विंडीजचा २७ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात विजय;शमर जोसेफच्या भेदक गोलंदाजीमुळे वेस्ट इंडिजची ८ धावांनी सरशी

वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावातील शेवटच्या चेंडूवर शमर जोसेफच्या पायाच्या बोटाला दुखापत झाली आणि त्याने मैदान सोडण्याचा निर्णय घेतला.
विंडीजचा २७ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात विजय;शमर जोसेफच्या भेदक गोलंदाजीमुळे वेस्ट इंडिजची ८ धावांनी सरशी

ब्रिस्बेन : पायाच्या बोटाला दुखापत झाल्यानंतर त्याने मैदान सोडले.. पण जिद्द सोडली नाही. संघाला गरज असताना तो मैदानावर उतरला आणि वेस्ट इंडिजला गतवैभव प्राप्त करून देण्यात त्याने मोलाची कामगिरी बजावली. वेस्ट इंडिजचा नवा वेगवान गोलंदाज शमर जोसेफ याने दुसऱ्या डावात घेतलेल्या सात विकेट्समुळे पाहुण्यांनी ऑस्ट्रेलियाला ८ धावांनी पराभूत केले. या विजयासह वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियात तब्बल २७ वर्षांनंतर पहिली कसोटी जिंकण्याची करामत केली.

वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावातील शेवटच्या चेंडूवर शमर जोसेफच्या पायाच्या बोटाला दुखापत झाली आणि त्याने मैदान सोडण्याचा निर्णय घेतला. मात्र रविवारी पुन्हा एकदा मैदानावर परतत त्याने ऑस्ट्रेलियाचा डाव २०७ धावांवर संपुष्टात आणला आणि आपल्या संघाला ८ धावांनी विजय मिळवून दिला. सलामीवीर स्टीव्ह स्मिथने नाबाद ९१ धावांची खेळी करत शेवटपर्यंत निकराची झुंज दिली. मात्र त्याला अन्य फलंदाजांची साथ न लाभल्यामुळे ऑस्ट्रेलियाला पराभवाचे तोंड पाहावे लागले.

“माझ्या सहकाऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आता तुम्ही पुढे यायला हवे. मी आज मैदानावरही उतरणार नव्हतो. पण डॉक्टरांनी माझ्या पायाच्या अंगठ्यावर उपचार केले. त्यांनी काय केले, हे मला माहित नाही. पण त्यांची मेहनत कामास आली. कसोटीत पहिल्यांदाच एका डावात पाच विकेट्स मिळवण्याची करामत केल्याने मी खूप खूश आहे,” असे जोसेफने सांगितले. याआधीच्या ॲॅडलेड कसोटीत जोसेफने पदार्पण केले होते, पण ती कसोटी वेस्ट इंडिजला १० विकेट्सने गमवावी लागली. पण जोसेफने जोश हेझलवूडला त्रिफळाचीत करत वेस्ट इंडिजला या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधून दिली. १९९७मध्ये वाका येथे वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियावर १० विकेट्सनी विजय मिळवला होता, तेव्हापासून त्यांना एकदाही ऑस्ट्रेलियात जिंकता आलेले नाही.

वेस्ट इंडिजने विजयासाठी ठेवलेले २१६ धावांचे आव्हान पार करताना कॅमेरून ग्रीन आणि स्मिथ यांनी तिसऱ्या विकेटसाठी ७१ धावांची भागीदारी रचत ऑस्ट्रेलियाला विजयाच्या आशा दाखवल्या होत्या. मात्र शमर जोसेफचे आगमन झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या डावाला उतरती कळा लागली. त्याने सर्वप्रथम ग्रीनचा (४२) त्रिफळा उद्ध्वस्त केल्यानंतर पुढच्याच चेंडूवर ट्रेव्हिस हेडलाही (०) माघारी पाठवले. त्यानंतर मिचेल मार्शला (१०) त्याने स्थिरावण्याची संधी न देता जस्टिन ग्रीव्हजकरवी झेलबाद केले. ताशी १५० किमी वेगाने गोलंदाजी करणाऱ्या शमरने कर्णधार ॲलेक्स कॅरीचाही (२) अडसर दूर केला. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघ ६ बाद १३६ अशा अडचणीत सापडला होता. त्यानंतर मिचेल स्टार्कने (२१) स्मिथसह ३५ धावा जोडल्या. पण स्टार्क आणि पॅट कमिन्स (२) लागोपाठ माघारी परतल्यावर शमरने ११व्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेल्या हेझलवूडचा त्रिफळा उडवत वेस्ट इंडिजच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. शमर जोसेफने सात विकेट्स मिळवत विंडीजच्या विजयात मोलाचे योगदान दिले. त्याला अल्झारी जोसेफने दोन बळी टिपत चांगली साथ दिली.

कोण आहे शमर जोसेफ?

कॅरेबियनमधील बराचरा नावाच्या एका दुर्गम भागात जन्मलेला शमर जोसेफ याच गावात लहानाचा मोठा झाला. त्याच्या गावची लोकसंख्या अंदाजे ३५० च्या घरात असेल. हा भाग इतका दुर्गम आहे की २०१८ मध्ये या ठिकाणी इंटरनेट पोहोचले. आधी मजूर आणि नंतर १२ तास सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या जोसेफने २०२३ मध्ये अचानक काम सोडले आणि क्रिकेटर बनण्याचा निर्णय घेतला. शमरला २०२४ मध्ये वेस्ट इंडिजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळाली आणि या संधीचे सोने करत त्याने अगदी पहिल्याच चेंडूवर विकेट मिळवली. शमर जोसेफने आपले नाव इतिहासात सोनेरी अक्षरात लिहिले. गयाना प्रथम श्रेणी संघात स्थान मिळवल्यानंतर जोसेफला यश मिळाले. लवकरच, त्याच्या दृढनिश्चयामुळे त्याने कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये नेट गोलंदाज म्हणून काम करण्यास सुरुवात केली. एका खेळाडूला दुखापत झाल्यावर गयाना ॲमेझॉन वॉरियर्सने त्याला बदली म्हणून बोलावले. ताशी १४०-१४५ किमी वेगाने गोलंदाजी करणारा जोसेफ या स्पर्धेतील सर्वात वेगवान गोलंदाजांपैकी एक होता. त्या सिझनमध्ये त्याने गयाना वॉरियर्सला चॅम्पियन बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

logo
marathi.freepressjournal.in