चित्तथरारक सामन्यांत वेस्ट इंडिजचा भारतावर विजय; ओबेद मॅकॉय सामनावीर ठरला

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताची सुरुवात निराशाजनक झाली.
चित्तथरारक सामन्यांत वेस्ट इंडिजचा भारतावर विजय; ओबेद मॅकॉय सामनावीर ठरला

अखेरच्या षट्कापर्यंत चित्तथरारक झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात वेस्ट इंडिजने भारतावर पाच गडी राखून विजय मिळविला. शेवटच्या षट्कात भारताच्या आवेश खानने टाकलेला पहिलाच चेंडू नो बॉल ठरला आणि तिथेच सामना भारताच्या हातून निसटला. या विजयासह विंडीजच्या संघाने पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. अवघ्या १७ धावांच्या मोबदल्यात सहा बळी टिपणाऱ्या ओबेद मॅकॉयला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताची सुरुवात निराशाजनक झाली. सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर कर्णधार रोहित शर्मा भोपळा फोडण्याआधीच बाद झाला. त्यानंतर ठरावीक अंतराने भारतीय फलंदाज बाद होत गेले. भारताचा डाव १९.४ षट्कांत अवघ्या १३८ धावांत संपुष्टात आला. अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने ३१ चेंडूंत सर्वाधिक ३१ धावांची खेळी केली. त्यापाठोपाठ रवींद्र जडेजा (३० चेंडूंत २७) आणि ऋषभ पंत (१२ चेंडूंत २४) यांनी समाधानकारक आव्हान उभे करण्यात यश मिळविले. विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजच्या सलामीवीरांनी पॉवर प्लेमध्ये जोरदार फटकेबाजी केली. पहिल्या सहा षट्कांमध्येच ४६ धावा झोडपून काढल्या. पॉवर प्लेनंतर भारतीय गोलंदाजांनी सामन्यावर वर्चस्व मिळविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे वेस्ट इंडिजच्या धावगतीला आळा बसला.

अखेरच्या षट्कात वेस्ट इंडिजला विजयासाठी १० धावांची आवश्यकता असताना आवेश खानकडून पहिल्याच चेंडूवर चूक झाली. हा चेंडू नो बॉल ठरला. त्यानंतर मिळालेल्या फ्री हिटचा फायदा घेत विंडीजच्या डेवोन थॉमसने षट्कार खेचला आणि दुसऱ्याच चेंडूवर चौकार मारत विंडीजच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. ब्रँडन किंगने (५२ चेंडूंत ६८) आणि डेवोन थॉमस (१९ चेंडूंत ३१) यांनी फटकाविलेल्या धावा महत्त्वपूर्ण ठरल्या. दरम्यान, भारतीय वेळेनुसार हा सामना रात्री ८ वाजता सुरू होणार होता; मात्र वेस्ट इंडिजच्या संघाला साहित्य मिळण्यास विलंब झाल्याने सामन्याला उशीर झाला. रात्री ११ वाजता दोन्ही संघ मैदानावर उतरले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in