शमी दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात परतणार? रणजीत ४ बळींसह दमदार पुनरागमन

आघाडीचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात पुनरागमन होण्याची दाट शक्यता आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सूत्रांनीच याविषयी माहिती दिली आहे.
शमी दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात परतणार? रणजीत ४ बळींसह दमदार पुनरागमन
Published on

नवी दिल्ली : आघाडीचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात पुनरागमन होण्याची दाट शक्यता आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सूत्रांनीच याविषयी माहिती दिली आहे.

३४ वर्षीय शमी पायाच्या दुखापतीमुळे जवळपास वर्षभर क्रिकेटपासून दूर होता. मात्र आता बंगालकडून रणजी स्पर्धेत खेळताना त्याने मध्य प्रदेशविरुद्ध पहिल्या डावात छाप पाडली. दुसऱ्या डावातही तो योग्य लयीत दिसला, तर ६ डिसेंबरपासून ॲडलेडला होणाऱ्या दिवस-रात्र कसोटीसाठी शमीचा भारतीय संघात समावेश केला जाऊ शकतो. २२ नोव्हेंबरपासून भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका सुरू होणार आहे. मात्र त्यापूर्वी शमी संघात दाखल होणे कठीण वाटते. शमीच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमरावर भारताच्या वेगवान माऱ्याची भिस्त आहे.

२०२३च्या एकदिवसीय विश्वचषकात शमीने सर्वाधिक २४ बळी मिळवले होते. मात्र नोव्हेंबरपासून तो मैदानापासून दूर होता. त्याच्या पायाच्या घोट्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. आता रणजी स्पर्धेतील सर्व संघांचा पाचवा साखळी सामना सुरू असून त्यानंतर सय्यद मुश्ताक अली ही टी-२० स्वरूपाची देशांतर्गत स्पर्धा सुरू होणार आहे. यावेळी रणजी स्पर्धा दोन टप्प्यांत होत असल्याने पुढील महिनाभर तरी रणजीचा सामना नाही. त्यामुळे शमीला टी-२० स्पर्धेत खेळवण्यापेक्षा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पाठवणे सोयीचे ठरेल.

१६ नोव्हेंबरला बंगाल-मध्य प्रदेश यांच्यातील लढत संपल्यावर शमीच्या तंदुरुस्तीसह कामगिरीचा आढावा घेऊन निवड समिती पुढील निर्णय घेईल. शमी नक्कीच ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाईल, असे दिसते, असे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले.

चार बळींसह शमीचे पुनरागमन

इंदूर : अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमीने बंगालसाठी अखेर दुसऱ्या दिवशी धारदार गोलंदाजी करताना मध्य प्रदेशच्या फलंदाजांना हैराण केले. शमीने ५४ धावांत मिळवलेल्या ४ बळींच्या जोरावर बंगालने मध्य प्रदेशला १ बाद १०३ वरून १६७ धावांत गुंडाळले. जवळपास वर्षभरानंतर पुनरागमन करणाऱ्या शमीने पहिल्या दिवशी १० षटके गोलंदाजी केली होती. मात्र त्याला बळी मिळवता आला नाही. गुरुवारी दुसऱ्या दिवशी मात्र शमीपुढे मध्य प्रदेशची फलंदाजी ढेपाळली. शमीने १९ षटके गोलंदाजी करताना कर्णधार शुभम शर्मा, सारांश जैन, कुमार कार्तिकेय यांचे बळी मिळवले. तीन फलंदाजांचे त्याने त्रिफळे उडवले, तसेच त्याची गतीही १४० पेक्षा अधिक होती. त्यामुळे बंगालने पहिल्या डावात ६१ धावांची आघाडी घेतली असून दुसऱ्या डावात त्यांनी ५ बाद १७० धावा केल्या आहेत. आता दुसऱ्या डावातही गोलंदाजीत शमी कमाल करेल, अशी चाहत्यांना अपेक्षा आहे.

logo
marathi.freepressjournal.in