भारताच्या 'या' खेळाडूकडे निवड समितीचे लक्ष कधी जाणार ?

कसोटी क्रिकेटसाठी अशाच चिवट, झुंजार, संयमी खेळाडूची आवश्यकता असते, याकडे दुर्लक्ष होऊ देता कामा नये
भारताच्या 'या' खेळाडूकडे निवड समितीचे लक्ष कधी जाणार ?

सध्या आयपीएल लीग ऐन रंगात आलेली असतानाच भारताच्या मधल्या फळीचा आधारस्तंभ आणि आयपीएलमधील लखनऊ सुपरजायंट्स संघाचा कर्णधार असलेला के. एल. राहुल दुखापतग्रस्त झाल्याने दर्दी क्रिकेट शौकिनांना आणि जाणकारांना जागतिक कसोटी अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेची (वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप) हटकून आठवण आल्याशिवाय राहणार नाही, खचितच. कारण के. एल. राहुल हा जागतिक कसोटी अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेसाठी निवडलेल्या भारतीय संघाचा भाग होता. राहुल या स्पर्धेच्या अंतिम सामन्यापर्यंत तंदुरूस्त होऊ शकणार नसल्याने पर्यायी खेळाडू म्हणून कोणाची निवड करायची, याचा निवड समितीलाही आतापासूनच धुंडाळा घ्यावा लागणार आहे, निश्चितच.

राहुल मांडीच्या दुखापतीमुळे फक्त आयपीएलच नव्हे; तर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यातूनही बाहेर झाला आहे. याबाबतची माहिती राहुलने स्वतः पोस्ट करून दिली आहे. राहुल हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्धच्या सामन्यादरम्यान गंभीर जखमी झाला होता. त्याच्या मांडीला जबर दुखापत झाली होती. त्यानंतर स्कॅनमध्ये त्याला टियर झाल्याचे दिसून आले. आता राहुलवर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे.

सोशल मीडियावर पोस्ट करत राहुलने लिहिले की, “वैद्यकीय टीमशी सल्लामसलत आणि विचारविनिमय केल्यानंतर आता लवकरच मांडीवर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. मला तंदुरुस्त होण्यावर आणि पुनरागमनावर भर द्यावा लागणार आहे. शस्त्रक्रिया हा एक कठीण निर्णय आहे; परंतु पूर्णतः तंदुरुस्त होण्यासाठी हेच योग्य आहे.” जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमधून बाहेर पडल्याबद्दल राहुल म्हणाला, "फायनलसाठी मी ओव्हलवर भारतीय संघासोबत नसेन. त्यामुळे मी खूप निराश आहे. भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करीन. त्यालाच माझे प्राधान्य राहील."

त्याने पुढे लिहिले की “प्रोत्साहन आणि मेसेजेस माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळेच मला अधिक जोमाने आणि तंदुरुस्त होऊन परत येण्यासाठी उत्तेजन मिळत राहील.” पुनरागमन करण्याचा निर्धार व्यक्त करताना राहुलने नमूद केले की, दुखापतीतून सावरणे अवघड असते; पण मी नेहमीप्रमाणेच भारतीय संघासाठी पुनरागमनाचा आटोकाट प्रयत्न करीन.'' राहुलचे हे धैर्य कौतुकास्पद आहे. म्हणतात ना, ''हिम्मत-ए-मर्दा तो मदद-ए-खुदा''!

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात जागतिक कसोटी अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना ७ ते ११ जून या कालावधीत इंग्लंडच्या केनिंगटन ओव्हल मैदानात होणार आहे. राहुल यंदाच्या आयपीएलमध्ये शानदार फॉर्ममध्ये होता. त्याने ३४.२५च्या सरासरीने २७४ धावा केल्या. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारतासाठी सलामी देताना त्याने दोन शतकी खेळी केल्या होत्या. आता जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी राहुलच्या तोडीस तोड खेळाडू शोधण्याचे मोठेच आव्हान निर्माण झाले आहे. राहुलच्या जागी कोणत्या खेळाडूची निवड होणार याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राहुलच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये पाचव्या क्रमांकासाठी खेळाडूची गरज आहे.

आयपीएल लीगचे सामने अगदी अखेरच्या षटकापर्यंत; किंबहुना शेवटच्या चेंडूपर्यंत अटीतटीचे होत असले, तरी विशिष्ट खेळाडूच्या या लीगमधील सामन्यातील कामगिरीच्या आधारे निवड समितीला कसोटी संघासाठी निवड करता येणार नाही आणि तसे करताही कामा नये. टी-२० आणि कसोटी हे दोन भिन्न आणि परस्पर विरोधी फॉरमॅट आहेत. कसोटी क्रिकेटसाठी प्रदीर्घ चिकाटी, कमालीची एकाग्रता आणि मजबूत तंदुरुस्ती यांची आवश्यकता असते. आयपीएल लीगमधून चपळ, धडाकेबाज, चुनचुनित असा खेळाडू मिळूही शकेल, कदाचित. परंतु संयम, परिपक्वता, अनुभव, समयसूचकता, प्रसंगावधान, समर्पण, बुद्धीचातुर्य या कसोट्यांवर तो कसोटी सामन्यासाठी कितपत यशस्वी ठरू शकेल, याबाबत मात्र सदैव संभ्रम राहील. तेव्हा असा खेळाडू शोधून काढावा लागेल, जो कसोटीसाठी 'खरा' उतरेल आणि क्रिकेटमध्ये पुरता मुरलेला आणि तावूनसुलाखून निघालेला असेल.

