नवी दिल्ली : दुहेरी ऑलिम्पिक पदकविजेती पी. व्ही. सिंधू, अनुभवी एच. एस. प्रणॉय आणि युवा लक्ष्य सेन हे तीन भारतीय खेळाडू आगामी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनच्या एकेरी गटासाठी पात्र ठरले आहेत. त्याशिवाय पुरुष दुहेरीत सात्विकसाइराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी, तर महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा व तनिषा क्रॅस्टो यांची जोडी भारताचे ऑलिम्पिकमध्ये प्रतिनिधित्व करेल.
२६ जुलैपासून पॅरिस ऑलिम्पिकला प्रारंभ होणार असून आता या स्पर्धेसाठी अवघ्या दोन महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. बॅडमिंटनचे नियम आणि ऑलिम्पिक पात्रतेच्या निकषानुसार क्रमवारीत अव्वल १६ खेळाडूंत समावेश असलेल्यांना ऑलिम्पिकसाठी प्राधान्य देण्यात येते. १ मे, २०२३ ते ३० एप्रिल, २०२४ पर्यंतची क्रमवारी यासाठी ग्राह्य धरण्यात आली. त्यानुसार भारताचे सात बॅडमिंटनपटू यंदा ऑलिम्पिकमध्ये खेळताना दिसतील. स्पर्धेच्या इतिहासात दुसऱ्यांदाच भारताचे इतके खेळाडू ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत.
काही महिन्यांपूर्वी लय मिळवण्यासाठी संघर्ष करणाऱ्या सिंधूच्या पात्रतेविषयी शंका होती. मात्र सिंधूने ३० एप्रिलपर्यंतच्या क्रमवारीत अव्वल १६ खेळाडूंत आपले स्थान टिकवले. २८ वर्षीय सिंधू सध्या क्रमवारीत १२व्या स्थानी आहे. त्यामुळे ती कारकीर्दीतील तिसऱ्या ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली आहे. सिंधूने यापूर्वी २०१६च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये सिंधूने रौप्य, तर २०२०च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावले होते. महिला एकेरीत ती भारताची एकमेव खेळाडू असेल. सायना नेहवाल, अश्मिता छलिहा, अनमोल खर्ब यांना अव्वल १६ खेळाडूंत स्थान मिळवण्यात अपयश आले.
पुरुष एकेरीत ३१ वर्षीय प्रणॉय व २२ वर्षीय लक्ष्य यांच्यावर भारताची भिस्त असेल. प्रणॉय क्रमवारीत नवव्या, तर लक्ष्य १३व्या स्थानी आहे. किदाम्बी श्रीकांत मात्र यंदा ऑलिम्पिकमध्ये खेळताना दिसणार नाही. तो क्रमवारीत २४व्या स्थानी आहे. साईप्रणित व पारुपल्ली कश्यप यांनी निवृत्ती जाहीर केलेली आहे. तर, समीर वर्माला क्रमवारीत आगेकूच करता आली नाही.
पुरुष दुहेरीत सात्विक-चिराग यांच्याकडून भारताला नक्कीच पदकाची अपेक्षा आहे. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या सात्विक-चिरागने गेल्या वर्षभरात ४ स्पर्धा जिंकल्या. आशियाई स्पर्धेतही सुवर्ण काबिज केले. त्याशिवाय महिला दुहेरीत अश्विनी-तनिषा जोडीने गतवर्षी अबू धाबी आणि गुवाहाटी मास्टर्स स्पर्धेचे जेतेपद पटकावले. तसेच ओदिशा आणि सय्यद मोदी स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत मजल मारून क्रमवारीत १३वे स्थान मिळवले.
ऑलिम्पिकसाठी भारताचा बॅडमिंटन चमू
- महिला एकेरी : पी. व्ही. सिंधू
- पुरुष एकेरी : लक्ष्य सेन, एच. एस. प्रणॉय
- महिला दुहेरी : अश्विनी पोनप्पा-तनिषा क्रॅस्टो
- पुरुष दुहेरी : सात्विकसाइराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी