मालिका विजयाचे महिलांचे ध्येय! आज भारताचा आस्ट्रेलियाच्या महिलांविरूद्ध दुसरा टि-२० सामना

सायं. ७ वाजता नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर रंगणार सामना..
मालिका विजयाचे महिलांचे ध्येय!  
आज भारताचा आस्ट्रेलियाच्या महिलांविरूद्ध  दुसरा टि-२० सामना
Published on

नवी मुंबई : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यावर तिन्ही आघाड्यांवर दमदार खेळ करणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघाने आता दुसरा सामना जिंकून टी-२० मालिका खिशात टाकण्याचे ध्येय ठेवले आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा टी-२० सामना रविवारी नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर रंगणार आहे.

एकमेव कसोटी सामना भारताने जिंकल्यानंतर यजमानांना वनडे मालिकेत ऑस्ट्रेलियाच्या महिलांकडून ०-३ असा निराशाजनक पराभव पत्करावा लागला. मात्र टी-२० मालिकेच्या सुरुवातीलात भारतीय महिला संघाने कामगिरीत लक्षणीय प्रगती करत पाहुण्यांना पूर्णपणे निष्प्रभ केले. ऑस्ट्रेलियावर नऊ विकेट्सने मिळवलेला विजय हा टी-२० प्रकाराच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय ठरला.

एकदिवसीय मालिकेत खूप टीका सहन करावी लागल्यानंतर शुक्रवारी भारतीय महिलांनी खेळपट्टीवर कमालच केली. तितास साधूच्या (१७ धावांत ४ बळी) दमदार गोलंदाजीपुढे ऑस्ट्रेलियाचे कंबरडेच मोडले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला सामन्यात कमबॅक करण्याची कोणतीही संधी मिळाली नाही. त्यानंतर शफाली वर्मा (नाबाद ६४) आणि स्मृती मानधना (५) यांनी सलामीसाठी १३७ धावांची भागीदारी रचत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. १९ वर्षीय तितास साधूने कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरी साकारली. तिला दीप्ती शर्मा आणि श्रेयांका पाटील यांनी प्रत्येकी दोन विकेट्स मिळवत चांगली साथ दिली. क्षेत्ररक्षणातही दमदार कामगिरी करत भारताच्या खेळाडूंनी बऱ्याच धावा रोखल्या. त्याचबरोबर कर्णधार हरमनप्रीत कौर हिने एक-दोन नव्हे तर तब्बल चार झेल टिपले.

“कोणत्याही चांगल्या कामगिरीआधी किंवा विजयाआधी कित्येक दिवसांची खडतर तपश्चर्या असते. चांगल्या क्षेत्ररक्षणाशिवाय गोलंदाजांना यश मिळणे शक्य होत नाही. त्यामुळे संघातील सर्व क्षेत्ररक्षणकांचे आभार मानायला हवेत,” असे तितास साधू हिने सांगितले. शुक्रवारी मिळवलेल्या विजयामुळे भारतीय महिला संघाला आता मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिलीवहिली टी-२० मालिका जिंकण्याची संधी चालून आली आहे. मात्र हे तितकेसे सोपे नाही. कारण भारतीय संघाला कामगिरीत सातत्य राखावे लागणार आहे. महान खेळाडू एलिस पेरीचा हा ३००वा आंतरराष्ट्रीय सामना असल्यामुळे ऑस्ट्रेलिया भारताला चोख प्रत्युत्तर देणार, हे निश्चित.

ऑस्ट्रेलियाची फोएबे लिचफील्ड ही सध्या चांगली फॉर्मात असून तिने पहिल्या टी-२० सामन्यात ४९ धावांची खेळी साकारली. तिने एलिस पेरी हिच्यासोबत पाचव्या विकेटसाठी ७९ धावांची भागीदारी रचली होती. मात्र दुसऱ्या बाजूने विकेट्स पडत गेल्यामुळे ऑस्ट्रेलियाची वाताहत झाली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा डाव १९.२ षटकांत १४१ धावांवर आटोपला. भारताने हे आव्हान स्मृती मानधना आणि शफाली वर्मा यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर १७.४ षटकांत पार केले. ऑस्ट्रेलियाच्या क्षेत्ररक्षकांनी या सामन्यात गचाळ क्षेत्ररक्षण केले. डार्सी ब्राऊन हिने १४ धावा अतिरिक्त दिल्या.

प्रतिस्पर्धी संघ-

- भारत : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्ज, शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, यास्तिका भाटिया, रिचा घोष, अमनज्योत कौर, श्रेयांका पाटील, मन्नत कश्यप, साईका इशाक, रेणुका सिंग ठाकूर, तितास साधू, पूजा वस्त्रकार, कनिका अहुजा, मिन्नू मानी.

- ऑस्ट्रेलिया : अलिसा हिली (कर्णधार), डार्सी ब्राऊन, हीदर ग्रॅहम, ॲॅशले गार्डनर, किम गार्थ, ग्रेस हॅरिस, जेस जोनासन, अलाना किंग, फोएबे लिचफील्ड, ताहिला मॅकग्रा, बेथ मूनी, एलिस पेरी, मेगान शट, ॲॅनाबेल सदरलँड, जॉर्जिया वेअरहॅम.

- वेळ : सायं. ७ वाजल्यापासून

- थेट प्रक्षेपण : स्पोर्ट्स १८ वाहिनी आणि जिओ सिनेमा ॲप

- स्थळ : डीवाय पाटील स्टेडियम, नवी मुंबई

भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघामध्ये झालेल्या आतापर्यंतच्या ३२ टी-२० सामन्यांमध्ये भारताने फक्त ८ लढती जिंकल्या आहेत. ऑस्ट्रेलियाने २३ सामने जिंकले असून एका लढतीचा कोणताही निकाल लागलेला नाही.

- खेळपट्टी फलंदाजीसाठी पोषक

नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजीसाठी पोषक असून कमी लांबीची सीमारेषा असल्यामुळे फलंदाजांची चलती होणार आहे. त्यामुळे फलंदाजांवर अंकुश ठेवणे गोलंदाजांसाठी कठीण होणार आहे. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारण्याचा कोणत्याही कर्णधाराची पहिली पसंती असेल. कारण संध्याकाळच्या वेळी खेळपट्टीवर दव पडण्याची दाट शक्यता आहे.

logo
marathi.freepressjournal.in