आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धा : दीपिकाच्या हॅटट्रिकमुळे महिला हॉकी संघ विजयी

भारतीय महिला हॉकी संघाने महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत आपला विजयी धडाका कायम राखताना ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या चीनचा ६-२ असा दणदणीत पराभव केला.
आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धा : दीपिकाच्या हॅटट्रिकमुळे महिला हॉकी संघ विजयी
आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धा : दीपिकाच्या हॅटट्रिकमुळे महिला हॉकी संघ विजयीX
Published on: 

भोपाळ : भारतीय महिला हॉकी संघाने महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत आपला विजयी धडाका कायम राखताना ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या चीनचा ६-२ असा दणदणीत पराभव केला. या सामन्यात भारताने सलग चौथा विजय नोंदवला. स्पर्धेच्या इतिहासात चीनविरुद्ध भारताचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय ठरला.

या शानदार विजयामुळे भारतीय संघाने एफआयएचच्या जागतिक महिला हॉकी क्रमवारीत पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे. ऑक्टोबर २००३ मध्ये जागतिक क्रमवारी सुरू झाल्यापासूनचे भारताचे हे सर्वोच्च स्थान आहे. भारताच्या विजयाची शिल्पकार ठरली ती स्टार खेळाडू दीपिका. तिने पहिल्याच क्वार्टरमध्ये तीन गोल करत शानदार हॅट्ट्रिक नोंदवली. दीपिकाने सामन्याच्या पहिल्या, सहाव्या आणि १४व्या मिनिटाला गोल केले. त्यानंतर लालरेमसियामी (१९वे मिनिट), नेहा (२२वे मिनिट) आणि साक्षी राणा (३८वे मिनिट) यांनी प्रत्येकी एक गोल करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

सामन्याची सुरुवात भारताने आक्रमक केली. पहिल्याच मिनिटाला दीपिकाने रिव्हर्स हिटद्वारे अप्रतिम गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली. रुतुजा दादासो पिसाळ आणि सलीमा टेटे यांनी सुरेख पासिंग करत या गोलसाठी संधी निर्माण केली होती. त्यानंतर सहाव्या मिनिटाला नेहाने पेनल्टी कॉर्नर मिळवून दिला आणि दीपिकाने त्याचे गोलमध्ये रूपांतर केले. भारताने आक्रमणाची धार कायम ठेवली. पूजा साहूच्या दमदार प्रयत्नामुळे आणखी एक पेनल्टी कॉर्नर मिळाला. त्यावर दीपिकाने १४व्या मिनिटाला तिसरा गोल करत हॅट्ट्रिक पूर्ण केली. मात्र, चीननेही लगेच प्रत्युत्तर देत फेंग क्विंगमियाओच्या माध्यमातून १५व्या मिनिटाला गोल केला.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)