चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात, टीम इंडिया जाणार का? ICC चे नवे अध्यक्ष जय शहा यांच्यासमोरील पहिले मोठे आव्हान

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव म्हणून काही धाडसी निर्णय घेणाऱ्या जय शहा यांना आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) अध्यक्षपद भूषवताना काही आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात, टीम इंडिया जाणार का? ICC चे नवे अध्यक्ष जय शहा यांच्यासमोरील पहिले मोठे आव्हान
छायाचित्र सौजन्य - एक्स
Published on

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव म्हणून काही धाडसी निर्णय घेणाऱ्या जय शहा यांना आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) अध्यक्षपद भूषवताना काही आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. डिसेंबरमध्ये अध्यक्षपदाची धुरा स्वीकारल्यानंतर त्यांना सर्वप्रथम पुढील वर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या यजमानपदाचा पेच सोडवावा लागू शकतो. ही स्पर्धा पाकिस्तानात नियोजित आहे. मात्र, भारत सरकारने आपला संघ पाकिस्तानात पाठविण्यास नकार दिल्यास शहा यांच्यासमोर अडचणी उभ्या राहू शकतील.

पाकिस्तान क्रिकेट मंडळ (पीसीबी) चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संपूर्ण यजमानपदावर ठाम आहे. पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या या स्पर्धेचा कार्यक्रमही ‘पीसीबी’ने ‘आयसीसी’ला पाठविला आहे. मात्र, भारतीय संघाच्या सहभागाबाबत संभ्रम कायम आहे. तणावपूर्ण राजकीय संबंधांमुळे भारताचा क्रिकेट संघ २००८ पासून पाकिस्तानात खेळलेला नाही. गतवर्षी आशिया चषकाचे यजमानपद पाकिस्तानकडे असताना, भारताने आपला संघ पाठविण्यास नकार दिला होता. त्या वेळी आशियाई क्रिकेट परिषदेचे (एसीसी) अध्यक्ष असलेल्या जय शहा यांनी संमिश्र प्रारूपाचा (हायब्रिड मॉडेल) पर्याय सुचविला होता. अखेर भारतीय संघानेही सहभाग नोंदवावा यासाठी ‘पीसीबी’ला हा प्रस्ताव मान्य करावा लागला. या स्पर्धेतील १३ पैकी केवळ चार सामने पाकिस्तानात झाले, तर उर्वरित सामने श्रीलंकेत खेळले गेले. आता चॅम्पियन्स करंडकाबाबत भारत सरकार काय निर्णय घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

बीसीसीआयचे सचिव असताना जय शहा यांनी भारतीय संघाला पाकिस्तानात पाठवायचे की नाही, हा निर्णय सर्वस्वी केंद्र सरकारचा असेल असे म्हटले होते. तसेच ‘आयसीसी’चे मावळते अध्यक्ष ग्रेग बार्कले यांनीही सरकारच्या भूमिकेत आपण हस्तक्षेप करणार नसल्याचे स्पष्ट केले होते. परंतु आता शहा यांच्या अध्यक्षतेखालीही ‘आयसीसी’ची हीच भूमिका कायम राहते का, याकडे सर्वांचे लक्ष असेल.

“शहा यांच्या निवडीला ‘पीसीबी’चा नकार नसण्यामागे महत्त्वाचे कारण आहे. चॅम्पियन्स करंडकात खेळण्यासाठी भारतीय संघाला पाकिस्तानात आणण्याची ताकद शहा यांच्याकडे आहे. त्यांना भारत सरकारचा पाठिंबा मिळू शकेल,” असा आशावाद पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू रशीद लतिफ यांनी व्यक्त केला. मात्र, भारत सरकारने पुन्हा नकार दिल्यास आणि पाकिस्तान संपूर्ण यजमानपदावर ठाम राहिल्यास शहा यांना काही अवघड निर्णय घेणे भाग पडेल.

यूएई, बांगलादेश, श्रीलंकेचा पर्याय

चॅम्पियन्स ट्रॉफी आशिया खंडातच खेळवण्यात येणार, हे स्पष्ट आहे. मात्र पाकिस्तानात ही स्पर्धा न झाल्यास आयसीसीपुढे संयुक्त अरब अमिराती, बांगलादेश, श्रीलंका या तीन देशांत ही स्पर्धा खेळवण्याचा पर्याय उपलब्ध आहे. २०२६मध्ये भारतात टी-२० विश्वचषक होणार असल्याने भारताला कोणत्याही स्थितीत चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद भूषवता येणार नाही. त्यामुळे आता भारतीय संघ पाकिस्तानात जाणार की २०२३च्या आशिया चषकाप्रमाणेच भारताचे सामने पाकिस्तानऐवजी अन्य देशात होणार, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

क्रिकेटच्या हितासाठी योग्य निर्णय घ्यावेत : बुकानन

जय शहा यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात आयसीसीने क्रिकेटच्या हितासाठी दीर्घकालीन लाभदायी ठरतील, असे निर्णय घ्यावेत, अशी अपेक्षा ऑस्ट्रेलियाचे माजी प्रशिक्षक जॉन बुकानन यांनी व्यक्त केली. ‘रेडी स्टेडी गो कीड्स’ या एका कार्यक्रमासाठी बुकानन गुरुवारी मुंबईत उपस्थित होते. “टी-२० प्रकारच्या वाढत्या स्पर्धांवर आयसीसीने नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. क्रिकेट हे कसोटी प्रकारावर टिकून असून युवा पिढीला ते पटवून देणे गरजेचे आहे. त्यामुळे आयसीसीने यासाठी पुढाकार घेणे महत्त्वाचे ठरेल,” असे बुकानन म्हणाले. तसेच या दरम्यान एकदिवसीय क्रिकेटही टिकून राहील, याकडे आयसीसीने लक्ष द्यावे, असेही त्यांनी सुचवले.

logo
marathi.freepressjournal.in