टी-२० मालिकेतील शेवटचा निर्णायक सामन्यावर पाणी

नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेने भारताला फलंदाजीसाठी निमंत्रित केले होते
टी-२०  मालिकेतील शेवटचा निर्णायक सामन्यावर पाणी

भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पाचवा आणि शेवटचा निर्णायक सामन्यावर अखेर पावसाचे पाणी पडले. पाच सामन्यांची टी-२० मालिका अखेर २-२ अशी बरोबरीतच राहिली. भुवनेश्वर कुमारला मालिकावीर म्हणून गौरविण्यात आले.

नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेने भारताला फलंदाजीसाठी निमंत्रित केले होते. मात्र पावसाने सामन्यात दोन वेळा व्यत्यय आणल्याने निर्णायक सामना रद्द करण्यात आला. त्यामुळे पाच सामन्यांची मालिका बरोबरीत सुटली. आतापर्यंत दोन्ही संघांनी प्रत्येकी दोन सामने जिंकून मालिकेत बरोबरी साधली होती. पावसामुळे सामना रद्द करण्यात आला, तेव्हा भारताने ३.३ षटकात २ बाद २८ धावा केल्या होत्या. कर्णधार ऋषभ पंत एका धावेवर नाबाद होता, तर श्रेयस अय्यरने खाते उघडलेले नव्हते.

बंगळुरूतील एम चिन्नास्वामी स्टेडियमवरील हा सामना खेळवला जिंकून मालिका विजय मिळविण्याचा निर्धार दोन्ही संघांनी केला होता. त्यामुळे सामना अटीतटीचा होण्याची शक्यता निर्माण झाली होती.

कर्णधार ऋषभ पंतने सलग पाचव्यांदा नाणेफेक गमावली. दक्षिण आफ्रिकेने दिलेले फलंदाजीचे निमंत्रण स्वीकारून सलामीवीर ईशान किशन आणि ऋतुराज गायकवाड डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानात आले; पण पावसाला सुरुवात झाली. मैदानात उतरलेले खेळाडू पुन्हा माघारी परतले.

काही वेळाने पाऊस थांबल्यानंतर मैदानावरील कव्हर्स बाजूला करण्यात आले. काही वेळाने खेळाला सुरुवात झाली. दोन्ही संघाच्या डावातील प्रत्येकी एक षटक कमी करण्यात आले.

सलामीवीर ईशान किशनने पहिल्या षटकात सलग दोन षटकार लगावले. पहिल्याच षटकात भारताने १६ धावा केल्या. पण ईशान किशनला गोलंदाज लुंगी एनगिडीने १५ धावांवर त्रिफळाचित केले. त्यानंतर एनगिडीने ऋतुराज गायकवाडला १० धावांवर बाद केले. ड्वेन प्रिटोरियसने ऋतुराजचा झेल टिपला. भारताची अवस्था दोन बाद २७ अशी झाली. कर्णधार ऋषभ पंतवर डाव सावरण्याची जबाबदारी येऊन पडली.

त्यानंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाल्याने खेळ थांबविण्यात आला. खेळपट्टी झाकण्यात आली. त्यानंतर सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, भारताने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नव्हता. दक्षिण आफ्रिकेने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन बदल केले होते.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in