
नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे कार्यालय पुन्हा एकदा जुन्या पत्त्यावर म्हणजेच कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्या घरी हलवण्यात आले आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने याबद्दल माहिती दिली आहे.
लैंगिक शोषण केल्याचा आरोप करत देशातील महिला कुस्तीपटूंनी दिल्लीमधील जंतर मंतर मैदानावर बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात आंदोलन केले होते. त्यानंतर बृजभूषण शरण सिंह यांना कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तसेच कुस्ती महासंघाचे कार्यालय त्यांच्या घरातून स्थलांतरित करण्यात आले होते.
त्यानंतर कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत बृजभूषण यांचे निकटवर्तीय संजय सिंह यांनी विजय मिळवला होता. दरम्यान आता कुस्ती महासंघाचे कार्यालय दिल्लीतील हरी नगर येथून पुन्हा एकदा बृजभूषण शरण सिंह यांच्या घरी स्थलांतरित करण्यात आले असल्याची माहिती एका इंग्रजी वृत्तपत्राने दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कुस्ती महासंघाचं कार्यालय आता ज्या ठिकाणी हलवण्यात आले आहे तिथे बृजभूषण शरण सिंह यांचे घर आहे. ते दिल्लीत असताना याच घरात राहतात. येथेच भारतीय कुस्ती महासंघाचे कार्यालय पुन्हा एकदा स्थलांतरीत करण्यात आल्याचे समजते.