टीम बनविताना त्यामागे सखोल विचार असतो, कर्णधार रोहित शर्माचे रोखठोक मत

टीम बनविताना त्यामागे सखोल विचार असतो, कर्णधार रोहित शर्माचे रोखठोक मत

रोहितने सांगितले की, प्रत्येक जण चढ-उताराचा सामना करीत असतो.
Published on

आमची स्वतःची विचार प्रक्रिया असते. आम्ही टीम बनविताना त्यामागे सखोल विचार असतो. आम्ही खेळाडूंना सपोर्ट करतो आणि त्यांना संधी देतो. या गोष्टी बाहेरून कळत नाहीत, अशा रोखठोक शब्दात कर्णधार रोहित शर्माने विराट कोहलीच्या उचलबांगडीचा आग्रह धरणारे माजी क्रिकेटपटू कपिलदेव निखंज यांना फटकारले.

पत्रकार परिषदेत रोहित म्हणाला की, बाहेरून खेळ पाहताना आत काय चालले आहे, त्याची कल्पना कोणी करू शकत नाही. संघांचे हित पाहूनच निर्णय घ्यायचे असतात.

रोहितने सांगितले की, प्रत्येक जण चढ-उताराचा सामना करीत असतो. त्यामुळे खेळाडूच्या गुणवत्तेवर परिणाम होत नाही. म्हणूनच आपण या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. जेव्हा एखादा खेळाडू इतकी वर्षे चांगली कामगिरी करत असतो, तेव्हा एक किंवा दोन वाईट मालिका त्याला वाईट खेळाडू बनवत नाही. आपण त्याच्या मागील कामगिरीकडे दुर्लक्ष करता कामा नये.

तो पुढे म्हणाला की, खेळाडूचे महत्त्व आम्हाला माहीत आहे. कोणालाही भाष्य करण्याचा पूर्ण अधिकार आहे; मात्र त्या गोष्टींना आम्ही महत्त्व देत नाही.

कोहलीची निराशाजनक कामगिरी इंग्लंडविरुद्धच्या अंतिम टी २० सामन्यातही कायम राहिली. गेल्या अनेक दिवसांपासून कोहली खराब फॉर्मशी झगडताना दिसत आहे. त्याची खराब कामगिरी पाहता अनेक क्रिकेटतज्ज्ञांनी त्याला ब्रेक घेण्याचा सल्ला दिला आहे, तर काहींनी त्यांला संघातून वगळण्याचा सल्ला दिला आहे; मात्र कर्णधार रोहितने त्याची पाठराखण केली आहे.

इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेतील दोन सामन्यांमध्ये विराटला केवळ १२ धावा करता आल्या. त्याच्या या अपयशी खेळीवर काही दिवसांपूर्वी कपिलदेव यांनी भाष्य केले होते की, जेव्हा क्रमांक दोनचा गोलंदाज असलेल्या आर. अश्विनला कसोटी संघातून वगळले जाऊ शकते, तर विराट कोहलीला टी-२० संघातून का वगळले जाऊ शकत नाही. तो सध्याच्या सेटअपमध्ये फिट नाही.

जर विराट कामगिरी करत नसेल तर दीपक हुडासारख्या तरुणांना बाहेर ठेवू शकत नाही, असेही कपिलदेव यांनी म्हटले होते.

logo
marathi.freepressjournal.in