पाकिस्तानविरुद्धच्या लढतीने भारताच्या अभियानास प्रारंभ; महिलांच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेची आजपासून रणधुमाळी

Women's T20 Asia Cup 2024: महिलांच्या आशिया चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या नवव्या पर्वाला शुक्रवारपासून प्रारंभ होणार आहे.
Womens T20 Asia Cup 2024
Womens T20 Asia Cup 2024X
Published on

दाम्बुला : महिलांच्या आशिया चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या नवव्या पर्वाला शुक्रवारपासून प्रारंभ होणार आहे. श्रीलंकेत खेळवण्यात येणाऱ्या या स्पर्धेत जेतेपद मिळवून तब्बल आठव्यांदा जेतेपद पटकावण्याचे भारतीय संघाचे लक्ष्य असेल. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय महिला संघ शुक्रवारी पाकिस्तानविरुद्धच्या लढतीने आपल्या अभियानाला सुरुवात करणार आहे. त्यापूर्वी शुक्रवारीच दुपारी नेपाळ विरुद्ध संयुक्त अरब अमिराती (यूएई) यांच्यात सलामीची लढत होईल.

बांगलादेशमध्ये ३ ते २० ऑक्टोबरदरम्यान महिलांचा टी-२० विश्वचषक खेळवण्यात येणार आहे. त्या स्पर्धेच्या निमित्ताने आशिया चषकाचे महत्त्व वाढले आहे. गेल्या चार हंगांमांपासून टी-२० प्रकारात आशिया चषक खेळवण्यात येत आहे. २०२२मध्ये झालेल्या आशिया चषकात भारतीय संघाने श्रीलंकेला धूळ चारून सातव्यांदा जेतेपद मिळवले होते. आतापर्यंत ४ वेळा एकदिवसीय, तर ४ वेळा टी-२० प्रकारात महिलांची ही स्पर्धा खेळवण्यात आली आहे. त्यांपैकी फक्त २०१८मध्येच भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. अन्यथा प्रत्येक वेळी भारतानेच बाजी मारली आहे.

१९ ते २८ जुलैदरम्यान ८ संघांत होणाऱ्या या स्पर्धेत प्रत्येकी ४ संघांचे दोन गट करण्यात आले आहे. भारताच्या गटात पाकिस्तानसह नेपाळ आणि संयुक्त अरब अमिराती (यूएई) यांचा समावेश आहे. अन्य गटात श्रीलंका, बांगलादेश, थायलंड व मलेशिया हे संघ आहेत. या स्पर्धेतील सर्व सामने दाम्बुला येथील एकाच स्टेडियमवर होतील. २६ जुलै रोजी उपांत्य फेरीचे सामने होतील, तर २८ तारखेला अंतिम सामना खेळवण्यात येईल.

स्मृती, जेमिमाच्या कामगिरीकडे लक्ष

भारतीय फलंदाजांची भिस्त प्रामुख्याने डावखुरी सलामीवीर स्मृती मानधना आणि मुंबईकर जेमिमा रॉड्रिग्ज यांच्यावर असेल. विशेषत: स्मृती सध्या भन्नाट फॉर्मात आहे. तसेच शफाली वर्मा, हरमनप्रीत, दीप्ती शर्मा, रिचा घोष अशी फलंदाजी भारताच्या ताफ्यात आहेत. गोलंदाजीत पूजा वस्त्रकार लयीत असल्याने ती व रेणुका सिंग वेगवान माऱ्याची धुरा वाहेल. आशा शोबना, श्रेयांका पाटील, राधा यादव यांचे फिरकी त्रिकुटही भारताकडे उपलब्ध आहे. दुसरीकडे पाकिस्तानचे नेतृत्व निडा डार करणार असून फातिमा सना, इराम जावेद, डायना बैग या खेळाडूंवर त्यांची मदार असेल.

पाकिस्तानविरुद्ध झालेल्या १४ टी-२० सामन्यांपैकी भारताने तब्बल ११ लढती जिंकल्या आहेत. तर पाकिस्ताने उर्वरित ३ सामन्यांत यश मिळवले आहे.

भारतीय संघाचे सामने

> वि. पाकिस्तान : शुक्रवार, १९ जुलै (सायंकाळी ७ वाजता)

> वि. यूएई : रविवार, २१ जुलै (दुपारी २ वाजता)

> वि. नेपाळ : मंगळवार, २३ जुलै (सायंकाळी ७ वाजता)

> थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स आणि हॉटस्टार ॲप

भारताचा संघ

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, रिचा घोष, उमा छेत्री, पूजा वस्त्रकार, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग, दयालन हेमलता, आशा शोबना, राधा यादव, श्रेयांका पाटील, सजीवन सजना. राखीव खेळाडू : श्वेता सेहरावत, साईका इशाक, तनुजा कन्वर, मेघना सिंग.

logo
marathi.freepressjournal.in