एक लढत जिंका आणि आशियाई स्पर्धेत खेळा! आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंसाठी विशेष सवलत

काही कुस्तीगिरांची केवळ सामन्याच्या आधारे निवड होणार आणि आमच्या मुलांना पूर्ण निवड चाचणी स्पर्धेत खेळावे लागणार
एक लढत जिंका आणि आशियाई स्पर्धेत खेळा! 
आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंसाठी विशेष सवलत

विनेश फोगट, साक्षी मलिक, बजरंग पुनिया, संगीता फोगट, सत्यवर्त कडियन आणि जितेंदर किन्हा या सहा आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंना अवघी एक लढत जिंकून आशियाई क्रीडा स्पर्धेची पात्रता मिळवता येणार आहे. कुस्ती महासंघाचे कामकाज पाहण्यासाठी भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (आयओए) नियुक्त केलेल्या हंगामी समितीने आशियाई तसेच जागतिक स्पर्धेच्या निवडीसाठी विशेष सवलत दिली असून हे सहाही कुस्तीपटू एका विजयाच्या आधारे भारतीय संघातील स्थान पक्के करू शकतात.

भारतीय कुस्ती महासंघाचे (डब्ल्यूएफआय) मावळते अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांनी महिला कुस्तीपटूचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली या कुस्तीपटूंनी गेल्या महिन्यात जंतरमंतर येथे आंदोलन केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा झाल्यानंतर कुस्तीपटूंचे आंदोलन थांबले. मात्र यादरम्यान आगामी आशियाई स्पर्धेच्या निमित्ताने त्यांचे सरावाकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे त्या कुस्तीपटूंनी सरावासाठी पुरेसा वेळ तसेच सुविधा पुरवण्याची तसेच ऑगस्टमध्ये निवड चाचणीचे आयोजन करण्याची मागणी केली होती.

आता या सहा कुस्तीपटूंना निवड चाचण्यांना मुकण्याची मुभा देण्यात आली असून निवड चाचणीतील विजेत्यांविरुद्ध ५ ते १५ ऑगस्टदरम्यान ते प्रत्येकी एक लढत खेळतील. ती लढत जिंकल्यास आंदोलनकर्ते कुस्तीपटू आशियाई स्पर्धेसाठी पात्र ठरतील. मात्र यामुळे निवड चाचणी जिंकणाऱ्या कुस्तीपटूंचे नुकसान होईल, याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. २३ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर दरम्यान हँगझू (चीन) येथे यंदाची आशियाई स्पर्धा खेळवण्यात येणार आहे.

हंगामी समितीला आशियाई स्पर्धेसाठीची निवड चाचणी १५ जुलैपूर्वी घेणे बंधनकारक आहे. त्यानंतर भारतीय खेळाडूंची अंतिम यादी आयोजकांना देणे गरजेचे आहे. मात्र आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंना देण्यात आलेल्या सवलतीमुळे अन्य कुस्तीपटू नाराज होण्याची शक्यता आहे.

आमच्या मुलांवर अन्याय का?

केवळ एका सामन्याच्या आधारे आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंची भारतीय संघात निवड करण्याच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. “भारतीय कुस्तीमध्ये आता बदल होत आहेत असे म्हटले जाते. मात्र, त्यात खरेच तथ्य आहे का? आताही पूर्वीप्रमाणेच गोष्टी घडत आहे. काही कुस्तीगिरांना विशेष सवलती मिळत आहेत. काही कुस्तीगिरांची केवळ सामन्याच्या आधारे निवड होणार आणि आमच्या मुलांना पूर्ण निवड चाचणी स्पर्धेत खेळावे लागणार, हा अन्याय आहे,” असे मत एका कुस्तीगिराच्या वडिलांनी नाव न सांगण्याच्या अटीवर व्यक्त केले.

logo
marathi.freepressjournal.in