
लंडन : सर्बियाचा सहावा मानांकित नोव्हाक जोकोव्हिच आणि गतविजेता कार्लोस अल्कराझ यांनी सोमवारी विम्बल्डन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. दोघांनीही आपापले सामने पहिला सेट गमावल्यानंतर जिंकले.
पांढरा पोशाख आणि हिरव्यागार गवतावर खेळवण्यात येणाऱ्या विम्बल्डनला गौरवशाली इतिहास आहे. १८८७ पासून सुरू झालेल्या या स्पर्धेचे यंदा १३८वे पर्व आहे. बोरिस बेकर, आंद्रे आगासी, रॉजर फेडरर, पीट सॅम्प्रस, सेरेना विल्यम्स यांसारख्या दिग्गज खेळाडूंचा वारसा विम्बल्डनला लाभला आहे. त्यामुळे दरवर्षी जेव्हा जुलै महिना सुरू होतो. तेव्हा आपसुकच भारतासह जगभरातील क्रीडाप्रेमींमध्ये याविषयी चर्चा सुरू होती. लंडनमधील विम्बल्डन या गावात ग्रास कोर्टवर (हिरवे गवत) ही स्पर्धा रंगते. आता २१व्या शतकात टेनिसमध्ये नवे तारे उदयास येत असून तेसुद्धा विम्बल्डनचा समृद्ध वारसा कायम राखतील, अशी अपेक्षा आहे. मात्र जोकोव्हिच वयाच्या ३८व्या वर्षीही युवा पिढीला आव्हान देत आहे.
सेंटर कोर्टवर झालेल्या पुरुष एकेरीच्या उपउपांत्यपूर्व लढतीत सात वेळच्या विजेत्या जोकोव्हिचने ऑस्ट्रेलियाच्या ११व्या मानांकित ॲलेक्स डीमिनॉरला १-६, ६-४, ६-४, ६-४ असे चार सेटमध्ये पराभूत केले. विम्बल्डनमधील १०१वा विजय नोंदवणाऱ्या जोकोव्हिचने तब्बल १६व्यांदा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. जोकोव्हिचसमोर आता इटलीचा २२वा मानांकित फ्लाविओ कोबोलीचे आव्हान असेल. कोबोलीने मरिच चिलिचचा ६-४, ६-४, ६-७ (४-७), ७-६ (७-३) असे नमवून प्रथमच उपांत्यपूर्व फेरी गाठली. फेडरर, इंग्लंडचा क्रिकेटपटू जो रूट, जेम्स अँडरसन यावेळी उपस्थित होते.
अन्य लढतीत सलग दोन वेळचा विजेता अल्कराझने रशियाच्या १४व्या मानांकित आंद्रे रुब्लेव्हवर ६-७ (५-७), ६-३, ६-४, ६-४ अशी पिछाडीवरून चार सेटमध्ये मात केली. जोकोव्हिचच्या २५व्या ग्रँडस्लॅम जेतेपदाच्या मार्गात अल्कराझचेच मुख्य आव्हान असेल, असे म्हणू शकतो. २२ वर्षीय अल्कराझ आता उपांत्यपूर्व फेरीत अमेरिकेच्या कॅमेरून नोरीशी दोन हात करेल. कारकीर्दीत दुसऱ्यांदाच विम्बल्डनची उपांत्यपूर्व फेरी गाठणाऱ्या नोरीने निकोलस जॅरीवर पाच सेटमध्ये विजय मिळवला.
महिला एकेरीत बेलारूसच्या अग्रमानांकित आर्यना सबालेंकाने विजयी घोडदौड कायम राखताना २४व्या मानांकित एलिस मर्टन्सवर ६-४, ७-६ (७-४) असे वर्चस्व गाजवले. तसेच लॉरा सिगमंड, लियूडमिला सॅमसोनोव्हा, व बेलिंडा बेनकिक यांनीही उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. महिलांमध्ये सबालेंका आणि पोलंडची इगा स्विआटेक यांना जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे.
युकीसह भारताचे आव्हान संपुष्टात
पुरुष दुहेरीतील भारताचा शिल्लक एकमेव स्पर्धक युकी भांब्रीचे आव्हान सोमवारी उपउपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले. युकी आणि त्याचा अमेरिकन सहकारी रॉबर्ट गॅलोवो यांना मार्सेल ग्रॅनोलर्स व हार्सियो झेबालोस या चौथ्या मानांकित जोडीने ६-४, ३-६, ७-६ (१०-४) असे पराभूत केले. युकीच्या पराभवासह भारताच्या सर्व खेळाडूंचे स्पर्धेतील अभियान समाप्त झाले. रोहन बोपण्णा, श्रीराम बालाजी, ऋत्विक या खेळाडूंना दुसऱ्या फेरीतच गाशा गुंडाळावा लागला.