आता वेध विम्बल्डनचे! जोकोव्हिच, सिनर एकाच ‘ड्रॉ’मध्ये; अल्कराझचा मार्ग काहीसा सोपा

चार प्रतिष्ठित ग्रँडस्लॅम स्पर्धांपैकी सर्वात महत्त्वाची मानल्या जाणाऱ्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेचे चाहत्यांना वेध लागले आहेत. साधारणपणे जुलैच्या पहिल्या आठवड्यात रंगणाऱ्या या स्पर्धेचे वेळापत्रक शुक्रवारी जाहीर करण्यात आले. त्यानुसार इटलीचा अग्रमानांकित जॅनिक सिनर व सर्बियाचा नोव्हाक जोकोव्हिच एकाच ड्रॉमध्ये असून ते उपांत्य फेरीत आमनेसामने येऊ शकतात.
आता वेध विम्बल्डनचे! जोकोव्हिच, सिनर एकाच ‘ड्रॉ’मध्ये; अल्कराझचा मार्ग काहीसा सोपा
Published on

लंडन : चार प्रतिष्ठित ग्रँडस्लॅम स्पर्धांपैकी सर्वात महत्त्वाची मानल्या जाणाऱ्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेचे चाहत्यांना वेध लागले आहेत. साधारणपणे जुलैच्या पहिल्या आठवड्यात रंगणाऱ्या या स्पर्धेचे वेळापत्रक शुक्रवारी जाहीर करण्यात आले. त्यानुसार इटलीचा अग्रमानांकित जॅनिक सिनर व सर्बियाचा नोव्हाक जोकोव्हिच एकाच ड्रॉमध्ये असून ते उपांत्य फेरीत आमनेसामने येऊ शकतात. यंदा ३० जून ते १३ जुलै या कालावधीत विम्बल्डनचा थरार चाहत्यांना अनुभवता येईल.

पांढरा पोशाख आणि हिरव्यागार गवतावर खेळवण्यात येणाऱ्या विम्बल्डनला गौरवशाली इतिहास आहे. १८८७पासून सुरू झालेल्या या स्पर्धेचे यंदा १३८वे पर्व आहे. बोरिस बेकर, आंद्रे आगासी, रॉजर फेडरर, पीट सॅम्प्रस, सेरेना विल्यम्स यांसारख्या दिग्गज खेळाडूंचा वारसा विम्बल्डनला लाभला आहे. त्यामुळे दरवर्षी जेव्हा जुलै महिना जवळ येतो, तेव्हा आपसुकच भारतासह जगभरातील क्रीडाप्रेमींमध्ये याविषयी चर्चा सुरू होती. लंडनमधील विम्बल्डन या गावात ग्रास कोर्टवर (हिरवे गवत) ही स्पर्धा रंगते. आता २१व्या शतकात टेनिसमध्ये नवे तारे उदयास येत असून तेसुद्धा विम्बल्डनचा समृद्ध वारसा कायम राखतील, अशी अपेक्षा आहे. स्पेनचा कार्लोस अल्कराझ, सिनर ही यांपैकीच काही नावे. मात्र ‘फॅब फोर’मधील जोकोव्हिच वयाच्या ३८व्या वर्षीही युवा पिढीला आव्हान देत आहे. २०२४मध्ये पुरुष एकेरीत अल्कराझने, तर महिलांमध्ये बार्बोरा क्रेजिकोव्हाने बाजी मारली. त्यामुळे यंदा या दोघांना कोणी आव्हान देणार का, हे पाहणे रंजक ठरेल.

दरम्यान, शुक्रवारी जाहीर करण्यात आलेल्या कार्यक्रमपत्रिकेनुसार जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असल्याने सिनरलाच पुरुषांमध्ये अग्रमानांकन देण्यात आले आहे. तर जूनमध्ये फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्कराझला दुसरे मानांकन लाभले आहे. सिनर व जोकोव्हिच यांनी अपेक्षित वाटचाल केली, तर उपांत्य फेरीत आमनेसामने येऊ शकतात. दुसरीकडे अल्कराझला अलेक्झांडर झ्वेरेव्ह, डॅनिल मेदवेदेव यांचा अडथळा पार करत अंतिम फेरी गाठावी लागेल.

