वाढदिवशी रोहितची बॅट तळपणार? स्पर्धेत टिकून राहण्यासाठी मुंबईसाठी प्रत्येक सामना निर्णायक; आज लखनऊशी गाठ

हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबईने ९ पैकी फक्त ३ सामने जिंकले असून सध्या ते गुणतालिकेत नवव्या स्थानी आहे. गेल्या लढतीत दिल्लीकडून मुंबईला हार पत्करावी लागली.
वाढदिवशी रोहितची बॅट तळपणार? स्पर्धेत टिकून राहण्यासाठी मुंबईसाठी प्रत्येक सामना निर्णायक; आज लखनऊशी गाठ

लखनऊ : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार तसेच मुंबई इंडियन्सचा सलामीवीर रोहित शर्मा मंगळवारी ३७वा वाढदिवस साजरा करणार आहे. त्यामुळे इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) वाढदिवशी रोहितची बॅट तळपणार का, याकडे चाहत्यांचे लक्ष लागून आहे. मुंबईसाठी आता स्पर्धेत टिकून राहण्यासाठी प्रत्येक लढत निर्णायक असून मंगळवारी त्यांची लखनऊ सुपर जायंट्सशी गाठ पडणार आहे.

हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबईने ९ पैकी फक्त ३ सामने जिंकले असून सध्या ते गुणतालिकेत नवव्या स्थानी आहे. गेल्या लढतीत दिल्लीकडून मुंबईला हार पत्करावी लागली. त्याशिवाय मुंबईसाठी या हंगामात एकमेव शतक झळकावणाऱ्या रोहितलासुद्धा गेल्या दोन सामन्यांत एकेरी धावसंख्येतच बाद व्हावे लागले. परिणामी मुंबईनेही लढत गमावली. त्यामुळे आता वाढदिवशी रोहित दमदार खेळी साकारून मुंबईला पुन्हा विजयपथावर आणणार का, हे पाहणे रंजक ठरेल. मुंबईला बाद फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी उर्वरित पाचही किंवा किमान चार लढती जिंकून अन्य निकालांवरही अवलंबून राहावे लागेल.

दुसरीकडे के. एल. राहुलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या लखनऊला गेल्या लढतीत राजस्थानकडून पराभव पत्करावा लागला. ९ सामन्यांतील ५ विजयांच्या १० गुणांसह लखनऊ गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर आहे. त्यांनाही उर्वरित पाचपैकी किमान ३ लढती जिंकणे गरजेचे आहे. घरच्या मैदानात लखनऊने या हंगामातील पाचपैकी दोन सामने गमावले आहेत. तसेच येथे धावांचा पाठलाग करणारा संघ सलग तीन सामने जिंकला असल्याने दुसऱ्या डावात फलंदाजी करणे सोपे ठरू शकते. येथील पाच लढतींमध्ये आतापर्यंत एकदाही २०० धावा झालेल्या नाहीत, हे मात्र विशेष.

बुमरा लयीत; हार्दिकवर लक्ष

पर्पल कॅपच्या शर्यतीत १४ बळींसह आघाडीवर असलेल्या जसप्रीत बुमरावर पुन्हा एकदा मुंबईच्या गोलंदाजीची भिस्त असेल. जेराल्ड कोएट्झे पोटदुखीमुळे गेल्या लढतीला मुकला. त्यामुळे तो परतेल, असे अपेक्षित आहे. रोहित-इशान किशन यांना सलामीला सातत्य दाखवता आलेले नाही. त्याशिवाय सूर्यकुमार यादवही दर दुसऱ्या डावात अपयशी ठरत आहे. या आघाडीच्या त्रिकुटाने पहिल्या १० षटकांत उत्तम सुरुवात केली, तरच मुंबई संघ जिंकू शकतो. तिलक वर्मा लयीत आहे. मात्र कर्णधार हार्दिकला कामगिरी उंचवावी लागेल. दिल्लीविरुद्ध त्याने ४६ धावा केल्या. मात्र गोलंदाजीत तो सातत्याने धावा लुटत आहे. ल्यूक वूड किंवा नुवान थुशारापैकी एकाला संघाबाहेर केले जाऊ शकते.

राहुलकडे अखेरची संधी

राहुलला टी-२० विश्वचषकात यष्टिरक्षक-फलंदाज म्हणून स्थान मिळवायचे असल्यास निवड समितीचे लक्ष वेधण्याची ही अखेरची संधी आहे. त्याने या हंगामात ३ अर्धशतकांसह ३७८ धावा केल्या असल्या तरी मधल्या फळीत फलंदाजी केलेली नाही. क्विंटन डीकॉक व निकोलस पूरनही गेल्या काही सामन्यांत अपयशी ठरले आहेत. डीकॉकने गेल्या सहा डावांत एकदाच २०हून अधिक धावा केल्या आहेत. त्यामुळे मार्कस स्टोईनिस व दीपक हूडा यांच्यावर दडपण येत आहे. दुसरीकडे गोलंदाजीत मयांक यादव परतण्याची शक्यता असल्याने लखनऊची चिंता कमी झाली असेल. यश ठाकूर, मॅट हेन्रीही त्यांच्या ताफ्यात आहेत. रवी बिश्नोई, अमित मिश्रा व कृणाल पंड्या यांचे फिरकी त्रिकूट लखनऊच्या खेळपट्टीवर प्रभावी ठरू शकते. त्यामुळे मुंबईच्या फलंदाजांना त्यांच्यापासून सावध रहावे लागेल.

प्रतिस्पर्धी संघ

मुंबई इंडियन्स : हार्दिक पंड्या (कर्णधार), रोहित शर्मा, इशान किशन, डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, नमन धीर, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, पियूष चावला, शम्स मुलाणी, जसप्रीत बुमरा, जेराल्ड कोएट्झे, ल्यूक वूड, श्रेयस गोपाळ, अंशुल कंबोज, कुमार कार्तिकेय, आकाश मढवाल, क्वेना माफका, मोहम्मद नबी, शिवालिक शर्मा, रोमारियो शेफर्ड, अर्जुन तेंडुलकर, नुवान तुशारा, नेहल वधेरा, हार्विक देसाई.

लखनऊ सुपर जायंट्स : के. एल. राहुल (कर्णधार), क्विंटन डीकॉक, निकोलस पूरन, आयुष बदोनी, कायले मेयर्स, मार्कस स्टोइनिस, दीपक हूडा, देवदत्त पडिक्कल, रवी बिश्नोई, नवीन उल हक, कृणाल पंड्या, युधवीर सिंग, प्रेरक मंकड, यश ठाकूर, अमित मिश्रा, शामर जोसेफ, मयांक यादव, मोहसिन खान, के. गौतम, अर्शीन कुलकर्णी, एम. सिद्धार्थ, ॲश्टन टर्नर, डेव्हिड विली, अर्शद खान, मॅट हेन्री.

logo
marathi.freepressjournal.in