दुबई : महिलांची टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा आता बांगलादेशऐवजी संयुक्त अरब अमिराती म्हणजेच यूएई येथे खेळवण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) घेतला आहे. बांगलादेशमधील वाढत्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
बांगलादेश येथे यंदा ३ ते २० ऑक्टोबरदरम्यान महिलांच्या टी-२० विश्वचषकाचे नववे पर्व रंगणार होते. मात्र बांगलादेशमधील स्थिती सध्या घातक असून यामुळे खेळाडूंच्या सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते. त्यामुळे आयसीसीचे मुख्य कार्यकारी जेफ अलार्डीस यांनी ही स्पर्धा आता दुबई आणि शारजा येथे खेळवण्यात येईल असे जाहीर केले. “बांगलादेशकडून यजमानपदाचे हक्क हिरावून घेताना आम्हाला दु:ख होत आहे. मात्र सध्याची स्थिती पाहता हा निर्णय घेणे अनिवार्य आहे. बांगलादेशने नक्कीच या स्पर्धेचे थाटात आयोजन केले असते. मात्र खेळाडूंच्या सुरक्षेला तसेच स्पर्धेच्या सुरळीत आयोजनाला आमचे पहिले प्राधान्य आहे,” असे अलार्डीस म्हणाले.
२००९पासून सुरू झालेल्या महिलांच्या टी-२० विश्वचषकाचे आतापर्यंत ८ हंगाम झाले आहेत. यांपैकी ६ वेळा ऑस्ट्रेलियाने, तर प्रत्येकी एकदा वेस्ट इंडिज व इंग्लंडने ही स्पर्धा जिंकली आहे. भारतीय संघाने २०२०मध्ये विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली होती. यंदा पुन्हा एकदा हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ टी-२० विश्वचषकात सहभागी होईल. यंदाही २०२३च्या टी-२० विश्वचषकाप्रमाणेच १० संघ या स्पर्धेत सहभागी होणार असून त्यांची दोन गटांत विभागणी करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशमधील स्थिती बिघडलेली आहे. त्यामुळे बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनीही देशातून पळ काढला. या सर्व बाबींच्या पार्श्वभूमीवर अनेक खेळाडूंनी बांगलादेशमध्ये जाण्यास नकार दर्शवला होता. तसेच काहींनी आयसीसीला स्पर्धा अन्य ठिकाणी खेळवण्याची विनंतीही केली. त्यामुळे अवघ्या महिनाभरावर स्पर्धा असताना आयसीसीला यूएईला यजमानपदाचा मान द्यावा लागला. बांगलादेशमध्ये प्रथमच महिलांच्या टी-२० विश्वचषकाचे आयोजन करण्यात येणार होते. मात्र आता आयसीसीने त्यांना भविष्यात अन्य एखाद्या स्पर्धेचे आयोजन करण्याची संधी देऊ, असे आश्वासन दिले आहे.
विश्वचषकाची गटवारी
> अ-गट : भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान, श्रीलंका
> ब-गट : इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, स्कॉटलंड, वेस्ट इंडिज, बांगलादेश
न्यूयॉर्क, त्रिनिदादच्या खेळपट्ट्यांना आयसीसीचा असमाधानकारक शेरा
दुबई : जून महिन्यात झालेल्या पुरुषांच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेतील अमेरिकेच्या न्यूयॉर्क आणि वेस्ट इंडिजच्या त्रिनिदाद येथील खेळपट्टीला आयसीसीने सुमार दर्जाचा म्हणजेच असमाधानकारक शेरा दिला आहे.
अमेरिका व विंडीज येथे संयुक्तपणे आयोजित करण्यात आलेल्या या विश्वचषकात भारताने विजेतेपद मिळवले. त्यांनी अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेला नमवले. या स्पर्धेतील साखळी टप्प्यातील सामने न्यूयॉर्कच्या नासाऊ कौंटी क्रिकेट स्टेडियमवर झाले. मात्र येथील लढतींमध्ये १२० धावांचा पाठलाग करणेही कठीण जात होते. तसेच त्रिनिदाद येथील ब्रायन लारा स्टेडियमलाही आयसीसीने निकृष्ट शेरा दिला आहे. याच खेळपट्टीवर अफगाणिस्तान व आफ्रिका यांच्यातील पहिली उपांत्य लढत झाली होती.
त्याशिवाय २०२८च्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश होणार आहे. त्या स्पर्धांसाठी अमेरिकेने चांगल्या दर्जाच्या खेळपट्ट्या तयार कराव्यात, असेही आयसीसीचे सुचवले आहे. २०२८ मध्ये लॉस एंजेल्स येथे ऑलिम्पिक स्पर्धा रंगणार आहे.