
गुवाहाटी : एकीकडे पुरुषांच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेची सांगता झालेली असतानाच आता मंगळवार, ३० सप्टेंबरपासून अवघ्या विश्वात महिलांचा महासंग्राम रंगणार आहे. महिलांच्या एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला मंगळवारपासून प्रारंभ होणार असून हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात खेळणाऱ्या यजमान भारतीय महिला संघाची सलामीला श्रीलंकेशी गाठ पडणार आहे.
भारतात ३० सप्टेंबर ते २ नोव्हेंबर या काळात महिलांच्या विश्वचषकाचे १३वे पर्व रंगणार असून या स्पर्धेतील काही सामने श्रीलंकेतसुद्धा होतील. पाकिस्तानचा संघ आयसीसीशी केलेल्या करारानुसार भारतात येणार नसल्याने त्यांच्या लढती कोलंबोत होतील. आतापर्यंत महिलांचे १२ एकदिवसीय विश्वचषक झाले आहेत. त्यांपैकी भारताने २००५ व २०१७ या विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली होती. मात्र दोन्ही वेळेस त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. मुख्य म्हणजे गेल्या विश्वचषकात (२०२२) भारताला उपांत्य फेरीसुद्धा गाठता आली नव्हती. त्यामुळे यावेळी हरमनप्रीतच्या नेतृत्वात महिला संघ जेतेपद मिळवेल, अशी आशा आहे.
भारत चौथ्यांदा महिलांच्या विश्वचषकाचे यजमानपद भूषवणार आहे. यापूर्वी १९७८, १९९७ व २०१३मध्ये भारतात महिलांचा एकदिवसीय विश्वचषक रंगला होता. भारताने आजवर टी-२० किंवा एकदिवसीय प्रकारात एकदाही विश्वचषक उंचावलेला नसल्याने यावेळी घरच्या प्रेक्षकांसमोर नक्कीच ते ऐतिहासिक कामगिरी नोंदवण्यास आतुर असतील. मात्र ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड हे संघ त्यांच्या मार्गात अडथळा ठरू शकतात. चामरी अटापटूच्या नेतृत्वात खेळणारा श्रीलंकेचा संघ भारताला कडवी टक्कर देऊ शकतो.
दरम्यान, भारताचे २३ व २६ ऑक्टोबर रोजी होणारे सामने हे नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर होतील. तसेच फलंदाजीत भारताला स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्ज यांच्याकडून चमकदार कामगिरी अपेक्षित आहे. गोलंदाजीत रेणुका सिंग, फिरकीपटू श्री चरणी, राधा यादव व अष्टपैलू दीप्ती शर्मा यांचे योगदान भारतासाठी संपूर्ण स्पर्धेत मोलाचे ठरेल.
भारतीय महिलांचे साखळी सामने
३० सप्टेंबर वि. श्रीलंका
५ ऑक्टोबर वि. पाकिस्तान
९ ऑक्टोबर वि. दक्षिण आफ्रिका
१२ ऑक्टोबर वि. ऑस्ट्रेलिया
१९ ऑक्टोबर वि. इंग्लंड
२३ ऑक्टोबर वि. न्यूझीलंड
२६ ऑक्टोबर वि. बांगलादेश
विश्वचषकासाठी भारतीय महिला संघ
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, प्रतिका रावल, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, अरुंधती रेड्डी, क्रांती गौड, रिचा घोष, अमनजोत कौर, राधा यादव, रेणुका ठाकूर, श्री चरणी, स्नेह राणा, उमा छेत्री. राखीव : तेजल हसबनीस, प्रेमा रावत, प्रिया मिश्रा, मिन्नू मणी, सायली सतघरे.
विश्वचषकाचे स्वरूप कसे?
३० सप्टेंबर ते २ नोव्हेंबर या काळात ८ संघांत महिलांचा विश्वचषक रंगणार आहे. एकंदर हा १३वा महिला विश्वचषक असेल. १९७३पासून महिलांच्या एकदिवसीय विश्वचषकाचे दर चार वर्षांनी यशस्वी आयोजन करण्यात येत आहे.
यंदा साखळी फेरीत प्रत्येक संघ सात सामने खेळणार आहे. भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका व न्यूझीलंड हे आठ संघ स्पर्धेत सहभागी होतील.
साखळी फेरीच्या अखेरीस गुणतालिकेतील आघाडीचे चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. २ नोव्हेंबरला विजेता ठरेल. आतापर्यंत ऑस्ट्रेलियाने ७, इंग्लंडने ४, तर न्यूझीलंडने एकदा महिला विश्वचषक जिंकला आहे.
पाकिस्तानचे सामने श्रीलंकेत
आयसीसीशी झालेल्या करारानुसार पाकिस्तानचा संघ या विश्वचषकासाठी भारतात येणार नाही. त्यामुळे त्यांचे सर्व सामने श्रीलंकेतील कोलंबो येथे होतील. भारत-पाकिस्तान यांच्यात ५ ऑक्टोबरला होणाऱ्या सामन्यासाठीसुद्धा भारतीय संघ कोलंबोला जाणार आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातील बिघडलेल्या संबंधांमुळे भारताने मार्च महिन्यातील चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानमध्ये जाण्यास नकार दिला. त्यामुळे भारताचे सर्व सामने दुबईत झाले. आयसीसीने २०२७च्या सर्व स्पर्धांपर्यंत दोन्ही संघांत करार केला आहे. त्यानुसार भारतात एखादी आयसीसी स्पर्धा असली, तर पाकिस्तान अन्य ठिकाणी खेळणार. तसेच पाकिस्तानमधील आयसीसी स्पर्धेसाठी भारत जाणार नाही. महिला विश्वचषकात पाकिस्तान उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला, तर ती लढत कोलंबोत होईल. अन्यथा नवी मुंबईत खेळवण्यात येईल. अंतिम फेरीसाठीसुद्धा नवी मुंबई व कोलंबो असे दोन पर्याय ठेवण्यात आले आहेत.