लॉर्ड्स का किंग कौन ?

लॉर्ड्स का किंग कौन ?

न्यूझीलंडविरुद्धच्या लॉर्ड््स कसोटीत इंग्लंडच्या जेम्स अॅन्डरसनने वयाच्या ४० व्या वर्षी एकूण सहा बळी मिळवले. पहिल्या डावात त्याने ६६ वर चार आणि दुसऱ्या डावात ५७ वर दोन असे हे एकूण सहा बळी त्याने नुकत्याच खेळल्या गेलेल्या लॉर्ड्स‌ कसोटीत मिळवले. लॉर्ड्स‌सारख्या ऐतिहासिक ग्राउंडवर सर्वात जास्त कसोटी बळी मिळवण्याचा मान जेम्स अॅन्डरसनलाच मिळवता आला आहे. त्याने या ग्राउंडवर खेळलेल्या एकूण २६ कसोटीत २४.३६च्या सरासरीने सर्वाधिक ११६ बळी घेतले आहेत. त्याच्या खालोखाल याच ग्राउंडवर इंग्लंडच्याच स्टुअर्ट ब्रॉडने दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक बळी मिळवले आहेत. त्याने या ग्राउंडवर २५ कसोटीत खेळताना २८.०६च्या सरासरीने एकूण ९९ बळी घेतले आहेत; मात्र लॉर्ड्स‌वरचा जेम्स अॅन्डरसनचा सर्वाधिक बळींचा रेकॉर्ड दीर्घकाळ टिकण्याची दाट शक्यता दिसते.

या ग्राउंडवर अॅन्डरसनने आपली भारी हुकूमत गाजवली आहे. इथे त्याने २६ कसोटीत खेळताना आपल्या संघाला १३ विजय मिळवून देण्यात मोठी मदतसुद्धा केली. या १३ विजयात त्याने २०.६२च्या सरासरीने ६२ बळींचे योगदान आपल्या संघाला दिले. अॅन्डरसनच्या उपस्थितीत लॉर्ड्स‌वर इंग्लंड संघाचे फक्त सहा कसोटीत पराभव झाले आहेत. त्या पराभवात जेम्स अॅन्डरसनने २१ बळी मिळवलेत. त्याच बरोबर अनिर्णीत राहिलेल्या सहा कसोटीत त्याने २७ बळींची कमाई केली आहे. असा एकूण लॉर्ड्स‌वर अॅन्डरसनच्या गोलंदाजीचा इंग्लिश संघाला फायदा करून घेता आला आहे. हा मजकूर तयार करत असताना लॉर्ड्स‌वर न्यूझीलंडविरुद्धच्या खेळल्या जाणाऱ्या कसोटीतला शेवटच्या दिवसातला खेळ बाकी होता. हा मजकूर तुमच्या हाती पडेपर्यंत या कसोटीतला निकालही वाचकांना समजला असेलच; मात्र एकूणच चित्र पाहता गोलंदाजीच्या बाबतीत लॉर्ड्स‌ का किंग कौन? या प्रश्नाचे उत्तर निश्चितच जेम्स अॅन्डरसन या नावानेच देता येईल.

लॉर्ड्स‌वर फलंदाजांची वाहवा नेहमीच केली जाते; पण गोलंदाजांच्या शानदार कामगिरीला त्या मानाने खूप कमी महत्त्व दिले जाते. जेम्स अॅन्डरसनने या ऐतिहासिक ग्राउंडवर कायम जीव ओतून आपल्या संघासाठी काम केले आहे. इथे त्याने सर्वात जास्त भारत आणि न्यूझीलंड या दोन संघांनाच सतवले आहे. भारताविरुद्ध त्याने लॉर्ड्स‌वर खेळलेल्या एकूण पाच कसोटीत सर्वाधिक ३३ बळी घेतले. न्यूझीलंड संघाविरुद्ध त्याला इथे पाच कसोटीत २२ बळी मिळवता आलेत. या दोन संघातल्या फलंदाजांना त्याने अधिक टार्गेट केलेले पाहायला मिळाले आहे. लॉर्ड्स‌वर जेम्स अॅन्डरसनची एका डावातली सर्वोत्तम कामगिरी सप्टेंबर २०१७ला वेस्ट इंडिज संघाविरुद्ध खेळताना पाहायला मिळाली होती. या कसोटीत त्याने वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात आपल्या २०.१ षट्कात ४२ धावा देत सात बळी मिळवले होते. हा सामना इंग्लंडने नऊ विकेट्स‌ने जिंकला.

