या टोपीखाली दडलंय काय?

आशिया चषक स्पर्धेत रोहितला आतापर्यंत मोठी खेळी करण्यात अपयश आले आहे.
या टोपीखाली दडलंय काय?

रविवारी आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत होऊ घातलेल्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यापूर्वी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा एक कसली तरी मोठी घोषणा करून धम्माल उडवून देणार आहे, म्हणे. रोहितने या गोष्टीचे संकेत सोशल मीडियावर दिले आहेत. याबाबतच्या वार्ता प्रसृत झाल्यापासून चर्चांचे उलटसुलट केवळ चर्वितचर्वणच सुरू झाले आहे, असे नाही; तर रोहितच्या चाहत्यांनी वेगवेगळे आडाखे बांधायलाही सुरुवात केली आहे. कसली बरी मोठी घोषणा करणार आहे, रोहित? रोहितच्या ‘या टोपीखाली दडलंय काय?’ असे कुतूहल निर्माण झाले आहे खरे; पण त्याचबरोबर कमालीची रहस्यमयताही निर्माण झाली आहे, खचितच. ‘सांगा मित्र हो, सांगा बंधू हो, सांगा दोस्त हो, सांगा सांगा...’ असेच म्हणण्यासारखे सारेजण अधीर झाले असणार.

आशिया चषक स्पर्धेत रोहितला आतापर्यंत मोठी खेळी करण्यात अपयश आले आहे. असे असतानाच रोहित आता रविवारी कसलीशी मोठी घोषणा करणार असल्याने शंकेची पाल मनात चुकचुकण्याचे ‘तसे’ कारण नाही. त्याचे भवितव्य उज्ज्वल आहे. त्याला अजून खूप खूप खेळायचे आहे आणि हे तो स्वतः जाणून आहे. कर्णधार म्हणूनही तो यशस्वी ठरत आहे. तेव्हा त्याचा दुसराच काहीतरी ‘उद्योग’ दिसतोय. रोहितच्या घोषणेनंतर सर्वांनाच मोठा धक्का बसू शकतो, असे सांगितले जात आहे. त्यामुळे उत्कंठा आणखीनच वाढली आहे. ‘कुणीतरी अशी पटापट गंमत आम्हा सांगेल काय...’ अशीच रोहितच्या अधीर चाहत्यांची गत झाली असणार. रोहित रविवारी काय बोलणार, याचाच बोलबाला सुरू आहे, खरोखरच. काही चाहत्यांनी रोहितने नवीन निर्मिती संस्था काढल्याचेही म्हटले आहे. या अशा तर्क-वितर्कामुळे रोहित नेमकी कसली घोषणा करणार, याविषयीची उत्कंठा आणि उत्सुकता रहस्यमय चित्रपटाप्रमाणेच आणखीनच शिगेला पोहोचली आहे. गुलदस्त्यातील ही बाब आता लवकरच उघड होणार असली, तरी रोहित एका सिनेमात अभिनय करणार असल्याचे सांगण्यात येते; पण याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. इन्स्टाग्रामवर झळकलेल्या पोस्टरवरून मात्र रोहित सिनेमात चक्क अभिनय करणार असल्याचेच संकेत मिळत आहेत. हे पोस्टर सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झाले आहे. या पोस्टरवर ‘स्टारिंग रोहित शर्मा’ (भूमिकेत रोहित शर्मा) असे लिहिले आहे. शिवाय, ‘मेगाब्लॉकबस्टर’ असेही मोठ्या अक्षरात लिहिले आहे. ‘ट्रेलर ४ सप्टेंबर रोजी रिलिज होईल,’ अशा आशयाचाही उल्लेख आहे. त्यामुळे रोहितचा नवीन सिनेमा येतोय की काय, असेच वाटत आहे.

रोहितला सिनेमात काम करायचे की कसे, हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे; परंतु क्रिकेट कारकीर्द उत्तुंग टप्प्यावर असताना रोहितने मन भरकटू देऊ नये, असे वाटते. चाहत्यांना त्याची फलंदाजी ‘झिंग झिंग झिंगाट’ वाटत असते. ‘याची धुंद काही और, दुःख जाई विसरून...’ अशीच रोहितची फलंदाजी पाहताना चाहत्यांची भावना असते, जणू. रोहितला अनेकविध विक्रम खुणावत आहेत. नवनवे विक्रम प्रस्थापित करून इतिहास घडविण्याची त्याला नामी संधी आहे. ‘काळाचे भान’ ठेवत त्याने खेळाकडेच लक्ष्य केंद्रित केलेले उत्तम. अन्य कशातही मन गुंतवून घेताना करिअरचा त्याने गंभीरपणे विचार करावा. त्यातच ‘चमचमणाऱ्या चांदण्या जैसी’ असलेली चित्रपटसृष्टी साखरेसारखी गोड अन‌् ‘मोगरीवरल्या दवा जैसी’ असली, तरी रोहितने मैदानावरील दवावरच लक्ष केंद्रित केलेले बरे! सुनील गावसकर, संदीप पाटील, विनोद कांबळी व अन्य काही क्रिकेटपटूंनी चंदेरी ‘मुकुट’ परिधान केला होता; पण मैदानात लख्ख प्रकाशात चमकणाऱ्या या स्टार्सना थिएटर्समधील काळोखात उजेड पाडण्यात अपयश आले.

मैदान सांभाळून पडद्यावर चमकायचे म्हटले, तरी निष्कारण ‘दोन्ही घरचा पाहुणा उपाशी’ अशी स्वतःची गत व्हायची. पुन्हा ‘मेरे अंगने में तुम्हारा क्या काम हैं...’ असेही प्रस्थापितांना वाटून जायचे. त्यातच चित्रपट हिट झाला तर ठीक; अन्यथा घरदार वीक, अशीच संभावना अधिक. हे ‘भगवान’! म्हणण्याची वेळ भल्या-भल्यांवर आली होती, हे विसरून चालणार नाही. पुन्हा कधी काळी मैदान गाजविणाऱ्या तथाकथित समालोचकांच्या डोळ्यातही उगाचच खुपायचे! रोहित शर्मा फार काळ कर्णधार म्हणून टिकणार नाही, असा नकारात्मक सूर पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू मोहम्मद हाफीजनेही आळवलाच आहे ना!

पाकिस्तानच्या ‘पीटीव्ही’ चॅनेलवरील चर्चासत्रात हाफीजने सांगितले की, “कर्णधार झाल्यापासून रोहितची देहबोली दुबळी आणि गोंधळल्यासारखीअसते.” आता बोला! हाफीज पुढे म्हणाला, “रोहित नाणेफेकीसाठी येताना घाबरलेला दिसतो. आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत बिनधास्त खेळणारा रोहित दिसला नाही. कर्णधारपदाच्या जबाबदारीमुळे रोहितवर मोठा दबाव आहे. यामुळे त्याला अनेक अडचणी येत आहेत. स्वतःचा फॉर्म बिघडत असताना नेतृत्वाची जबाबदारी रोहितला झेपत नाही.”

रोहितला आयपीएलचा हंगाम वाईट गेल्याकडेही हाफीजने लक्ष वेधले. आयपीएलनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतानाही रोहितची कमाल दिसली नाही, असे सांगत असतानाच हाफीजला रोहितमध्ये हल्ली आत्मविश्वासही कमी असल्याचा साक्षात्कार झाला. रोहित आता आणखी फार वेळ भारताचा कर्णधार राहणार नसल्याने भारतीय संघाच्या निवडकर्त्यांनी याविषयी ठोस निर्णय घेण्याची गरज असल्याचेही हाफीज बरळला.

तेव्हा हे असे हे तथाकथित टीकाकार एखाद्याच्या वाईटावर टपून बसतात, असे म्हणता येत नसले, तरी नसत्या उणिवांवर बोट ठेवायला सरवावलेलेच असतात, हमखास. भारताने आशिया चषक २०२२ मध्ये विजयाचे सातत्य राखले. भारताने आपला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर पाच गडी राखून विजय मिळवित आपल्या मोहिमेची धडाक्यात सुरुवात केली. हाँगकाँगला नमवित आपला दबदबा कायम ठेवला. ‘सुपर फोर’मध्ये भारताने धडक मारली. आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत रोहितचे नेतृत्व कौतुकास्पद ठरले. तेव्हा आपल्या मैदानात यशोशिखरावर असताना ‘अंगण’ कशाला धुंडाळायचे? जिथे आपण राजे झालो, त्या मैदानातच अधिराज्य गाजवायला हवे, हे रोहितने ध्यानात ठेवले पाहिजे. साम्राज्य विस्तार करायचा तर पुन्हा लढावे लागणार. संघर्ष करावा लागणार. या प्रयत्नात आपल्या मूळ क्रिकेट साम्राज्याकडे दुर्लक्ष होणार. मैदानावरील लय बिघडली की, पुन्हा मग पेटवापेटवी करायला नतद्रष्टाना आयते कोलीत मिळणार. रोहितने आपले हित मैदानावर हिट मारण्याच्या फटक्याप्रमाणेच अचूक निवडावे. सद्‌गृहस्थांच्या या खेळात आपली क्रिकेटपटू म्हणून असलेली ओळखच रोहितने टिकवून ठेवावी, एवढेच ‘फायनल’ सुचवावेसे वाटते, निश्चितच!

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in