
डेन्मार्कच्या अव्वल मानांकित व्हिक्टर अॅक्सेलसनने पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात चीनच्या झाओ जुन पेंगला २१-९, २१-१० अशा फरकाने पराभूत करून इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. यासह त्याने दुसऱ्यांदा या स्पर्धेत चॅम्पियन होण्याचा बहुमान पटकावला. अलेक्सनने सलग तिसऱ्यांदा आणि एकूण पाचव्यांदा झाओला पराभवाची धूळ चारली.
चीनच्या झाओ जुन पेंगला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्याने सर्वोत्तम खेळ करत विजयी मोहीम कायम ठेवत अंतिम फेरी गाठली होती. मात्र त्याला या सामन्यात आपली लय कायम ठेवण्यात अपयश आले.
महिलांमध्ये ताई यिंगला विजेतेपद
महिला एकेरीत चायनीज तैपेईच्या ताई झू यिंग हिने विजेतेपद पटकाविले. तिने चीनच्या वांग झी यी हिचा २१-२३, २१-६, २१-१५ ने पराभव करत अंतिम सामना जिंकला. पहिल्या गेममधून अपयशातून सावरत ताई यिंगने दमदार मुसंडी मारत सामना विजेतेपदाचा मान मिळविला.