जागतिक क्रिकेटमध्ये सध्या कसोटीत सर्वात जास्त बळी मिळवणाऱ्या टॉप पाच गोलंदाजांमध्ये जेम्स अॅन्डरसन आता तिसऱ्या स्थानावर आला आहे. हे टॉप पाच गोलंदाज असे आहेत, मुथप्पा मुरलीधरन (१३३ कसोटी, ८०० बळी), शेन वॉर्न (१४५ कसोटी, ७०८ बळी), जेम्स अॅन्डरसन (१७० कसोटी, ६४६ बळी), अिनल कुंबळे (१३२ कसोटी, ६१९ बळी) आणि ग्लेन मॅग्राथ (१२४ कसोटी, ५६३ बळी). अॅन्डरसनचे सध्याचे वय ४० सुरू असल्यामुळे तो आणखी किती कसोटी सामने खेळू शकेल हे तो येणाऱ्या दिवसांमध्ये स्वत:च नीट सांगू शकेल; पण एक मात्र विशेष आहे, न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटीत अॅन्डरसन या वयातसुद्धा शानदार गोलंदाजी करत होता. फलंदाजांवर तो अजूनही चांगला बॉडी अॅटॅक करू शकतोय, चांगले यॉर्करसुद्धा तो टाकतोय. वयाच्या चाळिशीतले त्याचे हे गोलंदाजीवरचे नियंत्रण खरेच प्रशंसनीय म्हणावे लागेल. न्यूझीलंडविरुद्धच्या या कसोटीत त्याने एकूण सहा बळी मिळवून हे सिद्ध करून दाखवले अाहे.

जेम्स अॅन्डरसनने २००३ पासून इंग्लंडकडून एकूण खेळलेल्या १७० कसोटीत इंग्लंड संघाला आपली सर्वोत्तम सेवा दिली आहे. त्याच्या या १७० कसोटीत इंग्लंडला ७३ विजय आणि ६० पराभवांचा सामना करावा लागला अाहे. याशिवाय ३६ कसोटी सामने अिनर्णीत राहिले अाहेत. यातल्या विजयी झालेल्या ७३ कसोटीत अॅन्डरसनने ३३८ बळींचे योगदान दिले. अॅन्डरसन अजूनही कसोटीत चांगला फॉर्म दाखवतोय म्हणूनच त्याला मोठ्या सन्मानाने वयाच्या चाळिशीतसुद्धा कसोटी संघात बोलावले जाते. गोलंदाज कसोटीत वयाच्या चाळिशीपर्यंत टिकलेला खूप अभावाने पाहायला मिळतो. एक वेळ फलंदाज चाळिशीत खेळताना आपण अनेक फलंदाजांना पाहिले असेल; पण फास्ट गोलंदाजांच्या बाबतीत इतके दीर्घकाळ संघात टिकणे खूप अभावानेच पाहायला िमळते. अॅन्डरसनने आंतरराष्ट्रीय टी-२०च्या सामन्यांना अधिक महत्त्व न दिल्यामुळेच त्याला कसोटीकडे बारकाईने लक्ष पुरवता आलं. वन-डे आणि टी-२०कडे त्याने एका विशिष्ट मर्यादेपर्यंत लक्ष दिले आणि नंतर त्यातून तो बाहेर पडला.

साहजिकच अधून-मधून चांगला आराम घेऊन आपल्या फिटनेसला सांभाळून जेम्स अॅन्डरसनने कसोटीला प्राधान्य देत जागतिक क्रिकेटमध्ये एक वेगळीच उंची गाठून दाखवली. व्यावसायिकतेपेक्षा त्याने कसोटी क्रिकेटला जास्त महत्त्व दिले. त्यासाठी त्याचे कौतुक झालेच पाहिजे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in