वेस्ट इंडिजकडून आफ्रिकेला 'व्हाईट वॉश'; तिसऱ्या सामन्यात ८ गडी राखून वर्चस्व, मालिका ३-० ने खिशात

रोमारिओ शेफर्डने (१४ धावांत २ बळी) पुन्हा एकदा केलेल्या अप्रतिम गोलंदाजीच्या बळावर वेस्ट इंडिजने तिसऱ्या टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेला ८ गडी आणि २२ चेंडू राखून धूळ चारली. याबरोबरच विंडीजने मालिकेत ३-० असे निर्भेळ यश संपादन केले.
वेस्ट इंडिजकडून आफ्रिकेला 'व्हाईट वॉश'; तिसऱ्या सामन्यात ८ गडी राखून वर्चस्व, मालिका ३-० ने खिशात
एक्स @windiescricket
Published on

त्रिनिदाद : रोमारिओ शेफर्डने (१४ धावांत २ बळी) पुन्हा एकदा केलेल्या अप्रतिम गोलंदाजीच्या बळावर वेस्ट इंडिजने तिसऱ्या टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेला ८ गडी आणि २२ चेंडू राखून धूळ चारली. याबरोबरच विंडीजने मालिकेत ३-० असे निर्भेळ यश संपादन केले.

प्रथम फलंदाजी करताना आफ्रिकेच्या संघाला १३ षटकांत ४ बाद १०८ धावाच करता आल्या. पावसाच्या व्यत्ययामुळे सामन्यातील षटके कमी करण्यात आली. रायन रिकेलटन (२७) व ट्रिस्टन स्टब्स (४०) यांनी चांगली फलंदाजी केली. मात्र विंडीजच्या गोलंदाजांनी तरीही आफ्रिकेवर अंकुश ठेवला. शेफर्डने रिकेलटन व मार्करमला बाद केले.

लक्ष्याचा पाठलाग करताना विंडीजने ९.२ षटकांतच ११६ धावांचे लक्ष्य गाठले. शाय होपने २४ चेंडूंत नााद ४२, तर शिम्रॉन हेटमायरने १७ चेंडूंत नाबाद ३१ धावा फटकावल्या. निकोलस पूरनने १३ चेंडूंत ३५ धावांचे योगदान दिले. शेफर्ड सामनावीर, तर ३ सामन्यांत १३४ धावा करणारा अनुभवी सलामीवीर होप मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

logo
marathi.freepressjournal.in