... जेव्हा सुनील गावसकर धोनीची स्वाक्षरी घेतात
आयपीएल २०२३च्या ६१व्या सामन्यानंतर मैदानावर असे काही घडले ज्याची महेंद्रसिंह धोनीच्या कोणत्याही चाहत्याला अपेक्षा नसेल. भारताचे महान क्रिकेटपटू सुनील गावसकर हे मैदानात धावत-धावत माहीजवळ आले आणि त्यांनी धोनीला शर्टवर ऑटोग्राफ देण्याची विनंती केली. धोनीनेसुद्धा लिटल मास्टर गावसकरांच्या विनंतीला मान देऊन छानशी अशी ऑटोग्राफ दिली.
चेन्नई आणि कोलकाता यांच्यात रविवारी चेन्नईतील चेपॉक स्टेडियममध्ये सामना झाला. चेन्नईला ही लढत गमवावी लागली असली तरी धोनीची झलक पाहण्यासाठी चाहते स्टेडियममध्ये तुडुंब गर्दी करत आहेत. त्यातच चेन्नईचा हा यंदाच्या हंगामातील घरच्या मैदानावरील अखेरचा साखळी सामना होता. सामना संपल्यानंतर धोनीसह चेन्नईच्या सर्व खेळाडूंनी मैदानात राऊंड मारून चाहत्यांचे आभार मानले. यादरम्यान धोनीने रॅकेटने टेनिस चेंडू प्रेक्षकांत भिरकावले. तसेच चेन्नईचे पिवळ्या रंगातील टी-शर्ट्सही वाटले. यावेळीच मैदानाच्या एका बाजूला असलेले गावसकर धावत-धावत धोनीच्या बाजूला येताना दिसले. त्यांनी लगेगच खिशातील पेन धोनीला काढून देत त्याला शर्टावर स्वाक्षरी करण्यास सांगितले. धोनीनेसुद्धा प्रथम गावसकर यांना आलिंगन दिले व त्यांच्या विनंतीचा मान राखून लगेच ऑटोग्राफ दिले. भारतीय क्रिकेटच्या दोन पिढ्यांतील महानायकांमध्ये रंगलेला हा क्षण कॅमेऱ्यात कैद करून ठेवण्यासारखा होता. त्यामुळे या घटनेचा साक्षीदार झालेल्यांना फार अभिमान वाटणे स्वाभाविक आहे. मुख्य म्हणजे पायाला काहीशी दुखापत असतानाही धोनी हंगामात सर्व सामने खेळत आहे. रविवारी चाहत्यांचे अभिवादन करतानासुद्धा तो पायाला ‘नी कॅप’ बांधून आला होता. समाज माध्यमांवर धोनीवर सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे.
यंदाच्या मोसमात धोनीने चेन्नईचा कर्णधार म्हणून २००वा सामना खेळला तेव्हा गावसकर यांनी त्याला आयपीएल इतिहासातील सर्वोत्तम कर्णधार म्हणून संबोधले. १७ एप्रिल रोजी गावसकर म्हणाले होते की, “चेन्नई सुपर किंग्ज संघाला कठीण परिस्थितीतून कसे बाहेर पडायचे हे माहित आहे आणि हे केवळ धोनीच्या नेतृत्वाखालीच शक्य झाले आहे. कोणत्याही एका संघासाठी २०० सामने नेतृत्व करणे खूप कठीण असते, कर्णधारपद हे ओझ्यासारखे असते ज्यामुळे खेळाडूच्या कामगिरीवर परिणाम होतो, पण माही वेगळा आहे. त्याच्यासारखा कर्णधार आजवर झाला नाही आणि भविष्यातही त्याच्यासारखा कोणी होणार नाही. गेल्या काही वर्षांत त्याने भारतीय क्रिकेटसाठी जे काही केले, ते अलौकिक आहे.”