
ॲडलेड : भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने जवळपास ६ वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियातच एखाद्या कसोटी सामन्यात मधल्या फळीत फलंदाजी केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा रोहित मधल्या फळीत फलंदाजी करताना दिसू शकतो. ऑस्ट्रेलियाविरुद्ध ६ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात यशस्वी जैस्वाल आणि के. एल. राहुल यांचीच जोडी सलामीला येण्याची दाट शक्यता आहे.
३७ वर्षीय रोहितच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराच्या नेतृत्वाखाली भारताने पहिल्या कसोटीत कांगारूंना २९५ धावांनी धूळ चारली. बॉर्डर-गावस्कर करंडकासाठी उभय संघांत खेळवण्यात येणाऱ्या पाच लढतींच्या या मालिकेत भारताने १-० अशी आघाडी घेतली आहे. आता ॲडलेड येथे गुलाबी चेंडूने प्रकाशझोतात (डे-नाईट) दुसरी कसोटी खेळवण्यात येईल. त्यापूर्वी झालेल्या दोन दिवसीय सराव लढतीत भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया पंतप्रधान एकादश संघाचा पराभव करून आपण सज्ज असल्याचे दाखवून दिले. या सराव सामन्यात रोहितने चौथ्या स्थानी फलंदाजी केली. त्याने ११ चेंडूंत ३ धावा केल्या. तर यशस्वी व राहुल यांनी सलामीला येत १६.३ षटकांत ७५ धावांची भागीदारी नोंदवली. यशस्वीने ४५, तर राहुलने २७ धावा केल्या.
२०१८-१९च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मेलबर्न येथील तिसऱ्या कसोटीत रोहितने सहाव्या क्रमांकावर फलंदाजी केली होती. त्या कसोटीच्या पहिल्या डावात रोहितने ६३ धावा फटकावल्या. हीच कसोटी मधल्या फळीतील फलंदाज म्हणून रोहितच्या कारकीर्दीतील अखेरची ठरली. कारण चौथ्या कसोटीपूर्वी पत्नी रितिका पहिल्या अपत्यास जन्म देणार असल्याने रोहित मायदेशी माघारी परतला. त्यानंतर २०१९मध्ये रोहितने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटीत सलामीला येत दोन शतके झळकावली. त्यानंतर रोहितने कधीही कसोटीत मधल्या फळीत फलंदाजी केली नाही. ६४ कसोटी सामन्यांचा अनुभव असलेल्या रोहितने ४२.२७च्या सरासरीने ४,२७० धावा केल्या आहेत. यामध्ये १२ शतकांचा समावेश आहे.
त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत रोहित तिसऱ्या अथवा पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची शक्यता आहे. कारण राहुल व यशस्वी यांनी पर्थच्या पहिल्या कसोटीतील दुसऱ्या डावात २०१ धावांची भागीदारी रचून भारताच्या विजयाचा पाया रचला. यशस्वी संपूर्ण वर्षभरात उत्तम लयीत आहे, तर राहुलने वेगवान माऱ्याचा नेटाने मुकाबला करून सूर गवसल्याचे संकेत दिले. शुभमन गिलनेही सराव लढतीत तिसऱ्या क्रमांकावर अर्धशतक झळकावून तंदुरुस्त असल्याचे दाखवून दिले. त्यामुळे रोहित पाचव्या स्थानी फलंदाजीला येऊ शकतो. चौथ्या व सहाव्या स्थानी अनुक्रमे विराट व पंत फलंदाजी करतील.
राहुल तिसऱ्या स्थानी योग्य : पुजारा
जर दुसऱ्या कसोटीत रोहित आणि यशस्वी सलामीला आले, तर राहुलने फार तर फार तिसऱ्या स्थानी फलंदाजी करावी. त्याहून खालच्या क्रमांकावर फलंदाजी केल्यास, राहुलकडून सर्वोत्तम कामगिरी होणार नाही, अशी प्रतिक्रिया भारताचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराने व्यक्त केली. पुजारा सध्या भारताच्या कसोटी संघाचा भाग नसून तो या मालिकेसाठी समालोचन करत आहे. दुसऱ्या कसोटीत रोहितसह गिलही संघात परतणार आहे, हे निश्चत आहे. अशा स्थितीत देवदत्त पडिक्कल व ध्रुव जुरेल यांना संघातील स्थान गमावावे लागेल. मात्र राहुल सलामीला न पाठवल्यास किमान तिसऱ्या क्रमांकावर खेळवावे, असे पुजाराला वाटते.
न्यूझीलंड पाचव्या स्थानी
ख्राईस्टचर्च : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडला दारुण पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे न्यूझीलंडच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप) अंतिम फेरी गाठण्याच्या आशांना धक्का बसला आहे. या लढतीत षटकांची संथ गती राखल्याबद्दल (स्लो-ओव्हर रेट) न्यूझीलंडला ३ पेनल्टी गुण लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे न्यूझीलंडची सध्या पाचव्या स्थानी घसरण झाली असून त्यांची टक्केवारी ४७.९२ इतकी आहे. आता इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित २ कसोटी जिंकूनही किवी संघ ५५.३६ टक्क्यांपर्यंतच पोहचू शकतो. त्यामुळे आता प्रामुख्याने भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका या चार संघांत अंतिम फेरीसाठी चुरस आहे.
जागतिक कसोटी अजिंक्यपद गुणतालिका
क्र. संघ सामने जय पराजय अनिर्णित गुण टक्केवारी
१ भारत १५ ९ ५ १ ११० ६१.११%
२. द. आफ्रिका ९ ५ ३ १ ६४ ५९.२६%
१. ऑस्ट्रेलिया १३ ८ ४ १ ९० ५७.६९%
३. श्रीलंका १० ५ ५ ० ६० ५०.००%
४. न्यूझीलंड १२ ६ ६ ० ६९ ४७.९२%