बंगळुरू : न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीतील पराभव सहज विसरता येणे शक्य नाही. मात्र यापूर्वीही आम्ही मालिकेतील पहिली लढत गमावून झोकात पुनरागमन केले आहे. त्यामुळे उर्वरित सामन्यांत नक्कीच चांगली कामगिरी करू, असा विश्वास भारताचा कर्णधार रोहित शर्माने व्यक्त केला.
रोहितने कसोटीच्या पहिल्याच दिवशी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेण्याचा निर्णय चुकल्याचे मान्य केले. "न्यूझीलंडने या लढतीत आम्हाला तिन्ही आघाड्यांवर नमवले. असे घडत असते. आता पुढील २ सामन्यांसाठी आम्हाला तयारी करणे गरजेचे आहे. इंग्लंडविरुद्धही आम्ही पहिली कसोटी गमावल्यावर उर्वरित ४ लढती जिंकून मालिकाही खिशात घातली होती. त्याच कामगिरीची पुनरावृत्ती यावेळी करू," असे रोहित म्हणाला. तसेच एका लढतीत पराभव झाल्याने आम्ही खेळण्याची शैली बदलणार नाही, असेही रोहितने आर्वजून सांगितले.
दरम्यान, न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमनेसुद्धा सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मजेशीर वक्तव्य केले. किवी संघानेसुद्धा नाणेफेक जिंकल्यास, प्रथम फलंदाजी करण्याचाच विचार केलेला, असे लॅथम म्हणाला. "खेळपट्टी पाहिल्यावर आम्हीसुद्धा प्रथम फलंदाजीचा निर्णय घेणार होतो. मात्र ३ वेगवान गोलंदाज व ३ फिरकीपटू आमच्या संघात असणारच होते. सुदैवाने भारतीय संघ नाणेफेक जिंकला व आमच्या वेगवान गोलंदाजांनी कमाल केली," असे लॅथम म्हणाला. तसेच भारतीय संघाच्या ताकदीचा आम्हाला आढावा असून उर्वरित २ सामन्यांत गाफील राहणार नाही, असेही लॅथमने सांगितले.
चेन्नईत सराव केल्याचा लाभ : रचिन
आशिया खंडात ६ कसोटी सामने खेळणार असल्याचे समजले, तेव्हाच मी हा दौरा सुरू होण्यापूर्वी चेन्नई गाठण्याचे ठरवले. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळत असल्याचा मला लाभ झाला. त्यामुळे मला चेन्नईतील अकादमीत लाल तसेच काळ्या मातीच्या खेळपट्टीवर फलंदाजी करण्याची संधी लाभली. याचा भारताविरुद्ध नक्कीच फायदा झाला, अशी प्रतिक्रिया न्यूझीलंडचा फलंदाज रचिन रवींद्रने व्यक्त केली. रचिनचे कुटुंबीय भारतीय वंशाचे असून त्याची आजी चेन्नईत स्थायिक आहे. सप्टेंबर महिन्यात त्याने चेन्नई गाठून कसोटी मालिकेसाठी सराव केला.