टी-२० विश्वचषकातील सिराजचे स्थान धोक्यात? बुमराच्या साथीदारासाठी हर्षल, आवेश, अर्शदीप, नटराजन शर्यतीत

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ टी-२० विश्वचषकात खेळणार असून १ मेपर्यंत भारताच्या १५ खेळाडूंची घोषणा होईल.
टी-२० विश्वचषकातील सिराजचे स्थान धोक्यात? बुमराच्या साथीदारासाठी हर्षल, आवेश, अर्शदीप, नटराजन शर्यतीत
Published on

नवी दिल्ली : अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे २ जूनपासून रंगणाऱ्या टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघातील १५ खेळाडू कोण असावेत, याविषयी एव्हाना सर्व जण तर्कवितर्क लढवत आहेत. मात्र माजी क्रिकेटपटूंनी नोंदवलेल्या मतांनुसार ३० वर्षीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज या शर्यतीत मागे पडत आहे, असे समजते. जसप्रीत बुमराच्या रूपात एकमेव वेगवान गोलंदाज भारताच्या संघात पक्का मानला जात असून त्याच्या वेगवान साधीदारासाठी सिराजसह अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, आवेश खान आणि टी. नटराजन हेदेखील शर्यतीत आहेत.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ टी-२० विश्वचषकात खेळणार असून १ मेपर्यंत भारताच्या १५ खेळाडूंची घोषणा होईल. सध्या सुरू असलेल्या आयपीएलच्या कामगिरीचा संघ निवडीवर प्रभाव पडेल, असे दिसते. त्यानुसार बंगळुरूकडून खेळणारा सिराज सध्या चर्चेचा विषय आहे. एकदिवसीय व कसोटी प्रकारात सिराज भारतीय संघाचा कायमस्वरूपी सदस्य असला तरी टी-२०मध्ये त्याला छाप पाडता आलेली नाही. यंदाच्या आयपीएलमध्येही ९ सामन्यांत त्याने फक्त ६ बळी मिळवताना ९,५०च्या सरासरीने ३२३ धावा दिल्या आहेत. त्याशिवाय सिराज पॉवरप्लेमध्येही अपयशी ठरत आहे.

दुसरीकडे डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीपने ९ सामन्यांत ९.६४च्या सरासरीने ३०२ धावा देताना १२ बळी मिळवले आहेत. मात्र तूर्तास अर्शदीपला डावखुऱ्या गोलंदादाजांमध्ये पर्याय नसल्याने त्याचे संघातील स्थान पक्के मानले जात आहे. तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून सिराज, पंजाबकडून खेळणारा हर्षल, राजस्थानचा आवेश व हैदरबादचा नटराजन यांच्यापैकी एकालाच संधी मिळू शकते. हर्षलने ९ सामन्यांत १४ बळी मिळवले आहेत. मात्र त्याची सरासरी १०.१८ इतकी आहे. तर नटराजनने ७ सामन्यांत १३ गडी बाद केले असून त्याची सरासरी सर्वांच्या तुलनेत सरस म्हणजेच ९ इतकी आहे. अर्शदीपने १२ बळी मिळवले आहेत, तर आवेशने नऊ. मात्र त्यांचा इकॉनॉमी रेट म्हणजेच धावगती नटराजनच्या तुलनेत खराबच आहे.

भारतीय संघात सध्या फक्त एकच वेगवान गोलंदाज मला पक्का दिसत आहे, तो म्हणजे जसप्रीत बुमरा. अंतिम ११ खेळाडूंत तुम्हाला किमान ३ वेगवान गोलंदाज लागतील. त्यामुळे दुसऱ्या व तिसऱ्या पर्यायासाठी सिराज व अर्शदीप हेच सध्या शर्यतीत दिसत आहेत. मात्र सिराजला खेळवणे संघासाठी धोक्याचे ठरू शकते.

- इरफान पठाण

सिराज हा तुमचा विश्वचषकातील तिसरा गोलंदाज असू शकत नाही. बुमरा-अर्शदीप यांची जोडी प्रभावी ठरू शकेल. मात्र तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून तुम्ही हर्षल किंवा नटराजनचा विचार करणे गरजेचे आहे. सिराज १० सामन्यांत एकदाच चांगली कामगिरी करतो. टी-२०मध्ये त्याची कामगिरी आणखी खालावते.

- के. श्रीकांत

logo
marathi.freepressjournal.in