आता अशा खेळाडूची निवड करायची; तर निवड समितीला 'हनुमान चालीसा' पठण करण्याचीही आवश्यकता नाही. फारतर क्रिकेट हा खेळ अनिश्चिततेचा असल्याने अनुकूल निकाल मिळण्यासाठी मात्र 'हनुमान चालीसा' म्हणता येईल. देशांतर्गत क्रिकेटचा मागोवा घेतल्यास काही दर्जेदार खेळाडू 'कसोटी'च्या निकषांवर उतरू शकतील, हमखास. मात्र आता “काखेत कळसा गावला वळसा कशाला, बोला...!” हनुमान चालीसा'वरून आठवले. हनुमा विहारी! होय, तोच तो हनुमा विहारी! जिगरी खेळाडू!!

रवी शास्त्री हे टीम इंडियाचे हेड कोच आणि विराट कोहली कॅप्टन असताना हनुमा विहारी भारतीय कसोटी संघात महत्त्वपूर्ण खेळाडू राहिला होता. मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड आणि कर्णधार म्हणून रोहित शर्मा आल्यानंतर हनुमा हा प्रशिक्षक आणि कर्णधार यांच्या महत्त्वाकांक्षी दृष्टिकोनामुळे दुर्लक्षित राहिला. आता त्याला आजमावून पाहण्याची हीच वेळ आहे. आतापासूनच पर्याय निवडला; तर ''भिर भिर फिरता पाखरावानी, कुठच दाना मिळणा..' अशी गतही निवडकरत्यांची ऐनवेळी होणार नाही, मुळी. “भरलंय कणिस तुमच्या बाजुला, कसं तुम्हाला कळंना...” असे हिणवण्याचीही कोणाची हिम्मत होणार नाही. शिवाय, हनुमालाही सरावासाठी अवधी मिळेल.

हनुमा विहारीने १६ कसोटी सामने खेळलेले आहेत. त्यात त्याने एक शतक आणि पाच अर्धशतके झळकाविलेली आहेत. म्हणूनच जागतिक कसोटी अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात हनुमा हा भारतासाठी प्रभावी ठरू शकतो. हनुमाने २०१८-१९ आणि २०२०-२१ मध्ये दोन वेळा ऑस्ट्रेलियाचा दौरा केला आहे. हनुमाने जानेवारी २०२१ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी कसोटी सामन्यात दुखापत होऊनही १६१ चेंडूमध्ये नाबाद २३ धावांची चिवट खेळी करून सामना अनिर्णीत राखण्याची किमया साधली होती, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कसोटी क्रिकेटसाठी अशाच चिवट, झुंजार, संयमी खेळाडूची आवश्यकता असते, याकडे दुर्लक्ष होऊ देता कामा नये. ऑस्ट्रेलियाचे वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क, जोश हेझलवूड आणि पॅट कमिन्स यांच्या तोफखान्यापुढे तग धरण्यास हनुमा सक्षम ठरू शकतो; तो यामुळेच! शिवाय, हनुमा अष्टपैलू असल्याने गरज पडल्यास फिरकी गोलंदाजीही करू शकतो.

यष्टिरक्षक फलंदाज इशान किशन, देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुरलेला संजू सॅमसन, आयपीएलमध्ये आपला ठसा उमटवणारा जितेश शर्मा यांच्या नावाची चर्चा सुरू झाली असली; तरी हनुमा विहारी हा योग्य पर्याय ठरण्याची दाट शक्यता आहे. हनुमाच्या तोडीचे अन्य खेळाडू मिळूही शकतील; पण हनुमाची आतापर्यंतची कामगिरी त्याची दावेदारी सिध्द करण्यास आणि पाचव्या स्थानावर फलंदाजीसाठी त्याच्या नावाची चर्चा होण्यास पुरेशी आहे. आयपीएलमधील 'इम्पॅक्ट खेळाडू ' च्या नव्या नियमामुळे भविष्य काळात अष्टपैलू खेळाडू दुरापास्त होण्याची शक्यता असल्याने जे सध्या उपलब्ध आहेत, त्यांचा वापर करून घेण्यास काय हरकत आहे?

तेव्हा हनुमा विहारीची टीम इंडियातील एंट्री फलदायी ठरू शकते. हा जिगरबाज खेळाडू बाजीगर ठरू शकतो. हा खेळाडू मॅचविनर ठरण्याची शक्यतासुद्धा नाकारता येत नाही, खरोखरच.

yashodattpatekar@gmail.com

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in