
सलामीवीर क्रेग ब्रॅथवेट (२६८ चेंडूंत ९४) आणि जर्मेन ब्लॅकवुड (१३९ चेंडूंत ६३) यांच्या अर्धशतकांमुळे वेस्ट इंडिजने अँटिग्वा कसोटी सामन्यात बांगलादेशवर पहिल्या डावात १६२ धावांची आघाडी घेतली. वेस्ट इंडिजचा पहिला डाव २६५ धावांत संपुष्टात आला. बांगलादेशने पहिल्या डावात १०३ धावा केल्या होत्या. त्यानंतर सामन्याच्या तिसऱ्या दिवशी दुसऱ्या डावात बांगलादेशने शेवटचे वृत्त हाती आले, तेव्हा ४ बाद ८४ धावांपर्यंत मजल मारली होती.
दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी वेस्ट इंडिजने दिवसाची सुरुवात २ बाद ९५ वरून पुढे सू केली. १३४ धावांवर नक्रुमाह बोनरची (९६ चेंडूंत ३३) विकेट गमावली. क्रेग ब्रॅथवेट (२६८ चेंडूंत ९४) आणि जर्मेन ब्लॅकवुड (१३९ चेंडूंत ६३) यांनी चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. ब्रॅथवेटचे शतक होण्यासाठी केवळ सहा धावांची आवश्यकता होती मात्र खालीद अहमदने त्याला पायचीत केले.
मेहदी हसनने घेतल्या चार विकेट
बांगलादेशचा फिरकी गोलंदाज मेहदी हसन मिराजने विंडीजच्या मधली फळी कापून काढली. गुडाकेश मोतीने २१ चेंडूंत नाबाद २३ धावा केल्या. बांगलादेशकडून मेहदी हसन मिराजने ५९ धावांच्या मोबदल्यात चार बळी टिपले. त्याचवेळी खालिद अहमद आणि इबादत हुसेन यांनी प्रत्येकी दोन बळी मिळविले.