महिला कुस्तीपटू लैंगिक शोषण प्रकरण; कुस्तीपटूंची आता सर्वोच्च न्यायालयात धाव

भारतीय कुस्ती महासंघाचे प्रमुख बृजभूषण सिंह आणि इतर प्रशिक्षकांनी अल्पवयीन महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप काही कुस्तीपटूंनी केला होता.
महिला कुस्तीपटू लैंगिक शोषण प्रकरण; कुस्तीपटूंची आता सर्वोच्च न्यायालयात धाव
Published on

भारतीय कुस्ती महासंघाचे (डब्ल्यूएफआय) प्रमुख बृजभूषण सिंह आणि इतर प्रशिक्षकांनी अल्पवयीन महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप काही भारतीय कुस्तीपटूंनी केला होता. याप्रकरणी जानेवारी महिन्यात जंतर मंतरवर विनेश फोगाट, बजरंग पुनियांसह अनेक खेळाडूंनी आंदोलनेही केली. परंतु, याप्रकरणी अद्याप कोणावरही कारवाई न झाल्याने भारतीय कुस्ती संघातील वरिष्ठ खेळाडूंनी रविवारी पुन्हा आंदोलन पुकारले. आता बृजभूषण सिंह यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करावा, याची मागणी करण्यासाठी राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेती विनेश फोगट हिच्यासह सात इतर खेळाडूंनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

बृजभूषण सिंह यांच्यासह इतर आरोपींवर जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत इथून हटणार नसल्याची भूमिका आंदोलनकर्त्या खेळाडूंनी जाहीर केली. यानंतर आंदोलनकर्त्या खेळाडूंनी न्याय मागण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. बृजभूषण सिंह यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करावा, याची मागणी करण्यासाठी राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेती विनेश फोगट हिच्यासह सात इतर खेळाडूंनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.

याविषयी ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती महिला कुस्तीपटू साक्षी मलिक म्हणाली, “जानेवारी महिन्यात हे प्रकरण उजेडात आल्यानंतर महिला कुस्तीपटू लैंगिक शोषणप्रकरणी चौकशी करण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीने केंद्रीय क्रीडा मंत्र्यांना अहवाल सादर केला आहे. परंतु, अहवाल अद्यापही सार्वजनिक केला नाही. तसेच संबंधितांवर कोणतीही कारवाई झाली नाही.”

“आम्हाला न्याय मिळेपर्यंत आम्ही इथेच जेवणार आणि झोपणार आहोत. आम्ही तीन महिन्यांपासून क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर आणि इतर संबंधित प्राधिकरणाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहोत. समितीचे सदस्य आम्हाला प्रतिसाद देत नाहीत, क्रीडा मंत्रालयाकडूनही काही सांगण्यात येत नाही. ते आमचे कॉलही उचलत नाहीत. आम्ही देशासाठी पदके जिंकली आहेत आणि यासाठी आमचे करिअर पणाला लावले आहे,” असे विनेश फोगटने सांगितले.

जबाब नोंदवणारा अहवाल सार्वजनिक करा!

“महिला कुस्तीपटूंचे जबाब नोंदवणारा अहवाल सार्वजनिक व्हावा, अशी आमची इच्छा आहे. हा एक संवेदनशील मुद्दा आहे, तक्रारकर्त्यांपैकी एक अल्पवयीन मुलगी आहे,” असेही साक्षी मलिकने सांगितले. वारंवार प्रयत्न करूनही सरकारकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याचे राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेत्या विनेश फोगटचे म्हणणे आहे.

logo
marathi.freepressjournal.in