२०१६ मध्ये मायदेशात झालेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकात यजमान भारताला अंतिम फेरी गाठण्यात अपयश आले. वेस्ट इंडिजविरुद्ध उपांत्य लढतीत भारताने पराभव पत्करला, मात्र त्या विश्वचषकातील साखळी फेरीत पाकिस्तानविरुद्ध विराट कोहलीने साकारलेली झुंजार खेळी आणि अर्धशतकानंतर त्याने सचिन तेंडुलकरला वाकून केलेले अभिवादन चाहत्यांना आजही स्मरणात आहे.
१९ मार्च, २०१६ रोजी कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर झालेल्या या सामन्यात पावसाने व्यत्यय आणला. त्यामुळे १८ षटकांच्या या लढतीत पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद ११८ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्मा (१०), शिखर धवन (६) आणि सुरेश रैना (०) स्वस्तात माघारी परतल्यामुळे भारताची एकवेळ ३ बाद २३ अशी दैना उडाली. त्यामुळे भारतीय संघ विश्वचषकात प्रथमच पाकिस्तानकडून पराभव पत्करणार असे वाटले, मात्र त्यानंतर कोहलीने जबाबदारीने फलंदाजी केली. त्याने सात चौकार आणि एका षटकारासह अर्धशतक साकारले. यादरम्यानच, अर्धशतकासाठी एकेरी धाव घेतल्यावर कोहलीने स्टँडमध्ये बसलेल्या सचिन तेंडुलकरला वाकून नमस्कार केला. सचिन हा कोहलीचा आदर्श असल्याने स्टेडियममधील सर्व प्रेक्षकही हे पाहून भारावले. भारताने ती लढत सहा गडी राखून जिंकली. पुढे ऑस्ट्रेलियाला धूळ चारून भारताने उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यावेळीही कोहलीनेच जिगरबाज खेळी साकारली.
दुर्दैवाने उपांत्य फेरीत भारताला वेस्ट इंडिजने नमवले आणि त्यांचे विजेतेपदाचे स्वप्न उद््ध्वस्त झाले. आता आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषकाला फक्त दोन दिवस शिल्लक असताना कोहली पुन्हा एकदा त्याच लयीत खेळेल, अशी चाहत्यांना अपेक्षा आहे. २३ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्धच्याच लढतीने भारतीय संघ विश्वचषकाच्या अभियानाला प्रारंभ करणार आहे. त्यातच कोहलीने विश्वचषकापूर्वी शतकदुष्काळही संपुष्टात आणला असून, त्याच्यावर निश्चितच भारतीय फलंदाजांची भिस्त आहे, असे म्हटलं तर वावगे ठरणार नाही.