३१ वर्षांचा दुष्काळ संपणार? आफ्रिकेत प्रथमच कसोटी मालिका जिंकण्यासाठी भारतीय संघ सज्ज

रोहितच्या नेतृत्वाखाली भारताला नोव्हेंबरमध्ये मायदेशात झालेल्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला.
३१ वर्षांचा दुष्काळ संपणार? आफ्रिकेत प्रथमच कसोटी मालिका जिंकण्यासाठी भारतीय संघ सज्ज
PM

सेंच्युरियन : १९९२पासून भारतीय संघाने आठ वेळा दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला आहे. मात्र अद्याप त्यांना एकदाही येथे कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. यंदा रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला ३१ वर्षांचा दुष्काळ संपुष्टात आणण्याची सुवर्णसंधी आहे. भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला मंगळवार, २६ डिसेंबरपासून प्रारंभ होणार असून सेंच्युरियन येथे रंगणाऱ्या पहिल्या कसोटीवर पावसाचे दाट सावट असेल.

रोहितच्या नेतृत्वाखाली भारताला नोव्हेंबरमध्ये मायदेशात झालेल्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला. त्या क्लेशकारक पराभवाला ३६ दिवस झाले असून ते दु:ख मागे सारत रोहितसह विराट कोहली, जसप्रीत बुमरा असे अनुभवी खेळाडू पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटकडे वळण्यास तयार आहेत. भारतीय संघ नवव्यांदा आफ्रिका दौऱ्यावर आला असून यंदा प्रथमच रोहित आफ्रिकन भूमीत भारताच्या कसोटी संघाचे नेतृत्व करेल. २०२१मध्ये उभय संघांत झालेल्या अखेरच्या कसोटी मालिकेत भारताने पहिली कसोटी जिंकूनही नंतरच्या दोन लढती गमावल्या होत्या. या मालिकेनंतरच विराट कोहलीने कसोटी नेतृत्वपदाचा राजीनामा दिला.

दरम्यान, सेंच्युरियन येथे पुढील दोन दिवस पावसाचे भाकीत वर्तवण्यात आले आहे. त्यामुळे काही षटकांचा खेळ वाया जाण्याची शक्यता आहे. भारताने २०२१मध्ये येथेच आफ्रिकेला ११३ धावांनी नमवले होते. मात्र आफ्रिकेने या मैदानात २८पैकी एकंदर २२ कसोटी जिंकल्या आहेत. त्यामुळे दोन्ही संघांत कडवी झुंज पाहायला मिळेल.

 विराट, रोहितच्या पुनरागमनाकडे लक्ष

रोहित व विराट हे भारताचे सर्वाधिक अनुभवी फलंदाज या मालिकेद्वारे संघात परतत आहेत. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दृष्टीने ही मालिका महत्त्वाची असल्याने रोहित व विराट कशी कामगिरी करतात, यावर भारताचे भवितव्य अवलंबून असेल. रोहितच्या साथीने यशस्वी जैस्वाल सलामीला येणार असून तिसऱ्या क्रमांकावर शुभमन गिल फलंदाजी करेल. के. एल. राहुल यष्टिरक्षकाची भूमिका बजावण्यासाठी सज्ज असून मुंबईकर श्रेयस अय्यर पाचव्या स्थानी फलंदाजी करेल.

अश्विन-शार्दूलपैकी एकालाच स्थान

डावखुऱ्या रवींद्र जडेजाला प्रथम पसंतीचा फिरकीपटू म्हणून संघात स्थान मिळेल. अशा स्थितीत रविचंद्रन अश्विनला संघाबाहेर राहावे लागू शकते. मोहम्मद शमीच्या अनुपस्थितीत मोहम्मद सिराज व जसप्रीत बुमरा वेगवान माऱ्याची धुरा वाहतील. त्यांच्या साथीला तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून मुकेश कुमार किंवा प्रसिध कृष्णा यांच्यापैकी एकाला संधी मिळेल. चौथा मध्यमगती गोलंदाज म्हणून मुंबईच्या शार्दूल ठाकूरला प्राधान्य देण्यात येण्याची शक्यता आहे.

