
लंडन : सर्बियाचा तारांकित नोव्हाक जोकोव्हिच आणि इटलीचा अग्रमानांकित यॅनिक सिनर यांनी बुधवारी मध्यरात्री (भारतीय वेळेनुसार) विम्बल्डन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. त्यामुळे आता शुक्रवारी उभय खेळाडूंमधील कोण अंतिम फेरीत प्रवेश करणार, हे पाहणे रंजक ठरेल. पुरुष एकेरीच्या अन्य उपांत्य लढतीत स्पेनचा गतविजेता कार्लोस अल्कराझ आणि अमेरिकेचा टेलर फ्रिट्झ आमनेसामने येतील.
पांढरा पोशाख आणि हिरव्यागार गवतावर खेळवण्यात येणाऱ्या विम्बल्डनला गौरवशाली इतिहास आहे. १८८७ पासून सुरू झालेल्या या स्पर्धेचे यंदा १३८वे पर्व आहे. बोरिस बेकर, आंद्रे आगासी, रॉजर फेडरर, पीट सॅम्प्रस, सेरेना विल्यम्स यांसारख्या दिग्गज खेळाडूंचा वारसा विम्बल्डनला लाभला आहे. त्यामुळे दरवर्षी जेव्हा जुलै महिना सुरू होतो, तेव्हा आपसुकच भारतासह जगभरातील क्रीडाप्रेमींमध्ये याविषयी चर्चा सुरू होती. लंडनमधील विम्बल्डन या गावात ग्रास कोर्टवर (हिरवे गवत) ही स्पर्धा रंगते. आता २१व्या शतकात टेनिसमध्ये नवे तारे उदयास येत असून तेसुद्धा विम्बल्डनचा समृद्ध वारसा कायम राखतील, अशी अपेक्षा आहे.
दरम्यान, सेंटर कोर्टवर झालेल्या पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व सामन्यात सहाव्या मानांकित जोकोव्हिचने इटलीच्या २२व्या मानांकित फ्लॅविओ कोबोलीचा ६-७ (६-८), ६-२, ७-५, ६-४ असा चार सेटमध्ये पराभव केला. जोकोव्हिचने विक्रमी १४व्यांदा विम्बल्डनच्या उपांत्य फेरीत प्रवेश करताना फेडररचा (१३ वेळा) विक्रम मोडीत काढला. आता आणखी दोन विजय मिळवून फेडररच्या आणखी एका विक्रमाची बरोबरी करू शकतो. फेडररने ८ वेळा विम्बल्डनचे जेतेपद मिळवले आहे, तर जोकोव्हिच सात जेतेपदांसह दुसऱ्या स्थानी आहे. मात्र जोकोव्हिचचा मार्ग सोपा नसेल.
कारण जोकोव्हिचपुढे आता अग्रमानांकित सिनरचे आव्हान असेल. २३ वर्षीय सिनरने एकंदर दुसऱ्यांदा विम्बल्डनची उपांत्य फेरी गाठताना अमेरिकेच्या १०व्या मानांकित बेन शेल्टनवर ७-६ (७-२), ६-४, ६-४ असे सरळ तीन सेटमध्ये वर्चस्व गाजवले. सिनरला यंदा प्रथमच अंतिम फेरी गाठण्याची संधी आहे. मात्र जोकोव्हिचविरुद्ध यापूर्वी २०२२ व २०२३मध्ये उपांत्यपूर्व फेरीत सिनरला पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे यावेळी सिनर वचपा काढणार की जोकोव्हिच त्याचे वर्चस्व कायम राखणार, याकडे सर्वांचे लक्ष असेल.
दुसरीकडे, सलग दोन वेळचा विजेता आणि दुसरा मानांकित अल्कराझ व पाचवा मानांकित फ्रिट्झ यांनी मंगळवारीच उपांत्य फेरीत आगेकूच केली. अल्कराझने कॅमेरून नॉरीला, तर फ्रिट्झने कॅरेन खाचानोव्हला नमवले. अल्कराझला सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरी गाठण्याची संधी आहे, तर फ्रिट्झ प्रथमच अशी कामगिरी करू शकतो. एकूणच शुक्रवारी सेंटर कोर्टवर सर्वांचे लक्ष असेल.