

ॲम्स्टेलवीन : भारतीय महिला संघाने विश्वचषक हॉकी स्पर्धेतील पहिल्या सामन्यात पॅरिस ऑलिम्पिकमधील रौप्यपदक विजेत्या चीनला २-२ असे बरोबरीत रोखत दमदार सुरुवात केली. ड-गटातील या साखळी सामन्यात भारतीय संघ एकवेळ २-१ असा आघाडीवर होता. मात्र चीनने बरोबरी साधली. त्यामुळे दोन्ही संघांना एकेक गुण विभागून देण्यात आला.
भारताच्या ८०व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभमुहूर्तावर बेल्जियम आणि नेदरलँड्स येथे पुरुष आणि महिलांच्या हॉकी विश्वचषकाला प्रारंभ झाला. एकीकडे शनिवारी पुरुषांनी दणक्यात सुरुवात करताना वेल्सवर ३-१ अशी मात केली. दुसरीकडे रविवारी सलिमा टेटेच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय महिलांवर लक्ष होते. गटातील या अत्यंत कठीण सामन्यात भारताने पहिल्या सत्रापासूनच वर्चस्व गाजवले. मध्यंतरापर्यंत भारतीय संघ २-१ असा आघाडीवर होता. सामन्याच्या अंतिम टप्प्यात नवनीत कौरने विरोधी संघाच्या वर्तुळात प्रवेश केला, मात्र चीनने तिचा प्रयत्न उधळून लावला. अंतिम सत्रात भारताला पेनल्टी कॉर्नर न दिल्याने भारतीय प्रशिक्षक शोर्ड मरिन यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
भारताकडून नवनीतने आठव्या मिनिटाला आणि दीपिकाने २६व्या मिनिटाला गोल नोंदवले. चीनकडून झांग यिंगने १४व्या मिनिटाला पेनल्टी स्ट्रोकवर गोल केला, तर मा निंगने ३९व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करत बरोबरी साधून दिली. भारतीय संघाचा पुढील सामना १८ ऑगस्ट रोजी दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. दिवसातील दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेचा ४-० असा पराभव केला.
सामन्याच्या दुसऱ्या मिनिटाला सुनेलिता टोप्पोच्या पासवर दीपिकाचा प्रयत्न चिनी गोलरक्षक ली टिंगने उधळून लावला. त्यानंतर लालरेमसियामीने पेनल्टी कॉर्नर मिळवला, परंतु नवनीतचा शॉट यशस्वी ठरला नाही. आठव्या मिनिटाला नेहाच्या पासवर नवनीत कौरने मैदानी गोल करत भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. पहिल्या सत्राच्या अखेरच्या मिनिटाला शिल्पी डबासने झांग यिंगला अडवल्याचा निर्णय देत पंचांनी चीनला पेनल्टी स्ट्रोक दिला. भारताचे व्हिडिओ रेफरल फेटाळले गेल्यानंतर यिंगने गोल करत १-१ अशी बरोबरी साधली.
दुसऱ्या सत्राच्या २२व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर नवनीतचा प्रयत्न चिनी बचावफळीने फेटाळला. यानंतर २४व्या मिनिटाला दीपिकाने पेनल्टी कॉर्नरवर गोल करत भारताला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. ३३व्या मिनिटाला सविता पुनियाने उत्कृष्ट बचाव केला. मात्र, ३९व्या मिनिटाला मा निंगने पेनल्टी कॉर्नरवर गोल करत २-२ अशी बरोबरी साधली.
भारतीय महिला संघाने १९७४च्या विश्वचषकात उपांत्य फेरीपर्यंत मजल मारून चौथा क्रमांक पटकावला होता. हीच भारताची विश्वचषकातील आजवरची सर्वोत्तम कामगिरी आहे. २०२०च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला कांस्यपदकाच्या लढतीत पराभव पत्करावा लागला होता. आता शोर्ड मरिन यांच्या प्रशिक्षणात पुन्हा एकदा भरारी घेण्यासाठी हा संघ उत्सुक आहे.
पुरुषांसमोर आज इंग्लंडचे आव्हान
सोमवारी होणऱ्या ड-गटातील दुसऱ्या साखळी लढतीत भारतीय पुरुष संघासमोर इंग्लंडचे कडवे आव्हान असेल. जागतिक क्रमवारीत वरच्या स्थानावर असलेल्या युरोपियन संघाविरुद्ध विश्वचषकात विजय मिळवण्यासाठी भारताला तब्बल ३२ वर्षांची प्रतीक्षा करावी लागली आहे. भारताने शनिवारी पहिल्या सामन्यात वेल्स संघाचा ३-१ असा पराभव करत विजयी सुरुवात केली होती. दुसरीकडे, इंग्लंडने आपल्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा ४-१ असा धुव्वा उडवत दमदार फॉर्म सिद्ध केला आहे. प्रत्येक गटातून अव्वल दोन संघ दुसऱ्या टप्प्यात जाण्यासाठी पात्र ठरतील, जिथे त्यांची दोन वेगळ्या गटांत पुनर्रचना केली जाईल. पहिल्या फेरीत खेळलेल्या संघाविरुद्धचा निकाल पुढील टप्प्यात गृहीत धरला जाणार असल्याने, हा सामना उपांत्य फेरीच्या शर्यतीत निर्णायक ठरेल.
वेळ : सायंकाळी ६.३० वाजता
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट २, जिओहॉटस्टार ॲप