
नवी दिल्ली : घरच्या मैदानात न्यूझीलंडविरुद्ध लाजिरवाणा पराभव, त्यानंतर ऑस्ट्रेलियात मालिका गमावल्यानंतर अनफॉर्ममध्ये असलेला टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या निवृत्तीच्या बातम्यांनी जोर धरला आहे. आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर रोहितच्या क्रिकेट कारकीर्दीला पूर्णविराम मिळणार असल्याचे समजते. दुसरा कर्णधार मिळत नाही तोपर्यंत या पदावर राहणार असल्याचे रोहितने नुकत्याच झालेल्या बीसीसीआय, निवड समितीच्या बैठकीत सांगितल्याचे समजते. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफी ही रोहितच्या क्रिकेट कारकिर्दीतील अखेरची स्पर्धा असणार असल्याचा अंदाज जाणकार लावत आहेत.
बॉर्डर-गावस्कर मालिकेत रोहित शर्माला धावांसाठी संघर्ष करावा लागला. मात्र संपूर्ण मालिका त्याची बॅट शांत होती. ही मालिका भारताने १-३ ने गमावल्यानंतर रोहितच्या निवृत्तीच्या मागणीने जोर धरला. सध्या तरी मी कुठेही जात नाही, मी संघासोबतच असल्याचे स्वत: रोहितने सांगत या चर्चांना पूर्णविराम दिला. मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर रोहित क्रिकेटला अलविदा करणार असल्याचे बोलले जात आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी ही रोहितच्या कारकीर्दीतील अखेरची स्पर्धा असल्याचे बोलले जात आहे. तसेच पुढील एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा २०२७ मध्ये होणार आहे. रोहित त्यावेळी ४० वर्षांचा होणार आहे. त्यामुळे त्या स्पर्धेत तो खेळण्याची शक्यता नसल्याचे बोलले जाते.
मिळालेल्या माहितीनुसार, चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर होणाऱ्या इंग्लंड दौऱ्यावर रोहित शर्मा जाणार नाही. चॅम्पियन्स ट्रॉफी ही रोहितच्या कारकीर्दीतील अखेरची स्पर्धा असेल. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारतीय संघ साखळी फेरीत तीन सामने खेळणार आहे. ९ मार्चला या स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे. जर भारताने ही स्पर्धा जिंकली तर रोहितच्या क्रिकेट कारकीर्दीचा शेवटही गोड होईल. त्यामुळे तो या स्पर्धेत जीवतोड खेळणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, रोहित शर्माने विश्वचषक विजयानंतर लगेच टी-२० क्रिकेटला अलविदा केला.
इंग्लंड दौऱ्यात संधी मिळणे कठीण?
बॉर्डर-गावस्कर मालिकेत रोहितच्या बॅटने निराश केले. त्यामुळे मालिकेतील शेवटच्या कसोटीत त्याने संघाबाहेर बसण्याचा निर्णय घेतला. त्याचा फॉर्म पाहता इंग्लंड दौऱ्यात भारतीय कसोटी संघात त्याला संधी मिळणे कठीण असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.