रोहितचा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न, MI चा नवा कर्णधार हार्दिक पंड्याचे उद्गार; पण ‘त्या’ मुद्द्यांवर उत्तर देण्यास मात्र नकार

रोहित शर्मा हा भारतीय संघाचा कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली खेळताना मी बरेच काही शिकलो आहे.
रोहितचा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न, MI चा नवा कर्णधार हार्दिक पंड्याचे उद्गार; पण ‘त्या’ मुद्द्यांवर उत्तर देण्यास मात्र नकार

ऋषिकेश बामणे/मुंबई

रोहित शर्मा हा भारतीय संघाचा कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली खेळताना मी बरेच काही शिकलो आहे. इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) मुंबई इंडियन्स संघाकडून पुन्हा खेळताना कर्णधार म्हणून मी फक्त रोहितचा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न करेन. तसेच तो माझ्या मदतीसाठी नेहमीच तयार असेल, अशी प्रतिक्रिया अष्टपैलू हार्दिक पंड्याने व्यक्त केली.

३० वर्षीय हार्दिककडे आयपीएलच्या १७व्या हंगामासाठी मुंबईचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबईने पाच वेळा आयपीएल जिंकलेली आहे. मात्र तरीही गुजरात टायटन्सकडून हार्दिकला संघात सहभागी करून त्याच्याकडे नेतृत्वाची धुरा दिल्याने अनेक चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच मुंबईला समाज माध्यमांवरही फॉलोअर्सला गमवावे लागले. मात्र सोमवारी मुंबईतील ट्रायडेंट हॉटेलमध्ये झालेल्या हंगामापूर्वीच्या पत्रकार परिषदेत हार्दिकने रोहितसोबत माझे सारे काही आलबेल असून त्याच्यासह आयपीएलमध्ये पुन्हा खेळण्यास आतुर असल्याचे सांगितले. पत्रकार परिषदेसाठी मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक मार्क बाऊचरसुद्धा उपस्थित होते.

“मी मुंबई इंडियन्सचा कर्णधार झाल्याने तसेच गुजरातला दोन वर्षांतच सोडचिठ्ठी दिल्याने काहींनी नाराज होणे स्वाभाविक आहे. मात्र खेळाच्या काही गरजा तसेच व्यावसायिक दृष्टिकोन पाहता हा निर्णय घेणे महत्त्वाचे होते. चाहत्यांच्या मतांचा मला आदर आहे. मात्र मी मुंबई इंडियन्सचा तोच पूर्वीचा हार्दिक म्हणून पुन्हा छाप पाडण्यास आतुर आहे,” असे हार्दिक सुरुवातीस म्हणाला.

“रोहित व माझ्यात सर्व काही आलबेल आहे. किंबहुना तो भारतीय संघाचा कर्णधार असून त्याच्या नेतृत्वाखाली खेळताना मी विविध गुण आत्मसात केले आहेत. त्याने मुंबईच्या संघासाठी देदीप्यमान यश मिळवले आहे. कर्णधार म्हणून मी रोहितचाच वारसा पुढे नेईन,” असेही हार्दिकने सांगितले.

“तसेच माझ्या नेतृत्वाखाली खेळताना रोहितला किंवा रोहित संघात असताना मला नेतृत्व करताना कोणतीही अडचण जाणवणार नाही. रोहित व मी १० वर्षांपासून एकत्रित खेळत आहोत. माझ्या कारकीर्दीची सुरुवात त्याच्याच नेतृत्वाखाली झाली. त्यामुळे मला जेव्हा कधीही गरज पडेल, तेव्हा त्याचा मदतीचा हात खांद्यावर नक्कीच असेल,” असे हार्दिकने नमूद केले. २२ मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएलच्या हंगामात मुंबईचा संघ २४ तारखेला गुजरात टायटन्सविरुद्ध अहमदाबादला पहिला सामना खेळणार आहे.

‘त्या’ मुद्द्यांवर उत्तर देण्यास नकार :

रोहितकडून अनपेक्षितपणे कर्णधारपद काढून हार्दिककडे सोपवण्यात आले. यासंबंधी काही पत्रकारांनी प्रश्न विचारले असता मुंबई इंडियन्सच्या व्यवस्थापकीय चमूने त्यावर उत्तरे देण्यास मनाई असल्याचे सांगितले. समाज माध्यमांवर या प्रश्नांची चित्रफित वायरल होत आहे. एकाने रोहितकडून हार्दिककडे कर्णधारपद देण्याचा निर्णय का घेतला, असे विचारले. तर एकाने गुजरातला सोडचिठ्ठी देताना शुभमन गिलला याबाबत कल्पना दिली होती का, असे विचारले. मात्र या दोन्ही प्रश्नांवर दोघांनाही उत्तरे देण्यास मनाई करण्यात आली.

