नवी दिल्ली : वुमेन्स प्रीमियर लीग (डब्ल्यूपीएल) म्हणजेच महिला आयपीएलच्या दुसऱ्या पर्वासाठी शनिवार, ९ डिसेंबर रोजी मुंबईत खेळाडूंची लिलावप्रक्रिया होणार आहे. मुख्य खेळाडूंना बहुतांश संघांनी आपापल्याकडे कायम राखल्याने यंदा होणाऱ्या मिनी-ऑक्शनमध्ये कोणते खेळाडू कोटींचे उड्डाणे घेणार, हे पाहणे रंजक ठरेल.
एकूण १६५ खेळाडू लिलावाच्या रिंगणात उतरणार असून फक्त ३० जागाच शिल्लक असल्याने एकंदरच संघमालकांमध्ये खेळाडूंना विकत घेण्यासाठी चुरस पाहायला मिळणार आहे. गतवर्षी पहिल्या हंगामासाठी झालेल्या लिलावात महाराष्ट्राच्या स्मृती मानधनावर ३.४० कोटींची महाबोली लागली होती. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने तिच्यासाठी विक्रमी किंमत मोजली होती. यावेळी कुणी स्मृतीला पिछाडीवर टाकण्यास यशस्वी होणार का, याची क्रीडाप्रेमींना उत्सुकता आहे.
फेब्रुवारी ते मार्चमध्ये ‘डब्ल्यूपीएल’चा दुसरा हंगाम रंगण्याची शक्यता असून यावेळीही पहिल्या हंगामाप्रमाणेच ५ संघ स्पर्धेत सहभागी होतील. गतवर्षी हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने पहिल्या पर्वाचे जेतेपद मिळवले. मुंबईव्यतिरिक्त दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, यूपी वॉरियर्स आणि गुजरात जायंट्स हे एकंदर पाच संघ स्पर्धेत खेळतील. या संघांनी एकत्रितपणे ६० खेळाडूंना आपापल्या संघात कायम राखले असून २९ खेळाडूंना लिलावात उतरवण्यात येईल. यामध्ये काही नव्या क्रिकेटपटूंचीही भर पडली आहे.
लिलावात सहभागी होणाऱ्या १६५ खेळाडूंपैकी ५६ खेळाडू हे आंतरराष्ट्रीय अनुभव असलेले आहेत. १०९ खेळाडू बिगरआंतरराष्ट्रीय (अनकॅप्ड) आहेत. १६५पैकी १०४ खेळाडू भारताचे असून ६१ विदेशी खेळाडू असतील. गुजरातकडे ५.९५ कोटींची सर्वाधिक रक्कम शिल्लक असून ते १० खेळाडू खरेदी करू शकतात. तर मुंबईकडे सर्वात कमी म्हणजेच २.१ कोटी रुपये शिल्लक असून त्यांना ५ खेळाडू विकत घेण्याची मुभा आहे. बंगळुरूकडे ३.३५ कोटी, दिल्लीकडे २.२५ कोटी, तर यूपीकडे ४ कोटी शिल्लक आहेत. प्रत्येक संघात कमाल १८ व किमान १५ खेळाडू असणे गरजेचे आहे.
दरम्यान, बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी, सचिव जय शहा, आयपीएलचे प्रमुख अरुण धुमाळ, बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला, खजिनदार आशिष शेलार, सहसचिव देवाजित साइकिया या सर्वांचा समावेश असलेली समिती लिलावावर नजर ठेवणार आहे.
वेळ : दुपारी २.३० वा. g थेट प्रक्षेपण : स्पोर्ट्स १८ (१) वाहिनी आणि जिओ सिनेमा ॲप
या ५ विदेशी खेळाडूंकडे लक्ष
चामरी अटापटू (श्रीलंका) : मूळ किंमत ३० लाख
डॅनिएल वॅट (इंग्लंड) मूळ किंमत ३० लाख
ॲनाबेल सदरलँड (ऑस्ट्रेलिया) : मूळ किंमत ४० लाख
डिएंड्रा डॉटिन (वेस्ट इंडिज) :मूळ किंमत ५० लाख
शबनिम इस्माइल (द. आफ्रिका) : मूळ किंमत ४० लाख