
वडोदरा : हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय महिला संघ मंगळवारी वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत विजयी आघाडी घेण्याच्या निर्धाराने मैदानात उतरेल. वडोदरा येथील कोटांबी स्टेडियमवर उभय संघांतील दुसरी लढत खेळवण्यात येईल.
रविवारी झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने विंडीजचा २११ धावांनी धुव्वा उडवला. एकदिवसीय प्रकारात भारतीय महिलांचा हा दुसऱ्या क्रमांकाचा मोठा विजय ठरला. त्यामुळे आता टी-२० मालिकेनंतर एकदिवसीय मालिकेतही यश संपादन करण्यासाठी भारतीय संघ उत्सुक असेल. २०२५मध्ये भारतातच एकदिवसीय विश्वचषक रंगणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आतापासूनच विश्वचषकासाठी संघबांधणीवर भारताने लक्ष द्यायला पाहिजे. शफाली वर्माचे या संघात पुनरागमन होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
दरम्यान, भारताच्या बाजूचा आढावा घेतल्यास सलग ४ अर्धशतके झळकावणारी स्मृती मानधना भन्नाट लयीत असून पदार्पणवीर प्रतिका रावल, हरलीन देओल, हरमनप्रीत, जेमिमा रॉड्रिग्ज यांनीही पहिल्या लढतीत छाप पाडली. त्यामुळे त्यांच्याकडून सातत्य अपेक्षित आहे. गोलंदाजीत अनुभवी रेणुका सिंग विंडीजसाठी पुन्हा धोकादायी ठरू शकते. गेल्या लढतीत सामनावीर ठरल्यामुळे तिचा आत्मविश्वास बळावला आहे. तसेच तितास साधू, साईमा ठाकोर, दीप्ती शर्मा असे गोलंदाज भारताच्या ताफ्यात आहेत. प्रिया मिश्रा फिरकीत उत्तम योगदान देत आहे.
दुसरीकडे वेस्ट इंडिजला मालिकेतील आव्हान टिकवण्यासाठी ही लढत जिंकणे गरजेचे आहे. तसेच ते अद्याप एकदिवसीय विश्वचषकासाठी पात्र ठरलेले नाहीत. त्यामुळे विंडीजला कामगिरी उंचावण्याची गरज आहे. कर्णधार हीली मॅथ्यूजसह दिएंड्रा डॉटिन, शीमेन कॅम्पबेल, अफी फ्लेचर या खेळाडूंवर विंडीजची भिस्त आहे. मात्र त्यांच्यात सांघिक कामगिरीचा अभाव आढळतो.
वेळ : दुपारी १.३० वाजल्यापासून
थेट प्रक्षेपण : स्पोर्ट्स १८ वाहिनी आणि जिओ सिनेमा ॲप