महिला कुस्तीपटूंच्या व्हिसासाठी प्रयत्न; WFI ची अमेरिकन दूतावासाकडे धाव

अमेरिकेतील लास वेगास येथे होणाऱ्या २३ वर्षांखालील जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेसाठी व्हिसा नाकारण्यात आलेल्या चार भारतीय महिला कुस्तीपटूंना दिलासा मिळण्याची भारतीय कुस्ती महासंघाला (डब्ल्यूएफआय) आशा आहे.
महिला कुस्तीपटूंच्या व्हिसासाठी प्रयत्न; WFI ची अमेरिकन दूतावासाकडे धाव
महिला कुस्तीपटूंच्या व्हिसासाठी प्रयत्न; WFI ची अमेरिकन दूतावासाकडे धाव
Published on: 

नवी दिल्ली : अमेरिकेतील लास वेगास येथे होणाऱ्या २३ वर्षांखालील जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेसाठी व्हिसा नाकारण्यात आलेल्या चार भारतीय महिला कुस्तीपटूंना दिलासा मिळण्याची भारतीय कुस्ती महासंघाला (डब्ल्यूएफआय) आशा आहे. महिलांच्या स्पर्धेला बुधवारपासून सुरुवात होणार असल्याने अमेरिकन दूतावासाने निर्णयाचा फेरविचार करून कुस्तीपटूंना व्हिसा द्यावा, यासाठी महासंघ प्रयत्नशील आहे.

वय २० वर्षांपेक्षा कमी आणि बेरोजगार असल्याचे कारण देत पाच ग्रीको-रोमन आणि चार महिला कुस्तीपटूंचे व्हिसा अर्ज नाकारण्यात आले आहेत. महिला गटातील परवीन (५० किलो), अहिल्या शत्रुघ्न शिंदे (५५ किलो), नेहा शर्मा (५७ किलो) आणि नेहा सांगवान (६५ किलो) यांचा त्यात समावेश आहे.

महासंघाचे सहसचिव विनोद तोमर यांनी या प्रकरणी सकारात्मक निर्णयाची अपेक्षा व्यक्त केली. या कुस्तीपटूंनी स्पर्धेसाठी मेहनत घेतली असून, त्यांना जागतिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळावी, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

२३ वर्षांखालील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेला सोमवार, १२ ऑक्टोबरपासून लास वेगास येथे सुरुवात होणार आहे.

या खेळाडूंना मिळाला व्हिसा

स्वीटी (५३ किलो), कोमल (५९ किलो), वैष्णवी पाटील (६५ किलो), मानसी लाठर (६८ किलो), अमृता पुजारी (७२ किलो) आणि दीक्षा मलिक (७६ किलो) या महिला कुस्तीपटूंना व्हिसा मिळाला आहे. पुरुषांच्या फ्रीस्टाइल गटातील सर्व कुस्तीपटूंनाही व्हिसा देण्यात आला आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in