पुणे : राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडाक्षेत्रात देशाबरोबरच महाराष्ट्राचा गौरव वाढविणाऱ्या खेळाडूंची राज्य शासनाने सरकारी नोकरीत थेट नियुक्ती केली. कविता राऊत हिच्यासह १५ जणांना सरकारी नोकरीत मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती मिळाली आहे. मात्र, या नियुक्तीवर कविता राऊत नाराज आहेत. तिने थेट कोर्टात जाण्याचा इशारा राज्य सरकारला दिला आहे.
आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत हिला राज्य सरकारकडून सरकारी नोकरी देण्यात आली आहे. तिची मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, या नियुक्तीवरही ‘सावरपाडा एक्स्प्रेस’ कविता राऊत नाराज आहे. मला ललिता बाबरप्रमाणे उपजिल्हाधिकारी पद मिळायला हवे, असे तिचे म्हणणं आहे. या अन्यायाविरुद्ध आपण राज्य सरकारविरुद्ध न्यायालयात जाणार असल्याचा इशाराही तिने दिला आहे.
कविता राऊत म्हणाली, “गेल्या १० वर्षांपासून संघर्ष करूनही मला न्याय मिळाला नाही. माझ्याबरोबर ऑलिम्पिक स्पर्धेत खेळणाऱ्या ललिता बाबर हिला एक न्याय आणि मला दुसरा का?” दहा वर्षांपासून अनेक खात्यात नोकरीची फाईल पुढे जाते. मात्र, अर्थ खात्यात फाईल अडवली जात असल्याचा गंभीर आरोपही तिने केला. त्यामुळे आपण राज्य सरकार विरोधात न्यायालयात जाऊन दाद मागणार आहे, असेही तिने सांगितले.
ललिताप्रमाणे न्याय हवा
‘मला आता देण्यात आलेले सरकारी नोकरीतील पद हे २०१८ च्या जीआरनुसार आहे. मात्र, आमचे प्रकरण त्याआधीचे असल्याने जुन्या जीआरनुसार उपजिल्हाधिकारी दर्जाचे पद मिळावे,’ अशी अपेक्षाही अर्जुन पुरस्कार विजेत्या कविता राऊतने व्यक्त केली आहे. आता राज्य सरकार हे प्रकरण कसे हाताळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.