
लंडन : विश्वातील सर्वोत्तम टेनिसपटूंपैकी एक मानल्या जाणाऱ्या सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचने शनिवारी रात्री विम्बल्डन कारकीर्दीतील दमदार शतक साकारले. ३८ वर्षीय जोकोव्हिचने विम्बल्डन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेच्या चौथ्या फेरीत मजल मारतानाच या स्पर्धेतील एकंदर १००वा विजय नोंदवला. अशी कामगिरी करणारा तो विश्वातील अवघा तिसरा टेनिसपटू ठरला.
पांढरा पोशाख आणि हिरव्यागार गवतावर खेळवण्यात येणाऱ्या विम्बल्डनला गौरवशाली इतिहास आहे. १८८७ पासून सुरू झालेल्या या स्पर्धेचे यंदा १३८वे पर्व आहे. बोरिस बेकर, आंद्रे आगासी, रॉजर फेडरर, पीट सॅम्प्रस, सेरेना विल्यम्स यांसारख्या दिग्गज खेळाडूंचा वारसा विम्बल्डनला लाभला आहे. त्यामुळे दरवर्षी जेव्हा जुलै महिना सुरू होतो. तेव्हा आपसुकच भारतासह जगभरातील क्रीडाप्रेमींमध्ये याविषयी चर्चा सुरू होती. लंडनमधील विम्बल्डन या गावात ग्रास कोर्टवर (हिरवे गवत) ही स्पर्धा रंगते. आता २१व्या शतकात टेनिसमध्ये नवे तारे उदयास येत असून तेसुद्धा विम्बल्डनचा समृद्ध वारसा कायम राखतील, अशी अपेक्षा आहे. मात्र जोकोव्हिच वयाच्या ३८व्या वर्षीही युवा पिढीला आव्हान देत आहे.
सेंटर कोर्टवर झालेल्या पुरुष एकेरीच्या तिसऱ्या फेरीतील सामन्यात सहाव्या मानांकित जोकोव्हिचने सर्बियाच्याच मिमीर केमानोव्हिचला ६-३, ६-०, ६-४ अशी धूळ चारली. आता सोमवारी जोकोव्हिचसमोर उपउपांत्यपूर्व फेरीत ऑस्ट्रेलियाच्या ११व्या मानांकित अॅलेक्स डीमिनॉरचे आव्हान असेल. त्याशिवाय अग्रमानांकित यॅनिक सिनर, बेन शेल्टन, मरिन चिलिच यांनीही आगेकूच केली.
दरम्यान, २४ ग्रँडस्लॅम जेतेपदे नावावर असलेल्या जोकोव्हिचने ७ वेळा विम्बल्डनचा किबात पटकावला आहे. त्यामुळे पुरुषांमध्ये सर्वाधिक जेतेपदे नावावर असलेल्या फेडररची (८) बरोबरी साधण्याची जोकोव्हिचला उत्तम संधी आहे. केमानोव्हिचविरुद्ध जोकोव्हिचने सलग ९ गेम जिंकले. तसेच विम्बल्डनमध्ये १०० सामने जिंकणाऱ्यांच्या यादीत फेडरर आणि मार्टिना नवरातिलोव्हा यांच्यानंतर तिसरे स्थान प्राप्त केले. विजयानंतर जोकोव्हिचने आपल्या मुलीसाठी केलेले खास सेलिब्रेशनही सध्या समाज माध्यमांवर चर्चेचा विषय आहे. जोकोव्हिच आता स्पर्धेत कुठवर मजल मारतो, हे पाहणे रंजक ठरणार आहे.
भारताचा युकी उपउपांत्यपूर्व फेरीत
भारताच्या युकी भ्रांबीने पुरुष दुहेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. ३३ वर्षीय युकीच्या रुपात भारताचा एकमेव स्पर्धक अद्यापही विम्बल्डनमध्ये टिकून आहे. युकी आणि त्याचा अमेरिकन साथीदार रॉबर्ट गॅलोवे या १६व्या मानांकित जोडीने नुनो बोर्गस व मार्कस गिरोन यांच्यावर ६-३, ७-६ (८-६) अशी मात केली. आता सोमवारी युकी-गॅलोवे यांची मार्सेल ग्रॅनोल्स व होरासियो झेबालस या चौथ्या मानांकित जोडीशी गाठ पडेल. भारताचे अन्य स्पर्धेक रोहन बोपण्णा, श्रीराम बालाजी, ऋत्विक बोलीपल्ली स्पर्धेबाहेर गेले आहेत.