
लंडन : स्पेनचा स्टार कार्लोस अल्कराझ आपल्या तिसऱ्या विम्बल्डन विजेतेपदाच्या एक पाऊल दूर आहे. रविवारी स्पर्धेच्या अंतिम लढतीत अल्कराझसमोर पॅनिक सिनरचे आव्हान आहे. कार्लोस अल्कराज आणि जानिक सिनर यांच्यात होणारा २०२५ चा विम्बल्डन अंतिम सामना हा २००८ नंतर पहिल्यांदाच अशा दोन खेळाडूंमध्ये होणारा आहे, जे याआधी त्याच वर्षी फ्रेंच ओपन फायनलमध्ये एकमेकांविरुद्ध खेळले होते. याआधी केवळ रोजर फेडरर आणि राफेल नादाल यांच्यात २००६ ते २००८ दरम्यान अशीच लढत झाली होती.
विम्बल्डन पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीच्या लढतीत शुक्रवारी उशिरा सिनरने नोवाक जोकोविचला ६-३, ६-३, ६-४ असे पराभूत करत स्पर्धेच्या अंतिम फेरीत आपली जागा निश्चित केली. तत्पूर्वी अल्कराझने टेलर फ्रिट्झला ६-४, ५-७, ६-३, ७-६ (६) अशी धूळ चारत अंतिम फेरीत प्रवेश केला.
फ्रेंच ओपननंतर ५ आठवड्यांनी पुन्हा एकदा सिनर आणि अल्कराझ हे दिग्गज खेळाडू जेतेपद पटकावण्यासाठी आमनेसामने येणार आहेत.
पॅरिसमध्ये अल्कराझ आणि सिनर यांच्यात अटीतटीचा सामना झाला होता. या लढीतबद्दल विचारल्यावर अल्कराझ म्हणाला की, माझ्या कारकीर्दीतील आतापर्यंतचा तो अविस्मरणीय सामना होता. रविवारी होणारा सामनाही विशेष असेल. मी त्यासाठी उत्सुक असल्याचे अल्कराझ म्हणाला. हा सामना साडेपाच तास चालेल अशी आशा मला नाही. तो हसत म्हणाला की, तसे झाल्यास मी तयार आहे. मात्र हा सामना चांगला होईल, अशी आशा अल्कराझने व्यक्त केली.
गेल्या लढतीसारखा हा सामनाही अटीतटीचा होईल. मात्र त्यापेक्षा हा सामना अधिक चांगला होईल असे मला वाटत नाही, असे सिनर म्हणाला.
इटलीचा २३ वर्षीय सिनर आणि स्पेनचा २२ वर्षीय अल्कराझ हे दोन सध्याच्या काळातील दिग्गज खेळाडू आहेत. गेल्या सहा मोठ्या स्पर्धांमध्ये विजेतेपदाचा मुकुट या दोघांपैकी एकाने पटकावला आहे.
ग्रँडस्लॅमच्या अंतिम फेरीत अल्कराझ ५-० असा अपराजित आहे. सिनरने तीन मोठी पारितोषिके जिंकली आहेत.
सिनरसाठी ही सलग चौथी ग्रँडस्लॅम अंतिम फेरी असेल. त्याने सप्टेंबरमध्ये यूएस ओपन आणि जानेवारीत ऑस्ट्रेलियन ओपन जिंकले आहे. दरम्यान या अंतिम फेरीतील लढतीकडे क्रीडा जगताचे लक्ष लागले आहे.