मेलबर्न : गेल्या १२ महिन्यांत तब्बल तीन ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकणाऱ्या नोव्हाक जोकोव्हिचचा झंझावत रोखण्याचे आव्हान यंदा पुरुष टेनिसपटूंसमोर असेल. राफेल नदालने वर्षभरानंतर कोर्टवर पुनरागमन केले खरे, पण त्याचा आनंद हा फार काळ टिकला नाही. त्यामुळे जोकोव्हिचला टक्कर देणारे कार्लोस अल्कारेझ आणि डॅनिल मेदवेदेव यांच्यावरच ते आव्हान असेल.
अल्कारेझने गेल्या वर्षी विम्बल्डनच्या अंतिम फेरीत जोकोव्हिचचा पाडाव केला. त्याआधी २०२१च्या अमेरिकन ओपनमध्ये मेदवेदेवने सरळ सेटमध्ये जोकोव्हिचला हरवले होते. त्याचबरोबर यानिक सिन्नर यानेही डेव्हिस चषकाच्या अंतिम फेरीत आणि एटीपी फायनल्समध्ये जोकोव्हिचला कडवी लढत दिली होती. मात्र वर्षाच्या सुरुवातीलाच रंगणाऱ्या ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धेत जोकोव्हिचने गेल्या पाच वर्षात पराभवाचे तोंड पाहिलेले नाही.
जोकोव्हिचला रविवारपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियन ओपनच्या पहिल्या टप्प्यात सोपा ड्रॉ मिळाला आहे. त्यामुळे त्याला ऑस्ट्रेलियन ओपनचे ११वे आणि कारकीर्दीतील २५वे ग्रँडस्लॅम जेतेपद रोखण्यापासून कुणीही अडवू शकणार नाही. अँडी मरे आणि स्टॅनिस्लॉस वॉवरिंका हे दोन माजी ग्रँडस्लॅम विजेते सध्या दुखापतींशी तोंड देत असून ते कारकीर्दीतील अखेरच्या टप्प्यावर असल्यामुळे ३६ वर्षीय जोकोव्हिचला ते कितपत लढत देऊ शकतात, हे पहिल्या काही दिवसांतच कळणार आहे. स्टेफानोस त्सित्सिपास तसेच मट्टेओ बरेट्टिनी हेसुद्धा जोकोव्हिचच्या ग्रँडस्लॅम जेतेपदाच्या मार्गातील प्रमुख अडथळा असणार आहेत.
चौथ्या मानांकित सिन्नरला आपल्या गटात सोपा ड्रॉ मिळाला असून त्याची थेट लढत करेन खाचानोव्ह याच्याशी होऊ शकते. जोकोव्हिचने उपांत्यपूर्व फेरीत आगेकूच केल्यास, त्याचा सामना अल्कारेझ किंवा झ्वेरेव्ह यांच्याशी होऊ शकतो. उपांत्य फेरीत त्याची गाठ सिन्नरशी तर अंतिम फेरीत मेदवेदेव याच्याशी होऊ शकते.