
आशिया चषक २०२२ क्रिकेट स्पर्धेतील बांगलादेशच्या अत्यंत निराशाजनक कामगिरीनंतर यष्टिरक्षक फलंदाज मुशफिकुर रहीमने आपली निवृत्ती जाहीर केली. ३५ वर्षीय मुशफिकुरने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. मुशफिकुर रहीमने सोशल मीडियावर पोस्ट करून याबाबत माहिती दिली.
मुशफिकर रहीमने ट्विटमध्ये लिहिले की, मी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करीत असून मला माझे पूर्ण लक्ष फक्त कसोटी आणि वन-डे क्रिकेटवर केंद्रित करायचे आहे.
त्याने स्पष्ट केले की, मी फ्रँचायझी लीग खेळण्यासाठी उपलब्ध राहीन. मला जेव्हा आणि जिथे संधी मिळेल तेव्हा मी खेळेन. आता पुढील दोन फॉरमॅटमध्ये माझ्या देशाचे प्रतिनिधित्व मी करीत राहीन.
मुशफिकुरने नोव्हेंबर २००६ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर त्याने आतापर्यंत १०२ सामने खेळले. यादरम्यान मुशफिकुरने १५०० धावा केल्या. या फॉरमॅटमध्ये त्याने सहा अर्धशतके झळकाविली आहेत. त्याने १२६ चौकार आणि ३७ षट्कार लगावले आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याचा स्ट्राइक रेट ११४.९४ आहे. दरम्यान, आशिया चषक स्पर्धेत बांगलादेशची कामगिरी अतिशय निराशाजनक झाली. बांगलादेशला गटातील एकही सामना जिंकता आला नाही. अफगाणिस्तान आणि श्रीलंकेकडून बांगलादेशचा पराभव झाला. बांगलादेशने गेल्या दोन आशिया चषक स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश केला होता.