३३ वर्षांनंतर विंडिजचा आश्चर्याचा धक्का

३३ वर्षांनंतर विंडिजचा आश्चर्याचा धक्का

१८ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर दरम्यान झालेल्या या विश्वचषकात विंडीजला पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाने धू़ळ चारली

पहिल्या तीन ट्वेन्टी-२० विश्वचषकात अनुक्रमे भारत, पाकिस्तान आणि इंग्लंड या संघांनी जेतेपदावर मोहोर उमटवल्यानंतर २०१२च्या ट्वेन्टी-२० विश्ववचषकातसुद्धा नवा विजेता उदयास होईल, असेच अनेकांना वाटले. त्यातच श्रीलंका घरच्या मैदानावर खेळत असल्याने तेच यावेळी विश्वचषक उंचावणार, असे भाकीत अनेकांनी वर्तवले. मात्र डॅरेन सामीच्या नेतृत्वाखालील वेस्ट इंडिज संघाने सर्वांना आश्चर्याचा धक्का देत पहिल्यांदाच ट्वेन्टी-२० विश्वचषक उंचावला. त्यामुळे १९७९नंतर प्रथमच एखादी आयसीसी स्पर्धा जिंकण्यात विंडीजला यश आले.

१८ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर दरम्यान झालेल्या या विश्वचषकात विंडीजला पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाने धू़ळ चारली. त्यानंतर आयर्लंडविरुद्धची लढत पावसामुळे रद्द झाल्यामुळे नेट रनरेटच्या बळावर त्यांनी गटातून दुसऱ्या स्थानासह सुपर-आठ फेरी गाठली. तेथे मात्र विंडीजने खेळ उंचावला. त्यांनी इंग्लंड, न्यूझीलंड संघांना पराभूत केले. तर श्रीलंकेविरुद्ध पराभूत होऊनही दुसऱ्या स्थानासहच त्यांनी उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले. उपांत्य लढतीत विंडीजने चक्क ऑस्ट्रेलियाचा सुपडा साफ केला. ख्रिस गेलने साकारलेल्या वादळी खेळीपुढे ऑस्ट्रेलियन गोलंदाज हतबल ठरले. त्यामुळे विंडीजने तब्बल ७४ धावांनी मोठा विजय मिळवून प्रथमच अंतिम फेरीत धडक मारली.

अपेक्षेप्रमाणे अंतिम फेरीत विंडीजसमोर श्रीलंकेचेच आव्हान उभे ठाकले. श्रीलंकेने सुपर-आठमधील सर्व सामने जिंकतानाच उपांत्य लढतीत पाकिस्तानवर प्रभुत्व मिळवले होते. त्याशिवाय लसिथ मलिंगा, महेला जयवर्धने, कुमार संगकारा, तिलकरत्ने दिलशान असे खेळाडू त्यांच्या ताफ्यात होते. कोलंबोला झालेल्या अंतिम फेरीत विंडीजने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ६ बाद जेमतेम १३७ धावा केल्या. मार्लन सॅम्युअलने ७८ धावांची झुंजार खेळी साकारली. मात्र श्रीलंका हे लक्ष्य सहज गाठेल, असेच वाटले.

प्रत्यक्षात मात्र यावेळी विंडीजच्या गोलंदाजांनी धमाल उडवून दिली. सुनील नरिनच्या फिरकीपुढे श्रीलंकेचा डाव १०१ धावांत संपुष्टात आला. नरिनने तीन बळी मिळवले आणि अशाप्रकारे विंडीजने विश्वचषकावर वर्चस्व प्रस्थापित केले. आता आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषक काही दिवसांवर असताना विंडीज संघ त्या कामगिरीतून प्रेरणा घेत सर्वप्रथम प्राथमिक फेरी व नंतर अव्वल-१२ फेरीचा अडथळा अोलांडणार का, हे पाहणे रंजक ठरेल.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in