अखेरच्या मालिकेत एल्गर चमकणार?

२०२१-२२मध्ये डीन एल्गरच्या नेतृत्वाखालीच आफ्रिकेने भारताविरुद्ध कसोटी मालिका जिंकली. यंदा ३६ वर्षीय एल्गरने निवृत्तीची घोषणा केली असल्याने तो अखेरच्या मालिकेत कितपत चमकणार, हे पाहणे रंजक ठरेल. कर्णधार टेम्बा बावुमाच्या आफ्रिकन संघात कीगन पीटरसन, एडीन मार्करम असे प्रतिभावान फलंदाज आहेत. मात्र भारताच्या वेगवान माऱ्यापुढे त्यांचीही कसोटी लागेल.

वेगवान त्रिकुटापासून सावध

कॅगिसो रबाडा, लुंगी एन्गिडी व मार्को यान्सेन यांचे वेगवान त्रिकुट भारतीय फलंदाजांवर वर्चस्व गाजवू शकते. तसेच विश्वचषकात चमकलेल्या जेराल्ड कोएट्झेचा पर्यायही आफ्रिकेकडे उपलब्ध आहे. सेंच्युरियनची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना नेहमीच पोषक मानली जाते. त्यामुळे केशव महाराजच्या रूपात एकच फिरकीपटू आफ्रिकेच्या संघात खेळताना दिसेल.

भारताची आफ्रिकेतील कामगिरी कशी?

* १९९२मध्ये सर्वप्रथम मोहम्मद अझरुद्दीनच्या नेतृत्वाखाली भारताने आफ्रिकेचा दौरा केला. त्यानंतर सचिन तेंडुलकर (१९९६), सौरव गांगुली (२००१), राहुल द्रविड (२००६) यांच्या नेतृत्वाखालीही भारतीय संघ आफ्रिकेत कसोटी मालिका खेळला. मात्र प्रत्येक वेळी भारताला अपयश आले.

* महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली २०१०-११मध्ये भारताने किमान मालिका बरोबरीत सोडवली. २०१३-१४मध्ये मात्र भारत पुन्हा पराभूत झाला. २०१८-१९ व २०२१-२२ या दोन मालिकांमध्ये विराटने भारताचे कर्णधारपद भूषवले. परंतु त्याच्या नेतृत्वाखालीही भारताला अपयशालाच सामोरे जावे लागले.

 ९ भारतीय संघ नवव्यांदा आफ्रिका दौऱ्यावर आला आहे. यापूर्वीच्या आठ मालिकांपैकी सात मालिका भारताने गमावल्या आहेत. तर फक्त २०१०-११च्या दौऱ्यात भारताने आफ्रिकेला १-१ असे बरोबरीत रोखले होते.

 ११ अश्विनला कसोटीतील ५०० बळींचा टप्पा गाठण्यासाठी फक्त ११ बळींची आवश्यकता आहे.

 प्रतिस्पर्धी संघ

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, के. एल. राहुल, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमरा, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, मुकेश कुमार, के. एस. भरत, अभिमन्यू ईश्वरन.

दक्षिण आफ्रिका : टेम्बा बावुमा (कर्णधार), डेव्हिड बेडिंगहॅम, नांद्रे बर्गर, जेराल्ड कोएट्झे, टॉनी डी झॉर्झी, डीन एल्गर, मार्को यान्सेन, केशव महाराज, एडीन मार्करम, वियान मल्डर, लुंगी एन्गिडी, कीगन पीटरसन, कॅगिसो रबाडा, ट्रिस्टन स्टब्स, कायले वेरान.

विश्वचषकाच्या अंतिम फेरीतील पराभवाचे शल्य बाजूला सारून पुढे जाणे महत्त्वाचे आहे. आफ्रिकेत आम्ही कधीच कसोटी मालिका जिंकलेली नाही. या मालिका विजयाने विश्वचषकाचे दु:ख कमी करता येणे अशक्य आहे. मात्र आफ्रिकेत इतिहास रचण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.

- रोहित शर्मा, भारताचा कर्णधार

logo
marathi.freepressjournal.in