदानावर चेंडूच्या सहाय्याने लिहिण्यात आली. यासाठी १४,५०५ चेंडू वापरण्यात आले. इतिहासात प्रथमच अशाप्रकारे विक्रम रचण्यात आला. फक्त २ हजार चेंडूंचा वापर करूनही विक्रमाची नोंद झाली असती, मात्र एमसीएने तब्बल १४ हजारांहून अधिक चेंडू वापरले.

एमसीएने हा विक्रम पहिल्या सामन्यात शतक करणारे खेळाडू दिवंगत एकनाथ सोलकर आणि असामान्य कामगिरी करत या खेळासाठी भरीव योगदान देणाऱ्या इतर खेळाडूंना समर्पित केला. तसेच हा विक्रम करण्यासाठी वापरण्यात आलेले चेंडू शाळा, क्लब्ज आणि शहरांच्या एनजीओजमधील उदयोन्मुख क्रिकेट खेळाडूंना वाटले जाणार आहेत. या विक्रमातून त्यांनाही आपल्या कारकीर्दीत दमदार कामगिरी करण्याची प्रेरणा मिळावी, असा हेतू आहे.

“मुंबई क्रिकेटने या खेळासाठी लक्षणीय योगदान दिले आहे आणि क्रिकेटच्या इतिहासात त्याला महत्त्वाचे स्थान आहे. या शहराने जागतिक कीर्तीचे खेळाडू घडवले आहेत. वानखेडे स्टेडियम हा मुंबईचा अभिमान असून ते काही ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार आहे. हा विक्रम मुंबई क्रिकेटची गुणवत्ता दर्शवणारा आहे. मुंबई क्रिकेटच्या वारशासाठी योगदान देणारे खेळाडू, अधिकारी आणि पडद्यामागच्या व्यक्तींना वाहिलेली ही आदरांजली आहे,” असे नाईक म्हणाले.

सलमान अन्सारी
सलमान अन्सारी

सोलकर यांच्या कुटुंबीयांना १० लाख

वानखेडेवरील पहिल्या कसोटीत भारताकडून पहिले शतक झळकावणाऱ्या एकनाथ सोलकर यांना हा विक्रम एमसीएने समर्पित केला. ते उत्तम क्षेत्ररक्षकही असल्याचे चेंडूचा वापर करण्यात आला. तसेच त्यांच्य कुटुंबीयांना एमसीएने १० लाखांची मदत जाहीर केली. त्याशिवाय १९७४सालच्या रणजी संघाचा भाग असलेल्या सर्व खेळाडूंना अथवा त्यांच्या कुटुंबीयांना एमसीए ५ लाखांची मदत करणार आहे. पुढील काही महिन्यांत एमसीए असे विविध उपक्रम राबवणार असल्याचे सचिव अभय हडप यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in