२४ ग्रँडस्लॅम जेतेपदे नावावर असलेल्या जोकोव्हिचने सात वेळा विम्बल्डन जिंकलेले आहे. मात्र गेल्या २ वर्षांपासून अल्कराझ सर्वांवर भारी पडत आहे. वाढते वय व तंदुरुस्तीशी निगडीत विविध समस्यांमुळे जोकोव्हिचला २०२४पासून एकही ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकता आलेली नाही. त्यामुळे आता अल्कराझ हॅटट्रिक साधणार की जोकोव्हिच आठव्यांदा विम्बल्डन जिंकून फेडररच्या विक्रमाची बरोबरी करणार, याकडेही लक्ष असेल. स्वित्झर्लंडच्या फेडररने विक्रमी ८ वेळा विम्बल्डनचे जेतेपद मिळवले आहे. मात्र आता फेडरर, राफेल नदाल असे तारांकित खेळाडू निवृत्त झाले असून जोकोव्हिचच युवा पिढीला झुंज देत आहे.

महिलांमध्ये पोलंडच्या इगा स्विआटेकला अग्रमानांकन लाभले आहे, तर फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अमेरिकेच्या कोको गॉफला दुसरे मानांकन देण्यात आले आहे. उपांत्यपूर्व फेरीत गॉफ आणि इगा स्विआटेक, सबालेंका आणि मॅडीसन कीझ एकमेकींविरुद्ध उभ्या ठाकू शकतात. चेक प्रजासत्ताकच्या माजी टेनिसपटू मार्टिन नवरातिलोव्हा यांनी महिला एकेरीत सर्वाधिक ९ वेळा विम्बलडने जेतेपद मिळवले आहे.

एकंदर, अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपलेल्या या स्पर्धेचे भारतातही दर्दी क्रीडाप्रेमी आहेत. तसेच सेंटर कोर्टवरील रॉयल लंडन क्लबमध्ये भारतासह जगभरातील क्रीडापटू विम्बल्डन पाहण्यासाठी नक्की उपस्थित असतील.

भारताचे एकूण चार स्पर्धक

विम्बल्डनमध्ये भारताचे चार खेळाडू सहभागी होणार असून हे चारही पुरुष दुहेरीचा भाग असतील. यांपैकी अनुभवी रोहन बोपण्णावर सर्वाधिक लक्ष असेल. बोपण्णा त्याचा बेल्जियमचा सहकारी सँडर गिलसह खेळणार आहे. तसेच युकी भांब्री अमेरिकेच्या रॉबर्ट गॅलोवेसह दुहेरीत सहभागी होईल. श्रीराम बालाजी मेक्सिकोच्या मिगुएल वॅलेराच्या साथीने स्पर्धेत खेळेल, तर ऋत्विक बोलीपल्ली रोमानियनच्या निकोलस बॅरिंटोससह खेळताना दिसेल. पुरुष अथवा महिला एकेरीत भारताचा एकही स्पर्धक मुख्य फेरीसाठी पात्र ठरलेला नाही. त्यामुळे दुहेरीतच जेमतेम आशा आहे.

यंदा पंचांऐवजी नव्या तंत्रज्ञानाचा वापर

विम्बल्डनच्या इतिहासात यंदा प्रथमच रेषा पंचांच्या जागी (लाइन अंपायर) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येईल. चेंडूच्या टप्प्यावर लक्ष ठेवण्यासाठी आता इलेक्ट्रॉनिक लाइन अंपायर्स असतील. हार्ड कोर्टवरील स्पर्धांसाठी ही प्रणाली आधीपासूनच वापरली जाते. मात्र ग्रास कोर्टवरील विम्बल्डनमध्ये याचा प्रथमच अवलंब केला जाईल.

logo
marathi.freepressjournal.in