दोन महिने रोहितशी भेट नाही!

रोहितसोबत सारे काही आलबेल असल्याचे हार्दिक म्हणाला असला तरी भारतीय संघाच्या व्यस्त कार्यक्रमामुळे गेल्या दोन महिन्यांपासून माझा रोहितशी फारसा संवाद झालेला नाही. किंबहुना मी त्याला भेटलेलोसुद्धा नाही, असे हार्दिकने सांगितले. आता रोहित सराव शिबिरासाठी मुंबईच्या चमूत दाखल झाल्यावरच त्याच्याशी मनमोकळा संवाद साधेन, असे हार्दिक म्हणाला.

यंदा हार्दिक अष्टपैलूच्या भूमिकेत

हार्दिक या हंगामात गोलंदाजी करण्यास तयार असून तो मुंबई इंडियन्ससाठी ५-६ क्रमांकावर फलंदाजी करेल, असे समजते. “मी दुखापतीतून पूर्णपणे सावरलो असून माझे शरीर उत्तम स्थितीत आहे. त्यामुळे मी आयपीएलमध्ये नक्कीच गोलंदाजी करेन व फलंदाजीत संघासाठी सामने संपवण्याची भूमिका बजावेन,” असे हार्दिक म्हणाला.

रोहितचे अखेर आगमन

आयपीएलच्या आगामी हंगामासाठी भारताचा कर्णधार रोहित मुंबई इंडियन्सच्या सराव शिबिरात सोमवारी दाखल झाला. ट्रायडेंट हॉटेलमध्ये रोहित प्रवेश करतानाची चित्रफित मुंबई इंडियन्सने ट्विटरवर पोस्ट केली असून यावर अनेकांनी ‘मुंबईचा राजा’ परतला. आता खरी आयपीएलला मजा येईल,” अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. दडपण नसताना रोहितची बेधडक फलंदाजी पाहण्यासाठी तसेच वानखेडेवर रोहित-हार्दिकला एकत्रित खेळताना पाहण्यास क्रीडाप्रेमी आतुर आहेत.

वर्कलोड मॅनेजमेंट नाहीच - बाऊचर

आयपीएलनंतर जूनच्या पहिल्याच आठवड्यात टी-२० विश्वचषक सुरू होणार आहे. त्यामुळे मुंबईच्या संघातील काही भारतीय खेळाडूंना त्या दृष्टीने विश्रांती देण्यात येणार का, असे विचारले असता प्रशिक्षक बाऊचर यांनी नकार दिला. “कोणत्याही फ्रँचायझीला त्यांच्या संघातील प्रमुख खेळाडूंनी सर्व सामने खेळावे, असे वाटते. गेल्या वर्षीसुद्धा हा मुद्दा आम्ही लक्षात घेतला होता. मात्र जोपर्यंत खेळाडू स्वत:हून विश्रांती मागणार नाही अथवा त्यांना एखादी दुखापत झाली, तरच आम्ही पर्यायी खेळाडूचा विचार करू. अन्यथा आम्ही आमचे सर्वोत्तम ११ खेळाडू प्रत्येक सामन्यात मैदानात उतरवू,” असे बाऊचर म्हणाले. तसेच सूर्यकुमार यादवच्या तंदुरुस्तीविषयी लवकरच सांगू, असे बाऊचर यांनी नमूद केले.

हे महत्त्वाचे!

- २०१५मध्ये हार्दिकने आयपीएल कारकीर्दीची सुरुवात केली. हार्दिक संघाचा भाग असताना मुंबईने चार वेळा (२०१५, २०१७, २०१९, २०२०) आयपीएल जिंकली.

- २०२२मध्ये मग तो गुजरात संघात दाखल झाला. त्याच्या नेतृत्वाखाली गुजरातने २०२२मध्ये आयपीएल जिंकली, तर २०२३मध्ये त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

- यंदा मात्र हार्दिक पुन्हा मुंबईकडून खेळताना दिसेल. नोव्हेंबरमध्ये खेळाडूंच्या लिलावानंतर हार्दिकला मुंबईने १५ कोटी रुपयांत संघात सहभागी केले. मग डिसेंबरमध्ये त्याची मुंबईच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली.

- विश्वचषकात ऑक्टोबरमध्ये हार्दिकच्या पायाला दुखापत झाल्याने तो संघाबाहेर गेला. पायावर शस्त्रक्रिया केल्यावर आता तो थेट आयपीएलमध्ये खेळताना दिसेल.

logo
marathi.freepressjournal.in