महाराष्ट्राच्या दोन्ही कबड्डी संघांचा विजयारंभ: ६व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेला दणक्यात प्रारंभ

चेन्नईतील जवाहरलाल नेहरू इनडोअर स्टेडियममध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत कबड्डी प्रकारात मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या आक्रमणासमोर तेलंगणाचा निभाव लागला नाही.
महाराष्ट्राच्या दोन्ही कबड्डी संघांचा विजयारंभ: ६व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेला दणक्यात प्रारंभ

चेन्नई : चेन्नई येथे सुरू झालेल्या ६व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या दोन्ही कबड्डी संघांनी दमदार विजयारंभ केला. महाराष्ट्राच्या मुलींनी तेलंगणाचा ६६-१४ असा धुव्वा उडवला, तर मुलांनी बिहारचा ४८-१९ असा फडशा पाडला.

चेन्नईतील जवाहरलाल नेहरू इनडोअर स्टेडियममध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत कबड्डी प्रकारात मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या आक्रमणासमोर तेलंगणाचा निभाव लागला नाही. मध्यंतरालाच महाराष्ट्राकडे ३५-६ अशी मोठी आघाडी होती. कर्णधार हरजित कौर संधूने अष्टपैलू खेळ केला. तिला समृद्धी मोहिते, आर्या पाटील यांच्या चढाया तसेच कल्याणी कडेलो, भूमिका गोरे यांच्या पकडीची उत्तम साथ लाभली. त्यामुळे महाराष्ट्राने तब्बल ५२ गुणांच्या फरकाने विजय मिळवला.

मुलांच्या गटातही महाराष्ट्राने बिहारला सर्व आघाड्यांवर निष्प्रभ केले. मध्यंतराला २८-८ अशी आघाडी घेणाऱ्या महाराष्ट्राच्या विजयात गजानन कुरे, क्षितीज ठोंबरे यांच्या चौफेर चढाया व कर्णधार अर्जून गावडे, विशाल ब्राम्हणे यांच्या अचूक पकडींनी मोलाची भूमिका बजावली. पुढील लढतींमध्ये महाराष्ट्रासमोर अनुक्रमे राजस्थान व मध्य प्रदेशचे आव्हान असेल. मुलींच्या संघाला हरयाणा व तामिळनाडूला सामोरे जावे लागेल.

logo
marathi.freepressjournal.in