
लंडन : विम्बल्डन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेतील पहिल्याच दिवशी तारांकित खेळाडूंना धक्के बसले. एकीकडे रशियाच्या डॅनिल मेदवेदेवसह डेन्मार्कच्या होल्गर रूनला पराभवाला सामोरे जावे लागले, तर ग्रीसच्या स्टेफानोस त्सित्सिपासने दुखापतीमुळे माघार घेतली.
पांढरा पोशाख आणि हिरव्यागार गवतावर खेळवण्यात येणाऱ्या विम्बल्डनला गौरवशाली इतिहास आहे. १८८७ पासून सुरू झालेल्या या स्पर्धेचे यंदा १३८वे पर्व आहे. बोरिस बेकर, आंद्रे आगासी, रॉजर फेडरर, पीट सॅम्प्रस, सेरेना विल्यम्स यांसारख्या दिग्गज खेळाडूंचा वारसा विम्बल्डनला लाभला आहे. त्यामुळे दरवर्षी जेव्हा जुलै महिना सुरू येतो, तेव्हा आपसुकच भारतासह जगभरातील क्रीडाप्रेमींमध्ये याविषयी चर्चा सुरू होती. लंडनमधील विम्बल्डन या गावात ग्रास कोर्टवर (हिरवे गवत) ही स्पर्धा रंगते. आता २१व्या शतकात टेनिसमध्ये नवे तारे उदयास येत असून तेसुद्धा विम्बल्डनचा समृद्ध वारसा कायम राखतील, अशी अपेक्षा आहे.
दरम्यान, पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत फ्रान्सच्या बिगरमानांकित बेंजामिन बोन्झीने नवव्या मानांकित मेदवेदेवला ७-६ (७-२), ३-६, ७-६ (७-३), ६-२ असे चार सेटमध्ये पराभूत केले. तसेच २४व्या मानांकित व्हलेंटाइन रोव्हरने २४व्या मानांकित त्सित्सिपासविरुद्ध ६-३, ६-२ अशी आघाडी घेतली होती. त्यावेळी त्सित्सिपासला पाठदुखीने छेडले. अखेरीस त्याला माघार घ्यावी लागली.
तसेच निकोलस जॅरीने आठव्या मानांकित रूनला ६-४, ६-४, ५-७, ६-३, ६-४ असे पिछाडीवरून पराभूत केले. त्याशिवाय स्पेनचा कार्लोस अल्कराझही पहिल्याच फेरीत पाचव्या सेटपर्यंत झुंज देत होता. मंगळवारी इटलीचा जॅनिक सिनर व जोकोव्हिच आपापल्या अभियानाची सुरुवात करतील.
२०२४मध्ये पुरुष एकेरीत अल्कराझने, तर महिलांमध्ये बार्बोरा क्रेजिकोव्हाने बाजी मारली. यंदासुद्धा तेच बाजी मारणार की कोणी नवा खेळाडू विजेता होणार, हे पाहणे रंजक ठरेल.